राज्य अजिंक्यपदाच्या रणांगणात पहिल्याच दिवशी प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारत धाराशिव, पुणे आणि मुंबई, उपनगरच्या संघांनी विजयी सलामी दिली. धाराशिवच्या महिला संघाने सलग दोन विजयांची नोंद करत बाद फेरीतील प्रवेश निश्चित केला, तर पुणे मुंबई व उपनगरच्या संघांनी प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवले. रत्नागिरीच्या महिला संघाने नांदेडचा ६४-६ असा धुव्वा उडवत ५८ गुणांच्या फरकाने विजय मिळवला. सांगली, सोलापूर, ठाणे संघांनीही पहिल्या दिवशी विजयाची नोंद करत स्पर्धेत दमदार सुरुवात केली. महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने आणि अहिल्यानगर जिल्हा खो-खो असोसिएशनच्या सहकार्याने एकलव्य क्रीडा मंडळाच्या वतीने स्व. अरुणकाका जगताप क्रीडा नगरी, न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, अहिल्यानगर येथे ६२ वी पुरुष-महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा सुरू झाली.
महिला गटात धाराशिवने सलामीच्या सामन्यात पालघरवर ३४-१० असा एक डाव राखून २४ गुणांनी विजय मिळवला. मैथिली पवारने अष्टपैलू कामगिरी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. दुसऱ्या सामन्यात धाराशिवने परभणीवर ४३-८ असा एक डाव राखून दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात सुहानी धोत्रे हिने आक्रमण आणि संरक्षणात प्रभावी कामगिरी केली. सलग दोन विजयांसह धाराशिवच्या महिला संघाने बाद फेरीत स्थान निश्चित केले. पुरुष गटातही धाराशिवने छत्रपती संभाजीनगरवर ४३-१६ अशी २७ गुणांनी मात केली.
हे ही वाचा:
काँग्रेसने जुनी मानसिकता बदलून विधेयकाला पाठिंबा द्यावा!
डिलिमिटेशन विधेयकासाठी विरोधकांची साथ सरकारच्या पारड्यात!
संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त दिल्लीत ५६ एकरांवर ‘राष्ट्र वंदनम्’
ऊर्जा क्षेत्रात २०० लाख कोटींच्या गुंतवणुकीची संधी
पुण्याच्या महिला संघाने लातूरवर ५६-१० असा ४६ गुणांनी एक डाव राखून विजय मिळवत आपल्या आक्रमणाची ताकद दाखवली. पुरुष गटात पुण्याने जळगाववर ४०-२२ असा १८ गुणांनी एक डाव राखून विजय मिळवला.
मुंबई उपनगरच्या महिला संघाने हिंगोलीवर ४४-१२ असा एक डाव राखून विजय मिळवला. आर्या भाटकर, कृतिका वाघमारे आणि देविका अहिरे यांनी संघाच्या विजयाची घडी बसवली. पुरुष गटात मुंबई उपनगरने नांदेडला ३५-१४ असे पराभूत केले. मुंबई उपनगरकडून रामचंद्र झोरे आणि अनिकेत चेंदवनकर यांनी अष्टपैलू कामगिरी केली.
पुरुष गटात सोलापूरने सिंधुदुर्गवर ४४-१८ अशी २६ गुणांनी मात करत विजयी सलामी दिली. महिला गटातील सामन्यात रत्नागिरीने नांदेडवर ६४-६ असा ५८ गुणांनी एक डाव राखून विजय मिळवत प्रतिस्पर्ध्याला पूर्णपणे निष्प्रभ केले. पुरुष गटात सांगलीने जालनावर ६०-४ असा एक डाव राखून ५६ गुणांनी मोठा विजय मिळवला.
पुरुष गटातील तुल्यबळ लढतीत मुंबईने पालघरवर ४१-३६ अशी पाच गुणांनी मात करत विजय मिळवला. मुंबईच्या सम्यक जाधवने धारदार आक्रमण करत १२ गुण मिळवले, तर वेदांत देसाईने अष्टपैलू योगदान दिले. पालघरकडून मंदार बंडावे आणि सोहम महाले यांनी जोरदार झुंज दिली.
