चीनमधून बांगलादेशला पाठवण्यात येत असलेला ४०५ टन रासायनिक पदार्थांचा साठा इंडोनेशियन नौदलाने जप्त केला आहे. विशेष म्हणजे, या जहाजात लाखो अनोंदणीकृत सिमकार्डही आढळली आहेत. जप्त केलेल्या रसायनाचा वापर रॉकेट आणि क्षेपणास्त्रांच्या इंधन निर्मितीसाठी केला जातो. त्यामुळे या मालवाहतुकीच्या उद्देशाबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
‘एमव्ही स्टार लाइन’ नावाचे आणि कोमोरोसचा ध्वज असलेले हे जहाज चीनमधील लियानयुंगांग बंदरातून बांगलादेशातील मोंगला बंदराकडे जात होते. ७ नोव्हेंबर रोजी उत्तर सुमात्रातील बेलवान परिसरात इंडोनेशियन नौदलाने हे जहाज अडवले. संशयास्पद हालचाली आणि रेडिओ संदेशांना प्रतिसाद न मिळाल्याने त्याची तपासणी करण्यात आली.
जहाजावरील ३६ कंटेनरपैकी १५ कंटेनरमध्ये ४०५ टन सोडियम पर्क्लोरेट आढळले. तसेच, ५४ पॅलेटमध्ये लाखो अनोंदणीकृत कोऱ्या 4G LTE सिमकार्डचा साठाही सापडला. सोडियम पर्क्लोरेट हे ऑक्सिडायझिंग रसायन असून औद्योगिक वापरासोबतच रॉकेट आणि क्षेपणास्त्रांच्या प्रणोदक निर्मितीत त्याचा उपयोग होतो. इंडोनेशियन नौदलाचे अधिकारी रिअर अॅडमिरल डेनी सेप्टियन यांच्या म्हणण्यानुसार, या रसायनाच्या साठ्यातून सुमारे १०० क्षेपणास्त्रांसाठी आवश्यक इंधन तयार करता येऊ शकते.
हे ही वाचा:
ना विसावा, ना थांबा… अमूर फाल्कनने सलग १०१ तासांत गाठला सोमालियाचा किनारा
आशियातील भारताच्या वाढत्या आर्थिक सामर्थ्यावर शिक्कामोर्तब
गारठलेल्या सकाळी मुंबई धुरक्यात हरवली
बिसलेरीचे पाणी प्रयोगशाळेच्या तपासणीत असुरक्षित
जहाजाच्या कागदपत्रांमध्ये विसंगती
जहाजाच्या कागदपत्रांमध्येही अनियमितता आढळली. नोंदणी ऑक्टोबर २०२७ पर्यंत वैध असल्याचे कागदपत्रांवर नमूद असले, तरी प्रत्यक्ष नोंदणी निलंबित असल्याचे समोर आले. जहाजाचे मालक, रसायनांचे पुरवठादार आणि बांगलादेशातील आयातदार यांची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही.
