अफगाणिस्तानमध्ये शाळेत झालेल्या भीषण स्फोटात किमान सहा जणांचा मृत्यू झाला असून जवळपास १०० जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. पूर्व अफगाणिस्तानातील कुनार प्रांतात शनिवारी (२८ नोव्हेंबर) ही घटना घडली. या स्फोटामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, स्फोट नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही.
माहितीनुसार, कुनार प्रांतातील एका शाळेत हा स्फोट झाला. या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त असून जखमींची संख्या १०० च्या जवळपास असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना घडल्यानंतर स्थानिक प्रशासन आणि तपास यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. स्फोटाचे स्वरूप आणि त्यामागील कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, कुनार प्रांतातील पोलिस प्रवक्ते फरीद देहकान यांनी शाळेत स्फोट झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांच्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास आंदार सेर परिसरातील एका माध्यमिक शाळेत हा स्फोट झाला. या घटनेत काही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले.
हे ही वाचा :
चीनच्या साथीने पाकिस्तानची अंतराळ सज्जता भारतासाठी धोक्याची घंटा!
डिलिमिटेशन विधेयकाला द्रमुकचा पाठिंबा
संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त दिल्लीत ५६ एकरांवर ‘राष्ट्र वंदनम्’
मुंबईतील बॉम्बस्फोट धमक्यांमागे बनावट ई-मेलचे जाळे
कुनार हा अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील आणि पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेला प्रांत आहे. त्यामुळे या भागातील सुरक्षा परिस्थितीही संवेदनशील मानली जाते. यापूर्वी ऑगस्ट महिन्यात काबूलमधील एका शाळा संकुलात झालेल्या हँडग्रेनेड हल्ल्यात ४० हून अधिक मुले जखमी झाली होती.
