गाझामध्ये मुलांच्या पतंग उडवण्यावर निर्बंध घातल्याच्या पार्श्वभूमीवर पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ जगभरात ‘ग्लोबल काइट वीकेंड’चे आयोजन करण्यात आले होते. मुंबईतही ‘इंडियन पीपल इन सॉलिडॅरिटी विथ पॅलेस्टाईन’ या गटाकडून वांद्रे परिसरातील एका इमारतीच्या गच्चीवर पतंग उडवण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, या कार्यक्रमात सहभागी झालेल्या एका विद्यार्थिनीच्या घराची पोलिसांकडून तब्बल नऊ तास झडती घेण्यात आल्याची बाब समोर आली आहे.
हर्षदा बोराडे या विद्यार्थिनीने वांद्रे पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने कोणतेही झडती वॉरंट न दाखवता तिच्या घराची तपासणी केल्याचा दावा तिने केला आहे. १५ सप्टेंबर रोजी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आयोजित पतंग उडवण्याच्या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर ही घटना घडल्याचे तिचे म्हणणे आहे. हर्षदाच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजता सुरू झालेली ही झडती शनिवारी पहाटे ३ वाजेपर्यंत सुरू होती. साध्या वेशातील सुमारे १५ पोलिस कर्मचारी घरात दाखल झाले. त्यांनी स्वतःची ओळख सांगितली असली तरी ओळखपत्र दाखवण्यास नकार दिल्याचा आरोप विद्यार्थिनीने केला आहे.
झडतीदरम्यान तिच्या वह्या, डायऱ्या आणि पुस्तकांची तपासणी करण्यात आली. पुस्तकांची नावे नोंदवण्यात आली, तर घरातील विविध वस्तूंचे छायाचित्रण करण्यात आल्याचा दावा तिने केला आहे. या कारवाईदरम्यान तिच्या मित्रांशीही गैरवर्तन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, वांद्रे पोलिसांनी विद्यार्थिनीविरोधात अद्याप कोणताही प्रथम माहिती अहवाल दाखल केलेला नाही. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असून संबंधित माहिती आणि तपशील गोळा केले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिस उपायुक्त मोहित गर्ग यांनी कायद्यानुसार निर्धारित प्रक्रियेनुसार चौकशी सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे.
‘इंडियन पीपल इन सॉलिडॅरिटी विथ पॅलेस्टाईन’ या गटानेही या कारवाईबाबत माहिती दिली आहे. त्यांच्या दाव्यानुसार, स्वतःची पोलीस म्हणून ओळख करून देणारे साध्या वेशातील कर्मचारी विद्यार्थिनीच्या निवासस्थानी आले होते. कोणतीही लेखी सूचना न देता तिला ताब्यात घेण्यात आले आणि नंतर तिला तिच्या निवासस्थानी नेण्यात आल्याचा आरोप या गटाने केला आहे. या घटनेनंतर विद्यार्थिनीला घर रिकामे करण्यास घरमालकाने सांगितल्याचेही हर्षदाने म्हटले आहे.
हे ही वाचा:
पोलीस असल्याचे भासवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला घातली गोळी
साहिलला परीक्षागृहातून बाहेर नेल्याचा घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद
छत्रपती संभाजीनगरमधून ४,७६५ किलो भेसळयुक्त ‘मावा’ जप्त
माध्यमांच्या प्रवेशबंदीनंतर व्हाइट हाऊसकडून ‘ट्रम्प टीव्ही’
दरम्यान, गाझातील मुलांच्या पतंग उडवण्यावर निर्बंध घातल्याच्या वृत्तानंतर पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ ‘ग्लोबल काइट वीकेंड’ची हाक देण्यात आली होती. वृत्तांनुसार, गाझातील मुलांचे काही पतंग वाऱ्यामुळे इस्रायली हद्दीत गेले होते. त्यानंतर सुरक्षेचा धोका असल्याचा दावा करण्यात आला आणि गाझातील पालक व स्थानिक प्रशासनाकडून पतंग जप्त करण्यात आल्याचे वृत्त आहे. याच पार्श्वभूमीवर जगातील विविध ठिकाणी पतंग उडवण्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
