दिल्लीतील द्वारका परिसरात संरक्षण मंत्रालयात असिस्टंट सेक्शन ऑफिसर म्हणून कार्यरत असलेल्या ३० वर्षीय नाजिया खान यांच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली आहे. भरथल गावातील फ्लॅटमध्ये २१ ऑगस्ट रोजी पहाटे नाजिया यांचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. नाजिया या सुमारे तीन महिन्यांच्या गर्भवती असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे.
या प्रकरणात नाजिया यांच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्यांच्या सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कुटुंबीयांनी पती आजम अली खान, सासू आणि सासरे यांच्यावर मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे. नाजिया यांचे ११ एप्रिल रोजी मुस्लिम रितीरिवाजानुसार आजम अली खान यांच्याशी लग्न झाले होते. लग्नानंतर काही काळातच त्यांना सासरच्या मंडळींकडून त्रास दिला जात असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. शिवीगाळ, मारहाण, घरातून हाकलून देण्याची तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
पाकच्या दहशतवादी हल्ल्यांना जशास तसे उत्तर देणे हाच उपाय!
आरक्षणाच्या मागणीवरून व्यवस्था संपणार नाही; चिराग पासवानांची भूमिका
स्पेस की बात; २० अंतराळ स्टार्टअप कंपन्यांच्या सीईओंशी मोदींची चर्चा
रस्ता नाही, पूल नाही… उपचाराअभावी २३ वर्षीय विवाहितेचा मृत्यू
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, नाजिया फोनवरून वेळोवेळी आपल्यासोबत होत असलेल्या कथित छळाची माहिती देत होत्या. विशेष म्हणजे त्या गर्भवती असतानाही त्यांचा त्रास सुरूच असल्याचा आरोप आहे. २१ ऑगस्ट रोजी पहाटे चारच्या सुमारास नाजिया यांच्या सासऱ्यांनी फोन करून त्यांच्या मृत्यूची माहिती कुटुंबीयांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि नाजिया यांना रुग्णालयात नेण्यात आले.
नाजिया यांच्या मृत्यूबाबत त्यांच्या कुटुंबीयांनी गंभीर संशय व्यक्त केला आहे. सततच्या मानसिक आणि शारीरिक छळामुळे त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले असावे, असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच नाजिया यांची हत्या करून मृत्यूला आत्महत्येचे स्वरूप देण्यात आले असण्याची शक्यताही कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ८५ आणि १०८ अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. आता शवविच्छेदन अहवाल, घटनास्थळावरील पुरावे आणि इतर उपलब्ध माहितीच्या आधारे नाजिया यांच्या मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
संरक्षण मंत्रालयासारख्या महत्त्वाच्या सरकारी विभागात अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या नाजिया खानम यांच्या मृत्यूने कौटुंबिक छळाचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मात्र या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासातूनच स्पष्ट होणार असून, पोलिसांच्या पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
