मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांना बॉम्बस्फोटाच्या धमक्या देण्यासाठी बनावट ई-मेल आयडीचा वापर करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी उत्तर प्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अंकित शंखवार (२४) याला अटक केली आहे. त्याने बनवलेले बनावट ई-मेल आयडी बांगलादेशी नागरिकाला पुरवल्याचा आरोप आहे. या व्यवहारातून त्याला ५० हजार अमेरिकन डॉलर मिळाल्याचा दावा एटीएसने केला आहे.
माहितीनुसार, मुंबईतील महापालिका मुख्यालय, मेट्रो स्थानके, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) आणि ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील बंगल्याला १२ नोव्हेंबर रोजी बॉम्बस्फोटाच्या धमक्या देणारे ई-मेल पाठवण्यात आले होते. या ई-मेलसाठी वापरण्यात आलेले आयडी अंकितने तयार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याने हे आयडी बांगलादेशातील एका व्यक्तीला विकल्याचा संशय आहे. या व्यवहारात तुर्किये आणि इजिप्तमधील स्रोतांकडून पैसे मिळाल्याचेही एटीएसने म्हटले आहे.
बनावट ई-मेल आयडी तयार करण्याचे नेटवर्क
अंकित बनावट ई-मेल आयडी तयार करून त्यांची विक्री करणारे नेटवर्क चालवत असल्याचा आरोप आहे. त्याने वाय-फाय आणि प्रॉक्सी नेटवर्कचा वापर करून बनावट ओळखीने ई-मेल खाती तयार केली होती. या खात्यांची विक्री करण्यासाठी तो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील समूहांचा वापर करत होता. त्याच्या लॅपटॉप आणि मोबाइलमधून मोठ्या प्रमाणात ई-मेल आयडींची माहिती मिळाल्याचे तपास यंत्रणांनी सांगितले आहे.
हे ही वाचा :
पक्ष फोडणाऱ्यांच्या चरणाशी जाणे म्हणजे स्वाभिमान गहाण ठेवणे
गौतम अदानींनी घेतली शरद पवारांची भेट
पवारांचा इतिहास पाठीत खंजीर खुपसणारा!
जैश संबंधित संशयिताला दिल्लीतून अटक
दरम्यान, मुंबईतील धमकीच्या ई-मेल प्रकरणात आणखी एका संशयिताची चौकशी सुरू आहे. अमेरिकेत कार्यरत असलेल्या शरत सुब्रमण्यम शंकर (२८) याला तमिळनाडू पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याने देशातील विविध संस्थांना सुमारे १,५०० बनावट धमकीचे ई-मेल पाठवल्याचा संशय आहे. मुंबई पोलिसांकडून या दोन्ही संशयितांचे परस्पर संबंध आणि धमकीच्या ई-मेलमागील मोठ्या नेटवर्कचा तपास केला जात आहे.
