उत्तर प्रदेशातील मेरठमधून उजैद नावाच्या संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. तो जम्मू-काश्मीरमध्ये अटक करण्यात आलेल्या संशयित दहशतवादी मोहम्मद साजिद आणि पाकिस्तानी दहशतवादी हँडलर शहजाद भट्टी यांच्या संपर्कात असल्याचा आरोप आहे. सुरक्षा यंत्रणांच्या तपासानुसार, उजैद सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना कट्टरपंथाकडे वळवण्याचा प्रयत्न करत होता. तसेच, त्याने स्वतःही हल्ला करण्याची तयारी दर्शवली होती.
उजैद हा मेरठमधील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बनियापाडा परिसरातील रहिवासी आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी २७ नोव्हेंबर २०२५ रोजी मोहम्मद साजिदला अटक केली होती. त्याच्या चौकशीत उजैदचे नाव समोर आले. साजिद हा पाकिस्तानी दहशतवादी हँडलर शहजाद भट्टीच्या संपर्कात असल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. साजिद आणि उजैद यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून ऑनलाइन संवाद सुरू होता.
तपासानुसार, सोशल मीडियावर भारतविरोधी व्हिडिओला प्रतिसाद देताना उजैदने ‘आम्हीही तयार आहोत’, अशी टिप्पणी केली होती. त्यानंतर साजिदने त्याच्याशी इन्स्टाग्रामवर संपर्क साधला. पुढे इन्स्टाग्राम आणि सेशन ऍपवर ‘ट्यूशन-४०’ आणि ‘ब्रिगेड’ नावाचे ऑनलाइन ग्रुप तयार करण्यात आले. या ग्रुपच्या माध्यमातून १४ ते १६ वयोगटातील तरुणांना प्रभावित करून कट्टरपंथाकडे वळवण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय आहे.
हे ही वाचा:
हिजाबशिवाय गाणे म्हणणाऱ्या गायिकेला इराणमध्ये चाबकाचे फटके
लंडनसाठी निघालेल्या सौरव दासला दिल्ली विमानतळावर रोखले
१६ डिसेंबरला बांगलादेशात जाण्याची हसीनांची घोषणा
कुर्ला प्रकरणात मारहाण करणाऱ्या मुलांशी संबंधित मदरशाला नोटीस
तपास यंत्रणांना उजैदचा पाकिस्तानमधील काही मोबाइल क्रमांकांशी संपर्क असल्याचेही आढळले आहे. तसेच, पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील संपर्क, आत्मघाती हल्ल्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या सुसाइड व्हेस्टची मागणी आणि गुरेझ खोऱ्यातून पाकिस्तानात जाण्याच्या संभाव्य मार्गांबाबतही तपास सुरू आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी यापूर्वी उजैदचा शोध घेण्यासाठी मेरठमध्ये छापे टाकले होते. मात्र, तो सापडला नव्हता. पोलिसांच्या कारवाईची माहिती मिळाल्यानंतर त्याने कुटुंबासह घर सोडल्याचे सांगितले जाते. अखेर मेरठ पोलिसांनी त्याला अटक केली.
