स्पा आणि मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित देहव्यापाराचा पर्दाफाश करत दहिसर पोलिसांनी बोरीवली पूर्वेतील नामांकित संकुलात छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी चार तरुणींची सुटका केली असून स्पाच्या कॅशियरला अटक केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी तुषार वाडेकर हा फरार असून त्याचा पोलीस कसून शोध घेत आहेत.
बोरीवली पूर्वेकडील नॅन्सी कॉलनी परिसरातील डीजीएस शितल रिगालिया येथील पहिल्या मजल्यावरील शॉप क्रमांक १०९ मध्ये ‘कोरल स्पा’ सुरू होता. या स्पामध्ये उपचारात्मक मसाजच्या नावाखाली तरुणींना ग्राहकांसोबत अनैतिक कृत्ये करण्यास भाग पाडले जात असल्याची गोपनीय माहिती दहिसर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे दहिसर पोलीस ठाण्याच्या गुंडा पथक आणि निगराणी पथकाने सापळा रचला. त्यानंतर ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे ७.२० वाजता स्पावर अचानक छापा टाकण्यात आला.
छाप्यादरम्यान चार तरुणींना या अनैतिक व्यवसायात ढकलण्यात आल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले. पोलिसांनी तातडीने चारही तरुणींची सुटका केली. त्यांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशांवर उपजीविका करणाऱ्या अंकित संजयकुमार चौबे (२८) याला पोलिसांनी घटनास्थळावरून अटक केली. तो स्पामध्ये कॅशियर म्हणून काम करत होता. या संपूर्ण प्रकरणाचा कथित सूत्रधार तुषार वाडेकर हा फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.
हे ही वाचा:
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बनावट तिकीट रॅकेटचा पर्दाफाश
दहिसरमध्ये हायड्रोक्लोरिक अॅसिडची बेकायदा वाहतूक उघड
रायगडमध्ये पाझर तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू
घ्या, काँग्रेसला बॅलेटनेही बुडवले…
रोख रकमेसह सीसीटीव्ही यंत्रणा जप्त
कारवाईदरम्यान पोलिसांनी स्पामधून २१ हजार रुपयांची रोख रक्कम, सुमारे १० हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन, आयडीएफसी फर्स्ट बँकेचे स्वाइप मशीन, हिकव्हिजन आणि सीपी प्लस कंपनीचे सीसीटीव्ही नेटवर्क व्हिडिओ रेकॉर्डर, राऊटर तसेच ग्राहकांच्या नोंदी असलेली हिरव्या रंगाची हिशोबाची कॅटलॉग बुक असा मुद्देमाल जप्त केला आहे. या साहित्याच्या आधारे स्पामध्ये सुरू असलेल्या व्यवहारांची आणि ग्राहकांच्या संपर्कांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे.
या प्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील (BNS) कलम २९६ तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यातील (PITA) कलम ३, ४ आणि ५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपीचा शोध घेण्याबरोबरच या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही पोलीस तपास करत आहेत. ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ १२) गजानन राजमाने, सहायक पोलीस आयुक्त जयराज रणवरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील आणि पोलीस निरीक्षक ए. एम. देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक निलेश साळुंके, महिला सहायक पोलीस निरीक्षक दिपाली खरात आणि त्यांच्या पथकाने केली.
