घरसंपादकीयअब्रु वाचवण्यासाठी ६४ वर्षांनी पुन्हा क्युबा आठवला...

अब्रु वाचवण्यासाठी ६४ वर्षांनी पुन्हा क्युबा आठवला…

अमेरिकेचे हंगामी शक्तिमान, म्हणजे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एकाच वेळी अनेकांशी पंगा घेताना दिसत आहेत. इराणच्या दिशेने त्यांनी नौदलाचा बडा ताफा रवाना केला आहे, अमेरिकेचा सख्खा शेजारी असलेल्या कॅनडावर ५० टक्के टेरीफ लादले आहे. त्याच वेळी त्यांनी क्युबाला धमकावले आहे. क्युबा जवळ एकही रशियन जहाज फिरकू नये म्हणून १९६२ मध्ये क्युबाची नौदल कोंडी करणारा अमेरिका पुन्हा एकदा तेच करताना दिसतो आहे. एकही तेलवाहू जहाज क्युबाच्या दिशेने फिरकू नये म्हणून ट्रम्प यांनी मेक्सिकोला पुन्हा टेरीफची धमकी दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या सगळ्या कवायती अब्रु वाचवण्यासाठी चालल्या आहेत, असे मानायला वाव आहे.

दक्षिण अमेरिकेत गेल्या काही वर्षात चीनने मारलेली मुसंडी थोपवण्यासाठी ट्रम्प यांनी या क्षेत्राकडे नजर वळवली. व्हेनेझुएलापासून सुरूवात केली. राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक केली. डोळ्यावर काळी पट्टी आणि हातात बेड्या घालून अमेरिकेपर्यंत त्यांची धिंड काढली. क्युबा हे त्यांचे लॅटीन अमेरिकेतील दुसरे लक्ष्य बनले आहे. अमेरिकेपासून हाकेच्या अंतरावर असलेला हा छोटासा देश पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

हे ही वाचा:

सेन्सेक्स–निफ्टीत घसरण

महमूद गझनी ‘परकीय आक्रमक नाही, तर हिंदुस्तानी लुटारू’

शाळांमध्ये विद्यार्थिनींना मिळणार मोफत सॅनिटरी नॅपकिन्स

ॲपलचा फोल्डेबल आणि प्रीमियम आयफोनवर अधिक भर

जगातील देशांना धमकावायचे, त्यांना घाबरगुंडी उडालेले पाहून मजा घ्यायची हा ट्रम्प यांचा शौक बनलेला दिसतो. गेल्या वर्षभरात याचा इतका अतिरेक झालाय की, आता त्यांच्या धमक्यांचा परिणाम बोथट होत चाललेला आहे. रोज मरे त्याला कोण रडे या उक्तीनुसार लोक आता या धमक्या फार गंभीरपणे घेताना दिसत नाहीत.

भारताने युरोपियन युनियनसोबत केलेल्या मुक्त व्यापार करारामुळे ट्रम्प प्रचंड बिथरले आहेत. ट्रम्प यांचा एक मोठा पॉवर गेम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकही शब्द न बोलता उलटवला. न बोलता कार्यक्रम करण्याच्या या मोदी डॉक्ट्रीनवर तमाम ट्रम्प विरोधक खूष आहेत. भारतावर ५०० टक्के टेरीफ लादण्याच्या घोषणेकडे मोदी सरकारने साफ दुर्लक्ष केले. युरोपियन युनियनशी करार करून ट्रम्प यांना चोख उत्तर दिले.

युरोप म्हणजे अमेरिकेची तैनाती फौज. ही अवघी फौज आपल्या दिशेने वळवण्याचा चमत्कार भारताने केला हे ट्रम्प यांना कसे काय पचवता येईल ? हा करार केल्यानंतर झालेली पोटदुखी जाहीर करण्यासाठी भारतावर टीका करून उपयोग नाही, हे त्यांना अनुभवावरून लक्षात आलेले आहे. कारण मोदी उत्तरच देत नाहीत. त्यामुळे या फजितीवरून जगाचे लक्ष इतरत्र वळवायचे असेल तर काही तरी धमाका केला पाहीजे, हे लक्षात आल्यामुळे ट्रम्प जोरजोरात आदळआपट करतायत. एका पाठोपाठ एक चुका करतायत.

आधी एअरक्राफ्ट कॅरीअर अब्राहम लिंकन इराणच्या दिशेने रवाना झाली असल्याचे त्यांच्या ट्रुथ सोशलवरून जाहीर केले. इराण चळाचळा कापेल आणि गयावया करेल असा ट्रम्प यांचा होरा होता. तसे काहीच घडताना दिसत नाही. गुरुवारी त्यांना क्युबाला तेल पुरवठा करणाऱ्या देशांना धमकावणाऱ्या एक्झिक्युटीव्ह ऑर्डरवर ट्रम्प यांनी सही केली. क्युबाही नमते घेताना दिसत नाही. सतत चर्चेच्या केंद्रस्थानी राहण्याचा ट्रम्प यांचा प्रय़त्न आहे.

ट्रम्प यांच्याकडे प्रेसिशन स्ट्राईक करणारे एकही राजकीय हत्यार आहे, असे दिसत नाही. अचूक हल्ला अनेकदा आवश्यक असतो. जेणे करून शंभराच्या गर्दीत एकाला लोळवता येते. ज्याला ठोकायचे आहे त्याच्या डोक्यात गोळी घालायची आणि खेळ खल्लास. आजूबाजूच्याला धक्काही लागत नाही. स्नायपर सारखे अचूक हत्यार यासाठी वापरतात. राजकारणातही असे हल्ले अनेकदा आवश्यक असतात. असे हल्ले करण्याचे कौशल्य ट्रम्प यांच्याकडे नाही. एकाला हाणताना ते आणखी दहाजणांना धक्के देतात. क्युबाला धमकावताना त्यांनी मेक्सिकोलाही दणका दिला आहे. क्युबाला व्हेनेझुएलाकडून सुमारे ५० टक्के तेलाचा पुरवठा होत होता. मादुरो यांच्या अपहरणानंतर तो बंद झाला. आता ती जागा मेक्सिकोने घेतली आहे.

क्युबाला तेल पुरवठा करणाऱ्या देशांवर टेरीफ लादण्याची धमकी ही खरेतर मेक्सिकोला देण्यात आलेली धमकी आहे. ट्रम्प यांची खुनशी नजर आपल्याकडे वळली आहे हे मेक्सिकोला ठाऊक आहे. कारण मादुरो यांना उचलल्यानंतर ट्रम्प यांनी मेक्सिकोला दम दिला होता. मेक्सिको हा चांदीचा क्रमांक एकचा उत्पादक देश आहे. ही चांदी लाटण्यासाठी ट्रम्प यांना कोणतेही कारण पुरे हे ठाऊक असल्यामुळे मेक्सिकोने आधीच खबरदारी घ्यायला सुरूवात केलेली आहे. डिसेंबर महिन्यापासून क्युबाला होणारा तेल पुरवठा कमी केलेला आहे.

दुसऱ्या महायुद्धानंत रशिया आणि अमेरिकेच्या दरम्यान शीतयुद्ध तीव्र झालेले असताना १९६२ मध्ये क्युबा क्रायसिस घडला होता. क्युबामध्ये कम्युनिस्ट क्रांति करून १९५९ मध्ये सत्तेवर आलेले फिडेल क्रॅस्टो यांचे सरकार कम्युनिष्ट रशियाला धार्जिणे असल्याची खात्री झाल्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन.एफ.केनेडी यांनी १९६१ मध्ये हे सरकार उलथवण्याचा प्रयत्न केला. रशियाला हे लक्षात आल्यानंतर त्यांनी क्युबामध्ये अण्वस्त्रांचा तळ उभारला. अमेरिकेची न्यूयॉर्क, मियामी आणि राजधानी वॉशिंग्टन या अण्वस्त्रांच्या टप्प्यात होती. अमेरिकेच्या हेरगिरी विमानांनी हे हेरल्यानंतर अमेरिकेने तात्काळ पावले उचलत क्युबाची नौदल कोंडी केली. क्युबाच्या दिशेने एकही रशियन जहाज फिरकून नये यासाठी फिल्डींग लावली. यामुळे राजकारणाचा पारा चढला. कोणत्याही क्षणी अणुयुद्ध भडकणार अशी शक्यता निर्माण झाली होती. सुदैवाने ऐनवळी दोन्ही देशांनी माघार घेतली. रशियाने क्युबामधून क्षेपणास्त्रे काढून घेतली. अमेरिकेने क्युबामध्ये सरकार उलथवणार नाही, असे आश्वासन दिले. ६४ वर्षांनंतर पुन्हा त्याच क्युबाची कोंडी करण्याचा प्रय़त्न अमेरिकेकडून होतो आहे.

क्युबाची आर्थिक स्थिती डळमळीत झालेली आहे. तेल उत्पादन कमी झाले आहे. देशात केवळ १५ दिवस पुरेल असा तेलाचा साठा शिल्लक आहे, अशा परिस्थितीत जर तेल पुरवठा खंडीत झाला. तर देशात मोठे ऊर्जा संकट निर्माण होईल. सगळा देश ठप्प होईल, देशाची जनता सरकारच्या विरोधात उठाव करेल असा हिशोब या तेल कोंडीच्या मागे आहे. सगळीकडे अमेरिकेचा तेलाचा खेळ दिसतो. प्रत्येक ठिकाणी देशाच्या आर्थिक नाड्या आवळून त्या देशाला गुडघ्यावर आणायचे ही अमेरिकेची रणनीती आहे.

इराण, रशिया, व्हेनेझुएलाच्या तेलावर निर्बंध लादले. जगाने या देशांकडून तेल विकत घ्यायचा नाही, असे फतवे काढले. या मागे एकच हिशोब होता की, या देशांचे अर्थकारण कोसळावे, सर्वसामान्य लोकांना त्याची झळ बसावी. सैरभैर झालेल्या लोकांनी सरकारवर त्याचे खापर फोडावे आणि उठाव करावा. इराणमध्ये अलिकडे मोठे जनआंदोलन झाले. कुठे तरी ठिणगी पडली होती, अमेरिकेने त्यात तेल ओतले आणि वणवा पेटवला. हा वणवा आता शांत झाला आहे. तेव्हा अमेरिका आता पुन्हा इराण अणुसज्जता नष्ट करा अन्यथा हल्ला करू अशी धमकी देतो आहे. इराणवर अमेरिकेने हल्ला केल्यास अराजक माजेल, आखातात त्याचे अत्यंत गंभीर परीणाम होतील असा इशारा रशियन सरकारचे प्रवक्ते ड्रिमिटी पेस्कोव्ह यांनी दिलेला आहे. त्यामुळे ट्रम्प यांची पंचाईत झाली आहे. फौजफाट्यासह उतरलेल्या अब्राहम लिंकनला आता हात चोळत माघारी बोलवावे लागेल. ट्रम्प यांची पुरती गोची झालेली आहे. त्यामुळे त्यांनी तोफेची दिशा बदलून आता क्युबाकडे वळवली आहे.
म्हणजे जगाचे इराणवर असलेले लक्ष क्युबाकडे वळेल आणि इराणमध्ये होऊ घातलेल्या बेईज्जतीची चर्चा थोडी कमी होईल.

क्युबाचे राष्ट्राध्यक्ष मिग्वेल डीयाझ कॅनल यांनी क्युबाच्या परंपरेप्रमाणे अमेरिकेला करारी उत्तर दिले आहे. क्युबा हा स्वतंत्र आणि सार्वभौम देश आहे, आम्ही काय करायचे ते कोणताही देश आमच्यावर लादू शकणार नाही.
क्युबासारख्या देशावरही ट्रम्प यांची मात्रा चालेनाशी झालेली आहे. प्रत्येक ठिकाणी टेरीफची मात्रा चालत नाही, हे भारताच्या उदाहरणावरून आता स्पष्ट झालेले आहे. मग आपल्या विरोधात जाणाऱ्या प्रत्येक देशाला नमवण्यासाठी ट्रम्प आता लष्करी कारवाई करणार आहेत का, असा सवाल निर्माण झालेला आहे.

अमेरिकेला आर्थिक डबघाईपासून रोखण्यासाठी ट्रम्प यांचा हा सगळा आटापिटा सुरू आहे, असे म्हणायलाही वाव नाही, कारण अमेरिकी अर्थकारणाचे काही भले होत असल्याची चिन्ह दिसत नाहीत. ट्रम्प यांच्या सगळ्या उचापतींच्या मागे फक्त त्यांचा अहंकार आहे. हा अंहकार कुरवाळण्यासाठी ते अमेरिकेला खड्ड्यात घालत आहेत. एक दिवस अमेरिकी जनतेलाच याचा जाब विचारण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागणार आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version