उत्तर प्रदेशातील शाहजहांपुरमध्ये हनुमान मंदिरात पूजा-पाठ आणि देखभाल करणाऱ्या दोन साधूंची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोघांना आसनाला बांधून मंदिर परिसरातील लाकडांच्या साहाय्याने आग लावल्याचा आरोप आहे. मंदिराच्या जमिनीवरून सुरू असलेल्या वादातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणात सुमित सिंह नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.
खुदागंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सूथा गावात रात्री ही घटना घडली. मृतांची ओळख गोपाल दास आणि बड़े दास अशी झाली असून, दोघेही दीर्घकाळापासून मंदिरात राहत होते. बड़े दास हे दिव्यांग असल्याची माहिती समोर आली आहे. रात्रीच्या सुमारास मंदिरात दोघांचा आरोपीसोबत वाद झाल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्यांना मारहाण करून वेगवेगळ्या आसनाला बांधण्यात आले आणि मंदिर परिसरातून लाकडे जमा करून आग लावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
प्राथमिक माहितीनुसार, मंदिर ज्या जमिनीवर आहे ती जमीन सुमित सिंहच्या कुटुंबाच्या मालकीची असल्याचे सांगितले जाते. या जमिनीवरून आधीपासून वाद सुरू होता. दोन्ही साधू मंदिरात पूजा-पाठ करण्यासोबतच मंदिराची देखभाल करत होते. याच कारणावरून आरोपी आणि दोघांमध्ये यापूर्वीही वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, हत्येमागील नेमके कारण आणि घटनाक्रम तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
हे ही वाचा:
पाकिस्तानातून हवालामार्गे पैसा, यासिन मलिकसह सात जणांवर आरोप निश्चित
रील पाहून भाजी विक्रेत्याने घरातच लावले नकली नोटांचे ‘झाड’
भारतीय वैमानिकाची धाडसी कामगिरी चर्चेत; मोदी-नेतन्याहूंकडून कौतुक
फ्लायदुबईच्या विमानातील १८० जीव वाचवणारे कॅप्टन स्मित मच्छर कोण?
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही घटनास्थळाची पाहणी केली असून फॉरेन्सिक पथकाकडून पुरावे गोळा करण्यात आले आहेत. पोलिसांकडून परिसरातील परिस्थिती आणि घटनाक्रमाची तपासणी सुरू आहे. आरोपी सुमित सिंहला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात येत आहे. घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण असून पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे.
