घरधर्म संस्कृतीसौदी अरेबियातल्या श्रीलंकन हिंदू तरुणाची फाशी रद्द

सौदी अरेबियातल्या श्रीलंकन हिंदू तरुणाची फाशी रद्द

प्रेषित मोहम्मद यांच्यावरील फेसबुक कमेंटप्रकरणी मोठा दिलासा

सौदी अरेबियाच्या सर्वोच्च न्यायालयाने २४ वर्षीय श्रीलंकन हिंदू स्थलांतरित कामगार अनोजन सिवरासा याला सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा रद्द केली आहे. इस्लाम आणि प्रेषित मोहम्मद यांचा अपमान केल्याचे मानल्या गेलेल्या फेसबुकवरील कमेंटप्रकरणी त्याला ही शिक्षा सुनावण्यात आली होती. श्रीलंका सरकारने आपल्या नागरिकाला दिलासा मिळावा यासाठी सातत्याने केलेल्या राजनैतिक आणि कायदेशीर प्रयत्नांनंतर हा महत्त्वाचा निर्णय झाला.

श्रीलंकेच्या परराष्ट्र व्यवहार, परदेशी रोजगार आणि पर्यटन मंत्रालयाने बुधवारी, १४ ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या निवेदनात या निर्णयाला दुजोरा दिला. त्यानुसार सौदी अरेबियाच्या सर्वोच्च न्यायालयाने १३ ऑक्टोबर रोजी सिवरासा याची फाशीची शिक्षा रद्द केली.

सिवरासा यांच्या अडचणींची सुरुवात श्रीलंकेत जूनच्या अखेरीस झालेल्या एका सोशल मीडिया वादातून झाली. एका तरुण मुस्लिम व्यक्तीने हिंदू यात्रेकरूंच्या मागे असलेल्या एका कुत्र्याला लाथ मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यानंतर सोशल मीडिया युजर्समध्ये तीव्र वाद सुरू झाला.

या वादादरम्यान एका युजरने हिंदू देवतेबद्दल कथित आक्षेपार्ह टिप्पणी केली. त्याला उत्तर देताना सिवरासा यांनी तमिळ भाषेत प्रेषित मोहम्मद यांच्याबाबत एक कमेंट केली. सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांनी ही कमेंट ईशनिंदात्मक आणि इस्लामचा अपमान करणारी असल्याचे मानले. सिवरासा यांनी काही वेळानंतर ती कमेंट डिलीट केली. तसेच त्यांनी माफी मागणारा व्हिडिओही पोस्ट केला. मात्र, डिलीट केलेल्या कमेंटचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर फिरत राहिले.

सिवरासा यांचे भाऊ हमसिदान यांनी बीबीसीला सांगितले की, श्रीलंकेतील काही व्यक्तींनी सिवरासा ज्या कंपनीत सौदी अरेबियात काम करत होते, त्या कंपनीला ई-मेल करून या प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर सौदी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास हे प्रकरण आले. त्यांची इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली आणि त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सही हटवण्यात आल्याचे वृत्त आहे.

आधी पाच वर्षांची शिक्षा, नंतर थेट फाशी

१५ जुलै रोजी अल-अहसा फौजदारी न्यायालयाने सिवरासा यांना फेसबुकवरील त्या कमेंटप्रकरणी पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. याशिवाय त्यांना ३० लाख सौदी रियाल, म्हणजेच सुमारे ८ लाख अमेरिकन डॉलर, इतका दंड ठोठावण्यात आला होता. मात्र, त्यानंतर प्रकरणाने गंभीर वळण घेतले. १७ सप्टेंबर रोजी सौदी अरेबियाच्या अपील न्यायालयाने देशातील शरियत कायद्याच्या व्याख्येनुसार मूळ तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा बदलून सिवरासा यांना फाशीची शिक्षा सुनावली.

सिवरासा यांचे पुढे काय होणार?

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे सिवरासा आणि त्यांच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला असला, तरी त्यांची कायदेशीर लढाई अद्याप पूर्णपणे संपलेली नसण्याची शक्यता आहे. राजनैतिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता सिवरासा यांना आधी सुनावण्यात आलेली पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा कायम राहणार का, हा प्रश्न अद्याप स्पष्ट झालेला नाही.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version