जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिकसह सात जणांविरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आरोप निश्चित करण्याचे आदेश विशेष एनआयए न्यायालयाने दिले आहेत. पाकिस्तानमधून हवालाच्या माध्यमातून परदेशी निधी मिळवल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) तपासानुसार, या प्रकरणात ८ कोटी ९४ लाख ८७ हजार ६३९ रुपयांचा गुन्ह्यातून मिळालेला पैसा निर्माण झाल्याचा आरोप आहे.
यासिन मलिकव्यतिरिक्त झहूर अहमद शाह वटाली, अब्दुल रशीद शेख, शबीर अहमद शाह, नवल किशोर कपूर, ट्रायसन फार्म्स अँड कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड आणि मसरत आलम भट यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. विशेष एनआयए न्यायाधीश प्रशांत शर्मा यांनी या सातही आरोपींविरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या (PMLA) कलम ३ अंतर्गत आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या निरीक्षणानुसार, आरोपींविरोधात प्रथमदर्शनी पुरेसे साहित्य असून त्यांच्याविरोधात ठोस संशय निर्माण होतो.
ईडीच्या तपासानुसार, पाकिस्तानमधील यंत्रणा आणि इतर दहशतवादी संघटनांकडून विविध माध्यमांतून निधी मिळवला जात होता. हा पैसा हवालाच्या माध्यमातून भारतात आणला जात असल्याचा आरोप आहे. तपास यंत्रणेच्या म्हणण्यानुसार, दिल्लीतील पाकिस्तान उच्चायोगातून रोख रक्कम घेऊन जाणारे मध्यस्थ ती रक्कम हुर्रियत नेतृत्वातील व्यक्तींपर्यंत पोहोचवत होते. या निधीचा वापर कथितरित्या फुटीरतावादी आणि इतर बेकायदेशीर कारवायांसाठी केला जात होता.
हे ही वाचा:
रील पाहून भाजी विक्रेत्याने घरातच लावले नकली नोटांचे ‘झाड’
भारतीय वैमानिकाची धाडसी कामगिरी चर्चेत; मोदी-नेतन्याहूंकडून कौतुक
फ्लायदुबईच्या विमानातील १८० जीव वाचवणारे कॅप्टन स्मित मच्छर कोण?
इंडिया आघाडीच्या गर्दीत ममतांना कंठ फुटला
ईडीच्या तपासात २०१५-१६ या आर्थिक वर्षात यासिन मलिक, शबीर अहमद शाह आणि मसरत आलम यांना झहूर अहमद शाह वटालीच्या माध्यमातून परदेशी निधी मिळाल्याचे दस्तऐवज आढळल्याचा दावा करण्यात आला आहे.एनआयएच्या दुसऱ्या पुरवणी आरोपपत्राचा हवाला देत न्यायालयाने नमूद केले की, यासिन मलिकला सौदी अरेबियातून १५ लाख ७५ हजार ५९५ रुपये मिळाल्याचे तपासात समोर आले आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार, मलिकला मिळालेल्या परदेशी निधीची एकूण रक्कम ३० लाख ७५ हजार ५९५ रुपये होती आणि हा पैसा गुन्ह्यातून मिळालेल्या रकमेचा भाग असल्याचा आरोप आहे.
