घरबिजनेसभारतीय शेअर बाजाराची सात महिन्यांत ९ लाख कोटींची कमाई

भारतीय शेअर बाजाराची सात महिन्यांत ९ लाख कोटींची कमाई

शेअर बाजाराचे मूल्य ५०० लाख कोटींच्या पार

भारतीय भांडवली बाजाराने २०२६-२७ या आर्थिक वर्षात दमदार कामगिरी नोंदवली असून, अवघ्या पहिल्या सात महिन्यांत कंपन्यांनी समभाग आणि कर्जरोख्यांच्या माध्यमातून तब्बल ९ लाख कोटी रुपयांचे भांडवल उभारले आहे. गेल्या दशकभरात भारतीय कंपन्यांनी भांडवली बाजारातून दरवर्षी सरासरी १० लाख कोटी रुपयांचे भांडवल उभारले आहे. ही माहिती सेबीचे अध्यक्ष तुहिन कांता पांडे यांनी असोचॅमच्या १७ व्या भांडवली बाजार परिषदेत दिली. विशेष म्हणजे, भारतीय शेअर बाजाराचे एकूण बाजारमूल्य ५०० लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले असून, देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत ते १३० टक्क्यांहून अधिक झाले आहे. बाजारातील गुंतवणूकदारांची संख्याही १५ कोटींच्या पुढे गेली आहे. त्यामुळे भारतीय भांडवली बाजाराचा विस्तार आणि गुंतवणूकदारांचा वाढता विश्वास अधोरेखित होत आहे.

म्युच्युअल फंड उद्योगानेही मोठी झेप घेतली आहे. म्युच्युअल फंडांच्या व्यवस्थापनाखालील मालमत्तेचे मूल्य तब्बल ८३ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत २३५ कंपन्यांनी आयपीओच्या माध्यमातून १ लाख ४५ हजार कोटी रुपयांचे भांडवल उभारले आहे. याशिवाय कॉर्पोरेट बाँडच्या माध्यमातून कंपन्यांनी ५ लाख कोटी रुपयांहून अधिक निधी उभारला असून, ऑगस्ट २०२६ अखेर देशातील एकूण कॉर्पोरेट बाँडची थकबाकी ६२ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. उद्योग आणि सेवा क्षेत्राला बँकांकडून मिळणाऱ्या कर्जाच्या तुलनेत हे प्रमाण जवळपास ५५ टक्के आहे. कंपन्यांच्या विस्तारासाठी, पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आणि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी भांडवली बाजार महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे पांडे यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा:
पक्ष फोडणाऱ्यांच्या चरणाशी जाणे म्हणजे स्वाभिमान गहाण ठेवणे

गौतम अदानींनी घेतली शरद पवारांची भेट

पवारांचा इतिहास पाठीत खंजीर खुपसणारा!

बिसलेरीच्या पाण्यात पुन्हा जीवाणू

दरम्यान, परदेशी गुंतवणूकदारांना भारतीय बाजारात प्रवेश अधिक सोपा व्हावा यासाठी सेबीने महत्त्वपूर्ण निर्णयाच्या दिशेने पावले उचलली आहेत. सध्या परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार अर्थात एफपीआयची नोंदणी पूर्ण होण्यासाठी जवळपास एक महिना किंवा काही वेळा त्याहून अधिक कालावधी लागतो. हा कालावधी डिजिटल प्रक्रिया आणि विविध यंत्रणांच्या एकत्रीकरणातून अवघ्या ५ कामकाजाच्या दिवसांवर आणण्याचे सेबीचे उद्दिष्ट आहे. तसेच परदेशी गुंतवणूकदारांसाठी अतिरिक्त माहिती प्रकटीकरणाची अट रद्द करण्याचाही प्रस्ताव विचाराधीन आहे. ‘स्वागत-एफआय’ या विशेष सुविधेअंतर्गत आतापर्यंत सुमारे ७४० परदेशी गुंतवणूकदारांनी नोंदणी केली असून, त्यांच्या ताब्यातील एकूण एफपीआय मालमत्तेपैकी जवळपास १७ टक्के मालमत्ता या गुंतवणूकदारांकडे आहे. या सुविधेमुळे कमी जोखमीच्या आणि विश्वासार्ह परदेशी गुंतवणूकदारांना सिंगल विंडो पद्धतीने नोंदणी आणि सुलभ अनुपालनाची सुविधा मिळत आहे.

दुसरीकडे, किरकोळ गुंतवणूकदारांचे हित सुरक्षित ठेवण्यावरही सेबीचा भर आहे. कंपन्यांच्या आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि नियमांचे पालन करण्यासाठी सेबी लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स अर्थात एलओडीआर नियमांचा आढावा घेत आहे. एकाच चुकीसाठी वेगवेगळ्या शेअर बाजारांकडून अनेक दंड आकारण्याऐवजी एकच दंड आकारण्याची व्यवस्था प्रस्तावित आहे. आयपीओ, एफपीओ, राइट्स इश्यू आणि एसएमई आयपीओच्या नियमांचाही पुनर्विचार सुरू आहे. टाटा स्टीलने एपीएल अपोलो ट्यूब्समधील प्रवर्तकांचा २६.६ टक्के हिस्सा १५ हजार ५१० कोटी रुपयांना खरेदी करण्याचा करार केला असून, आणखी २६ टक्के हिस्सा खुल्या प्रस्तावाद्वारे खरेदी करण्यासाठी १६ हजार ७५६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या व्यवहारात किरकोळ भागधारकांचे हित जपण्याला प्राधान्य दिले जाणार आहे. एकूणच, ९ लाख कोटींची भांडवल उभारणी, ८३ लाख कोटींची म्युच्युअल फंड मालमत्ता आणि १५ कोटींहून अधिक गुंतवणूकदार या आकडेवारीतून भारतीय भांडवली बाजाराची वाढती ताकद स्पष्ट होत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version