चीनच्या मदतीने पाकिस्तान आपली अंतराळ आणि लष्करी उपग्रह क्षमता वेगाने विकसित करत आहे. त्यातच पाकिस्तानला तुर्कियेकडूनही तांत्रिक मदत मिळण्याची शक्यता असल्याने भारतासमोर नवे सुरक्षा आव्हान निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर भारताने आपली अंतराळ आधारित लष्करी क्षमता अधिक मजबूत करण्याची गरज आहे, असे मत संरक्षण दलप्रमुख (सीडीएस) जनरल एन. एस. राजा सुब्रमणी यांनी व्यक्त केले. नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
पाकिस्तानची अंतराळ संशोधन संस्था ‘सुपार्को’ स्वतःची क्षमता विकसित करण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र, चीनच्या मदतीमुळे पाकिस्तानला गुप्तचर माहिती संकलन, देखरेख आणि टेहळणी (आयएसआर), स्थान निश्चिती आणि दिशादर्शन यांसारख्या तंत्रज्ञानाचा फायदा मिळत आहे. भविष्यात तुर्कियेकडूनही त्याला मदत मिळू शकते. त्यामुळे भारताला आपल्या संरक्षण नियोजनात या बदलांचा विचार करावा लागेल, असे सुब्रमणी यांनी स्पष्ट केले.
५२ लष्करी उपग्रहांचे जाळे उभारणार
पाकिस्तानच्या वाढत्या क्षमतेच्या पार्श्वभूमीवर भारतानेही अंतराळ आधारित संरक्षण यंत्रणा मजबूत करण्यासाठी पावले उचलली आहेत. ‘स्पेस बेस्ड सर्व्हेलन्स’ (एसबीएस) फेज-३ या प्रकल्पांतर्गत पुढील तीन वर्षांत ५२ लष्करी निरीक्षण आणि टेहळणी उपग्रह अवकाशात सोडण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पासाठी २६ हजार ९६८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या ५२ उपग्रहांपैकी २१ उपग्रह इस्रो तयार करणार असून, उर्वरित ३१ उपग्रहांची निर्मिती आणि प्रक्षेपण खासगी कंपन्यांच्या माध्यमातून केले जाणार आहे. त्यामुळे संरक्षण क्षेत्रातील स्वदेशी उत्पादन आणि खासगी उद्योगांचा सहभाग वाढणार आहे.
हे ही वाचा :
डिलिमिटेशन विधेयकाला द्रमुकचा पाठिंबा
संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त दिल्लीत ५६ एकरांवर ‘राष्ट्र वंदनम्’
मुंबईतील बॉम्बस्फोट धमक्यांमागे बनावट ई-मेलचे जाळे
पक्ष फोडणाऱ्यांच्या चरणाशी जाणे म्हणजे स्वाभिमान गहाण ठेवणे
गौतम अदानींनी घेतली शरद पवारांची भेट
स्वदेशी तंत्रज्ञानावर भर
भारताने केवळ उपग्रहांची संख्या वाढवण्याऐवजी स्वतःचे उपग्रह तयार करण्याची आणि त्यांचे प्रक्षेपण करण्याची क्षमता विकसित करणे आवश्यक आहे, असे सुब्रमणी यांनी सांगितले. आधुनिक युद्धात अंतराळ तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली आणि सायबर संरक्षण महत्त्वाचे ठरत आहेत. त्यामुळे तिन्ही संरक्षण दलांमध्ये समन्वय वाढवून आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यावर भारताचा भर असल्याचेही त्यांनी नमूद केले.
