सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार अखेर मदुराईच्या थिरुपरनकुंद्रम टेकडीवरील दीपथून या दगडी स्तंभावर दीप प्रज्ज्वलन अत्यंत जल्लोषात आणि उत्साहात करण्यात आले. २८ नोव्हेंबरला हे दीप प्रज्ज्वलन व्हायला हवे असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर तो कार्यक्रम उत्साहात पार पडला. सुब्रमण्यम स्वामी मंदिरासाठी नियुक्त केलेले दोन प्रशासक अर्थात मद्रास उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीशही कार्यक्रमाला उपस्थित होते.
टेकडीच्या माथ्यावर झालेल्या या धार्मिक सोहळ्याला केवळ ५० भाविकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, सकाळपासूनच हजारो भाविक टेकडीच्या पायथ्याशी जमले होते. दीप प्रज्वलित होताच काही भाविक भावूक झाले, तर काहींनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.
या सोहळ्यासाठी पोलिसांचे अधिकार न्यायालयाने काढून घेतले होते आणि सीआरपीएफकडे सुरक्षेचे सगळे अधिकार सोपवले होते. सीआरपीएफचे पथक इथे आल्यावर लोकांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले. पेढे वाटले.
अरुळमिगू सुब्रमण्यस्वामी मंदिराचा कारभार पाहण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेले उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती एस. वैद्यनाथन आणि व्ही. पार्थिबन शनिवारी चेन्नईहून मदुराईत दाखल झाले. पारंपरिक वाद्यांच्या गजरात ते मातीचे दिवे, वात आणि तूप घेऊन टेकडीच्या पायथ्याशी पोहोचले. त्यानंतर त्यांनी या वस्तू मंदिर प्रशासनाकडे सुपूर्द केल्या.
हे ही वाचा:
बांद्रा टर्मिनसवर ७५ दिवसांचा ब्लॉक
१९८० मध्ये भारतीय नागरिकत्व नसतानाही सोनियांचे नाव मतदार यादीत!
खर्गे म्हणतात, अनुसूचित जाती-जमातींच्या विरोधात पुनर्रचना विधेयक
अफगाणिस्तानमध्ये शाळेत भीषण स्फोट
मंदिरात पूजा केल्यानंतर दोन्ही न्यायमूर्तींनी पुजाऱ्यांकडे तांब्याचे पारंपरिक पात्र म्हणजेच ‘कोप्परई’ सुपूर्द केले. पुजाऱ्यांना हे पात्र दगडी स्तंभाच्या माथ्यावर ठेवता यावे, यासाठी कर्मचाऱ्यांनी तात्पुरते व्यासपीठ आणि बांबूंचे मचाण उभारले होते. दीप प्रज्वलित करण्यासाठी सुमारे ३० ग्रॅम तूप, ५० मीटर लांबीची सुती वात आणि पाच किलो कापूर तयार ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले.
शनिवारी सकाळी सीआरपीएफच्या एका तुकडीने रॅपिड ऍक्शन फोर्सच्या जवानांसह टेकडीवरील सुरक्षेची जबाबदारी स्वीकारली. पोलिसांनी टेकडीच्या पायथ्याशी तसेच दीपस्तंभाकडे जाणाऱ्या मार्गावर बॅरिकेड्स लावले होते. सोहळ्यापूर्वी भाविकांची गर्दी वाढू लागल्यानंतर प्रवेशावरून भाजप कार्यकर्ते आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाल्याचेही समोर आले. स्थानिक प्रशासनाने वैद्यकीय पथके आणि रुग्णवाहिकांची व्यवस्था केल्याचे सांगितले.
याचदरम्यान त्याच टेकडीवर असलेल्या दर्ग्यात दर्शनासाठी पर्यटक येत होते. त्यांचीही व्यवस्था करण्यात आली.
एएनआयने प्रसारित केलेल्या दृश्यांमध्ये सीआरपीएफचे जवान आणि त्यांची वाहने टेकडीवर पोहोचत असताना स्थानिक नागरिक आणि हिंदू भाविक त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत असल्याचे दिसून आले.
हजरत सुलतान सिकंदर बादुशा औलिया दर्ग्याच्या परिसरात दीप प्रज्वलनासाठी सीआरपीएफने ५० मीटरचे सुरक्षित अंतर निश्चित केले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार दर्ग्यात जाण्याचा मार्ग खुला ठेवण्यात आला होता. दीपम प्रज्वलनाची तयारी सुरू असतानाच भाविकांनी दर्ग्यात जाऊन प्रार्थनाही केली.
