घरसंपादकीयलंगोटी सुटली तरी नाचतोय अब्दुल!

लंगोटी सुटली तरी नाचतोय अब्दुल!

बॅलेटवर निवडणुका होत नाहीत, म्हणून भाजपचा विजय होतो, हा काँग्रेसचा दावा पुन्हा एकदा पोकळ ठरलेला आहे. यापूर्वी सिलचर आणि त्रिपुरामध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. आता चार राज्यांतील २८ विधान परिषदेच्या जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या वाट्याला फक्त एक जागा आली. म्हणजेच ‘लंगोटी वाचलेली आहे’. सत्ताधारी पक्ष असलेल्या कर्नाटकात चारही जागांवर काँग्रेसचा लाजिरवाणा पराभव झाला. इथे प्रशासन त्यांचे होते, पोलीस त्यांचे होते, ईव्हीएमला दोष देण्याची सोयही नव्हती. आता नागपूरमध्ये मिळालेली एक जागा आणि वाराणसीत झालेला भाजपचा पराभव साजरा करून काँग्रेसचे नेते आपले तोंड लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. ‘बेगाणी शादीत अब्दुल्ला दिवाना’ अशी त्यांची गत झाली आहे.

काँग्रेस पक्षाचे देशविरोधी, हिंदूविरोधी राजकारण मतदारांना पटत नाही, त्यामुळे त्यांच्या पाठीशी मतदार उरलेलाच नाही. पक्षात माजलेली दुफळी अधिक रुंदावत चालली आहे. काँग्रेसच्या पराभवाची अशी बरीच कारणे आहेत, त्यात काही सुधारणा करण्याची इच्छा पक्षाच्या नेतृत्वाला दिसत नाही. उलट लोकांशी काडीमात्र संबंध नसलेले मुद्दे उपस्थित करून केंद्र सरकारच्या वाटचालीत खोडे घालण्याचे काम काँग्रेस नेते राहुल गांधी करत आहेत. निवडणुकांमध्ये त्याचे परिणाम पक्षाला भोगावे लागतात. “मोदी का बाप भी जायेगा,” असे म्हणणाऱ्या पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या राज्यात आणि त्यांच्या बालेकिल्ल्यात मतदारांनी काँग्रेसची बत्ती गुल केली आणि ‘कोण बाप आहे, कोण जाईल’ हे दाखवून दिले. बिनडोक विधाने करून फार फार तर होयबा कार्यकर्त्यांच्या टाळ्या मिळतील, लोकांची मते मिळत नाहीत. विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने मतदारांनी काँग्रेसला कर्नाटकाचे राजकीय भविष्य सांगून टाकले आहे.

कर्नाटकातील विधान परिषदेच्या ४ जागांवर काँग्रेस पक्षाचा मोठा पराभव झाला असून, या निमित्ताने सुशिक्षित मतदारांमध्ये असलेली नाराजी स्पष्ट झालेली आहे. या चारपैकी तीन जागा भाजपाकडे होत्या, तर केवळ बंगळुरू शिक्षक मतदारसंघ काँग्रेसकडे होता. भाजप-जेडीएस आघाडीने चारही जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. राज्यात काँग्रेसचे सरकार असताना आणि प्रमुख नेते मैदानात उतरलेले असतानाही काँग्रेसला एकाही जागेवर खाते उघडता आले नाही. त्यांच्याकडे असलेली एक जागाही टिकवता आली नाही. मैदानात उतरलेले नेते एकमेकांच्या तंगडीत तंगडे घालत असल्यामुळे बहुधा काँग्रेसने तोंडावर आपटी खाल्ली आहे. कर्नाटकात खांदेपालट झाला; सिद्धरामय्यांची जागा डी. के. शिवकुमार यांनी घेतली. मुख्यमंत्री पद गमवावे लागलेले सिद्धरामय्या जमेल तिथे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यात धुमसत असलेला अंतर्गत सत्तासंघर्ष आणि स्थानिक पातळीवरील नेत्यांमध्ये नसलेला समन्वय काँग्रेसच्या पराभवाला कारणीभूत ठरला.

दुसऱ्या बाजूला, भाजप आणि एचडी देवेगौडा यांच्या जेडीएस पक्षाने एकत्रितपणे ही निवडणूक लढवली. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांमध्ये जेडीएसचे केडर आणि भाजपची व्होट बँक एकत्र आल्यामुळे काँग्रेसला पराभवाची कडवट चव चाखावी लागली. दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी एकदिलाने ही निवडणूक जिंकली.

बंगळुरू शिक्षक मतदारसंघात जेडीएसचे उमेदवार ए. पी. रंगनाथ यांनी काँग्रेसचे विद्यमान आमदार पुट्टण्णा यांचा ९०८ मतांनी पराभव केला. पुट्टण्णा हे मूळचे भाजपचे आमदार होते. २०२३ मध्ये त्यांनी पक्षाचे सदस्यत्व आणि आमदारकीचा राजीनामा दिला, पोटनिवडणूक लढवली आणि ते विजयी झाले; ही जागा काँग्रेसकडे गेली. मतदारांनी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांपेक्षा निष्ठावंत उमेदवारांना कौल दिल्याचे या निकालातून स्पष्ट झाले.

ईशान्य शिक्षक मतदारसंघात भाजपचे शशिल जी. नमोशी यांनी काँग्रेसच्या शरणप्पा मत्तूर यांचा पराभव केला. पश्चिम पदवीधर मतदारसंघात भाजपचे एस. व्ही. संकनूर यांनी काँग्रेसच्या मोहन लिंबिकाई यांचा पराभव केला. दक्षिण-पूर्व पदवीधर मतदारसंघात भाजपचे के. एम. सुरेश यांनी काँग्रेसच्या शशी हुलिकुंटेमठ यांचा पराभव केला.

पदवीधर आणि शिक्षक मतदार हे प्रामुख्याने शहरी, मध्यमवर्गीय आणि सुशिक्षित गटातून येतात. राज्य सरकारच्या आर्थिक धोरणांबद्दल मध्यमवर्ग व शिक्षकांमध्ये असलेली अस्वस्थता, तसेच विकासकामांचा संथ वेग आणि काँग्रेसचे पराकोटीचे तुष्टीकरणाचे राजकारण यांमुळे पदवीधर मतदारांनी भाजप-जेडीएस आघाडीच्या बाजूने कौल दिला.

ईशान्य शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या कलबुर्गी क्षेत्राचा समावेश होतो. तिथेही काँग्रेसचा पराभव झाल्याने स्थानिक पातळीवरील संघटनात्मक कमकुवतपणा उघडा पडला आहे. पूर्ण बहुमत असलेले सरकार राज्यात असतानाही सुशिक्षित मतदारांनी दिलेला हा कौल काँग्रेससाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. कर्नाटक विधान परिषदेतील या ४-० अशा विजयामुळे भाजप आणि जेडीएस युतीला मोठा राजकीय आधार मिळाला आहे.

महाराष्ट्रात फक्त नागपूर पदवीधर मतदारसंघाने काँग्रेसची लाज वाचवली. इथून काँग्रेसचे अभिजित वंजारी विजयी झाले. शरद पवार यांच्या पक्षाने छत्रपती संभाजीनगर आणि पुणे पदवीधर मतदारसंघात विजय मिळवला. इथून अनुक्रमे प्रतापसिंह पाटील आणि हर्षदा देशमुख-जाधव विजयी झाल्या. पुणे शिक्षक मतदारसंघातून भाजपचे कौस्तुभ गावडे आणि अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचे किरण सरनाईक विजयी झाले. गेल्या वेळी या पाचपैकी चार जागा महाविकास आघाडीकडे होत्या. अमरावती शिक्षक मतदारसंघात किरण सरनाईक हे अपक्ष म्हणून विजयी झाले होते, ते यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या तिकीटावर विजयी झाले आहेत. पुणे शिक्षक मतदारसंघ काँग्रेसकडे होता, तो यंदा भाजपाने काबीज केला. गेल्या वेळीचे आकडे पाहिले तर या निवडणुकीत भाजपाने गमावले काहीच नाही.

नागपूर पदवीधर मतदारसंघाची जागा काँग्रेसकडेच होती, ती त्यांनी राखली. हे जरी सत्य असले, तरी नागपूरचा पराभव भाजपाच्या जिव्हारी लागला आहे हे नक्की. नागपूर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे होम पिच आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे. या मतदारसंघात विजय मिळाला नसता, तर काँग्रेसच्या वाट्याला भोपळा आला असता. काँग्रेसची लाज वाचवण्याचे काम या मतदारसंघाने केले आहे. वाराणसीतील शिक्षक मतदारसंघात सपाचा विजय भाजपाला टोचणी लावणारा आहे, कारण हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ आहे.

हे ही वाचा:

नागपूर पदवीधर मतदार संघाने काँग्रेसची लाज राखली

मीनाक्षी शिंदेंचा महिला आघाडी जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा

मॉस्कोच्या दिशेने युक्रेनचे ड्रोन हल्ले

‘JAI’च्या माध्यमातून हिंद-प्रशांतमध्ये सामरिक समीकरणांना बळ

काँग्रेसचे नेते नागपूर आणि वाराणसीतील विजय साजरे करत आहेत. ज्यांच्याकडे जेमतेम पार्श्वभाग झाकण्यापुरती लंगोटी शिल्लक आहे, ते समोरच्याच्या कुर्त्याला रफू केली आहे म्हणून हसत आहेत. राहुल गांधी यांचा पक्ष पराभवाचे चिंतन करणार नाही, नागपूर-वाराणसीतील पराभवाचे निमित्त करून भाजपाची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न करणार, हे समजण्यासारखे आहे. त्यांचा वकूब या पलीकडे नाही. भाजपाची परंपरा मात्र तशी नाही. पराभवाचे चिंतन केल्यामुळेच हा पक्ष दोन जागांवरून देशातील सत्ताधारी पक्ष बनलेला आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्या म्हणण्यानुसार, पुढची तीस वर्षे सत्ता टिकवायची असेल तर नागपूर आणि वाराणसीतील पराभवाचे चिंतन करणे भाग आहे.

कोणताही पक्ष रसातळाला जाण्याची मूलभूत कारणे समानच असतात. जेव्हा पक्षात कार्यकर्त्यांपेक्षा उपऱ्यांचा बोलबोला होतो, निष्ठावंतांपेक्षा दलालांना महत्त्व येते, संघटनेपेक्षा पैसा महत्त्वाचा बनतो, क्षमता असणे ही त्रुटी आणि होयबा असणे ही क्वालिटी बनते आणि मतदारांना गृहीत धरले जाते, तेव्हा पक्षाची घसरण सुरू होते. नागपूर आणि वाराणसीत यापैकी कोणती कारणे लागू होतात, याचा विचार भाजपाचे नेते करतीलच. अनेकदा पराभव होणे ही बाब पथ्यावर पडते; पक्ष असो वा माणूस, ताळ्यावर येतो.

(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version