लोकसभा मतदार संघ पुनर्रचना विधेयकाला विरोधी बाकावरील दोन पक्षांनी जाहीरपणे पाठिंबा जाहीर केला आहे. महाराष्ट्रात शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि तामिळनाडूमध्ये द्रमुकचा यात समावेश आहे. द्रमुकने या विधेयकाला पाठींबा देऊन काँग्रेसचा वचपा काढला आहे. केंद्रातील सत्तेवर तिसऱ्यांदा विराजमान असलेल्या भाजपाकडे आज स्वत:चे बहुमत नाही. तरीही दोन तृतीयांश बहुमताची गरज असलेले हे विधेयक मंजूर करून घेण्यात भाजपाला यश येईल, या ऐतिहासिक विधेयकाची नाव पैलतीरी लागेल असे स्पष्ट चित्र दिसते आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी इतकाच काँग्रेस नेते राहुल गांधी यांचाही हातभार आहे. ही तर सुरूवात आहे, प्रत्यक्ष मतदान होईल तेव्हा काँग्रेससाठी बरेच धक्केबुक्के बसणार आहेत.
३० नोव्हेंबर पासून संसदेच्या विशेष सत्राला सुरुवात होते आहे. गेल्या वेळी १७ एप्रिल रोजी संसदेत हे विधेयक मंजूर करून घेण्यात सत्ताधारी मोदी सरकार अपयशी ठरले होते. परंतु त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे.
सध्या आहेत त्या ५४३ खासदारांमध्ये महिलांना एक तृतीयांश आरक्षण द्यावे आणि लोकसभेतील खासदारांची संख्या २५ वर्षे तशीच ठेवावी ही काँग्रेसची मागणी होती. खरे तर ही मागणी नव्हती तर आडमुठेपणा होता. लोकसभेतील निवडून येणाऱ्या खासदारांची संख्या शेवटची १९७३ च्या परिसीमन आयोगाच्या शिफारशीनुसार वाढवण्यात आली होती. ही वाढ १९७१ च्या जनगणनेच्या आधारे करण्यात आली होती आणि ती मार्च १९७७ च्या लोकसभा निवडणुकीपासून प्रत्यक्षात लागू झाली. या प्रक्रियेदरम्यान लोकसभेची सदस्यसंख्या ५२२ वरून ५४२ करण्यात आली आणि नंतर सिक्कीम राज्याच्या समावेशानंतर ती ५४३ झाली. तेव्हापासून आजतागायत लोकसभेच्या निवडून येणाऱ्या जागांची संख्या ५४३ वरच स्थिर आहे.
१९७७ नंतर गेल्या ४९ वर्षात देशाची लोकसंख्या वाढली. मतदारांची संख्या वाढली. परंतु काँग्रेसला खासदारांची संख्या वाढवायची नाही. गेल्या वेळी हे विधेयक रोखण्यात काँग्रेसला यश आले. परंतु राहुल गांधी यांनी पायावर धोंडा मारून घेतला आणि भाजपाचे काम सोपे केले.
हे ही वाचा:
बांद्रा टर्मिनसवर ७५ दिवसांचा ब्लॉक
थिरुपरनकुंद्रम टेकडीवरील दीपस्तंभावर उत्साहात झाले दीपप्रज्ज्वलन
‘८५०’चा आकडा लोकशाही संपुष्टात आणण्यासाठी
उत्तर प्रदेशचे विभाजन न करताच विधानसभेतील जागा वाढणार
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर राहुल गांधी यांनी टीचभर सत्तेसाठी केलेली खेळी काँग्रेसला जबर शेकली आहे. राहुल गांधींनी त्यावेळी द्रमुकची साथ सोडली नसतील तर कदाचित मतदार संघ पुनर्रचना विधेयकाबाबत भाजपाचे पारडे आज जड दिसले नसते. काँग्रेसच्या तंबूत पूर्ण घबराट आहे. आज काँग्रेस पक्षाने बोलावलेल्या विरोधी दलांच्या बैठकीत द्रमुक आणि शरद पवारांचा पक्ष अनुपस्थित राहिला. जे आले होते त्यातले किती प्रत्यक्ष मतदानाच्या वेळ साथ देतील याची शाश्वती नाही. प्रत्येक पक्ष जर तर च्या भाषेत बोलतो आहे.
तामिळनाडूवर अन्याय होत असेल तर आम्ही विरोध करू अशी भूमिका द्रमुकने घेतली होती. अमित शहा थेट या पक्षांशी संपर्क साधत होते. ते म्हणाले कोणताही अन्याय होणार नाही. द्रमुकने जाहीर केले आहे, लोकसभेतील तामिळनाडूचे प्रतिनिधित्व बदलणार नाही. त्यामुळे आमचा पाठिंबा आहे. झारखंड मुक्ती मोर्चाही आता हीच भाषा बोलतो आहे.आदिवासींवर अन्याय होत असेल तर आम्ही विधेयकाला विरोध करू, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
उद्या ते विधेयकाच्या बाजूने मतदान करतील सांगतील, अन्याय होणार नाही, असे आम्हाला आश्वासन मिळाले आहे, त्यामुळे आम्ही मतदान केले. द्रमुक संसदीय दलाच्या बैठक झाली. पक्षाचे नेते एम.के.स्टॅलिन बैठकीत जे काही बोलले त्यावरून राहुल गांधी यांनी दिलेली जखम आजही कशी भळभळते आहे, हे स्पष्ट झाले. मतदार संघाची पुनर्रचना करताना तामिळनाडूकडे असलेले लोकसभेचे ७.१८ टक्के प्रतिनिधित्व कमी होता कामा नये, ही द्रमुकची भूमिका होती. ती भूमिका मोदी सरकारने मान्य केली. त्यानंतर संसदीय दलाच्या बैठकीत विधेयकाला पाठींबा देण्याची भूमिका जाहीर करताना स्टॅलिन म्हणाले.
दरम्यान, स्टॅलिन यांनी स्पष्ट केले की, विधेयकावरील त्यांच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही आणि कोणत्याही परिस्थितीत लोकसभेतील तमिळनाडूच्या जागांचा ७.१८ टक्के हिस्सा कमी होता कामा नये. “भूमिकेत कोणताही बदल नाही, कोणतीही तडजोड नाही; द्रमुक तमिळनाडूच्या हिताशी कधीही तडजोड करणार नाही आणि आपल्या तत्त्वांपासूनही ढळणार नाही,” असे स्टॅलिन म्हणाले. काँग्रेसवर टीका करताना ते पुढे म्हणाले, “सत्तेच्या पदांसाठी आपली तत्त्वे सोडून देणाऱ्या निर्लज्ज आणि कृतघ्न लोकांनी हे लक्षात घेतले पाहिजे.”
स्टॅलिन निर्लज्ज आणि कृतघ्न काँग्रेस पक्षाला म्हणालेले नाहीत. ते राहुल गांधी यांना म्हणाले आहेत. स्टॅलिन यांनी घेतलेली भूमिका ही राजकीय कमी आणि भावनिक जास्त आहे.
राहुल गांधींनी ज्या टीव्हीकेच्या मांडीवर काँग्रेसला बसवले, त्यांच्याकडे लोकसभेत एकही सदस्य नाही. द्रमुक वाचून अडणार हे जेव्हा राहुल गांधी यांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी ममता बॅनर्जी यांना शिष्टाईसाठी कामाला लावले. ममतांचे सध्या त्यांच्या राज्यातील आणि पक्षातील लोक मनावर घेत नाहीत, स्टॅलिन कशाला घेतील? त्या आधी काव्या मारनच्या विवाहाचे निमंत्रण देण्यासाठी कलानिधी मारन आणि कावेरी मारन यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली. तेव्हाही सोनिया गांधी यांनी त्यांना पुनर्रचना विधेयकावरून समजवण्याचा प्रयत्न केला. कलानिधी यांनी राहुल गांधी यांच्या प्रतापांची आठवण करून देऊन त्यांचे तोंड बंद केले. अर्थात या सगळ्या चर्चा सुत्रांच्या माहितीवरून आहेत. परंतु दिल्लीत अशा चर्चा प्रत्येक वेळी वावड्या असतात असे नाही.
१७ एप्रिल २०२६ रोजी लोकसभेत मांडलेल्या पहिल्या मतदार संघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयकावर म्हणजे संविधानाच्या १३१ व्या दुरुस्ती विधेयकावर झालेल्या मतदानात विधेयकाच्या बाजूने २९८ मते, तर विरोधात २३० मते पडली होती.
त्या दिवशी सभागृहात उपस्थित असलेल्या आणि मतदान केलेल्या एकूण ५२८ खासदारांपैकी विधेयक मंजूर होण्यासाठी दोन-तृतीयांश बहुमतानुसार किमान ३५२ मतांची गरज होती. केवळ २९८ मते मिळाल्याने विधेयक ५४ मतांनी फेटाळले गेले होते. आता रिक्त जागा गृहित धरून विधेयक मंजूर होण्यासाठी ३५८ मतांची गरज आहे.
एप्रिलनंतर विरोधी गटातील २६ खासदार एनडीएच्या बाजूने वळले आहेत. यामध्ये तृणमूल काँग्रेसचे २० बंडखोर खासदार, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ६ खासदार जे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील झाले, त्यांचा समावेश आहे. यामुळे एनडीएचे स्वतःचे संख्याबळ ३२० खासदारांपर्यंत पोहोचले आहे.
त्यात आता द्रमुकचे – २२ खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवारचे ८ खासदारांची भर पडलेली आहे. उर्वरित १० मतांसाठी सरकारची भिस्त अपक्ष, वायएसआर काँग्रेस, बिजू जनता दल, जेएमएम, नॅशनल कॉन्फरन्स यांच्यावर आहे.
लोकसभेत खासदारांची संख्या वाढली पाहिजे कारण लोकसंख्या आणि मतदारांची संख्या वाढली आहे. महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी महिलांना अधिक प्रतिनिधित्व दिले पाहिजे, या विषयाचा ना कोणत्या विचारधारेशी संबंध आहे, ना कोणत्या धर्म किंवा जातीशी. तो जोडण्याचा प्रयत्न राहुल गांधी करतायत. मतदार संघांची पुनर्रचना करणे म्हणजे संविधान बुडवणे असा प्रचार आता काँग्रेसवाले करतायत. पक्षाचे सरचिटणीस के.सी.वेणूगोपाल यांनी द्रमुक हा पक्ष कायम घटनेच्या रक्षणासाठी उभा ठाकला आहे, असे गूळ लावण्याचा प्रयत्न केला. परंतु हा प्रचार काही टिकणार नाही. यापूर्वीही मतदार संघांची पुनर्रचना झालेली आहे. ती नेहरुंच्या काळात झालेली आहे.
डाव्यांच्या इको सिस्टीमचा अविभाज्य भाग असलेले निवृत्त न्या. बी.जी.कोळसे म्हणतात की, हा संघाचा कट आहे. २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत हरणार याची खात्री झाल्यामुळे भाजपावाले मतदार संघांची संख्या वाढवून सत्ता टिकवण्याचा प्रय़त्न करतायत. संघ आणि ब्राह्मणांची सत्ता प्रदीर्घ काळ टिकवण्याचा हा कट आहे. अगदीच कोणताही तर्क उरला नाही की डावे संघ आणि ब्राह्मणांवर घसरत असतात. हा तर्क पुढे आलेला आहे, याचा अर्थ काँग्रेसला पराभवाची खात्री झालेली आहे. कोळसेंवर विश्वास ठेवायचा तर पुनर्रचना विधेयक मंजूर झाले तर २०२९ मध्ये भाजपाची पुन्हा सत्ता येते आहे.
(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
