सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना दहशतवादी संघटनांमध्ये सामील करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा संशय व्यक्त होत असतानाच दिल्ली पोलिसांनी जैश-ए-मोहम्मदशी संबंधित एका संशयिताला अटक केली आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने सोशल मीडियावरील त्याच्या हालचालींवर अनेक दिवस नजर ठेवली होती. त्यानंतर चौकशी करून त्याला ताब्यात घेण्यात आले. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआय सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय तरुणांचे ब्रेनवॉश करून त्यांना दहशतवादी कारवायांसाठी प्रवृत्त करत असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.
माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या संशयितालाही सोशल मीडियाच्या माध्यमातून जैशच्या संपर्कात आणण्यात आले होते. त्याच्या ऑनलाइन हालचाली आणि संपर्कांवर विशेष पथक लक्ष ठेवून होते. प्राथमिक चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आली. आता त्याचे इतर कोणाशी संपर्क होते, तसेच या प्रकरणामागे मोठे नेटवर्क कार्यरत आहे का, याचा तपास सुरू आहे.
गुजरातमधील संशयिताशी संबंधांची चौकशी
दरम्यान, गुजरातमध्ये जैश-ए-मोहम्मदशी कथित संबंध असलेल्या एका तरुणाला अटक करण्यात आल्यानंतर दिल्लीतील प्रकरणाचे धागेदोरेही तपासले जात आहेत. गुजरात दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) वडोदरा येथे केलेल्या कारवाईत एका संशयिताला अटक केली होती. त्याच्याकडून एके-४७ सदृश असॉल्ट रायफल, काडतुसे, जैशचा झेंडा, मोबाइल फोन आणि सिमकार्ड जप्त करण्यात आले होते.
हे ही वाचा :
इटलीच्या शाळांमध्ये बुरखा, निकाबवर बंदी!
बिसलेरीच्या पाण्यात पुन्हा जीवाणू
जैशशी संबंधित संशयित दहशतवादी गुजरातमध्ये अटकेत
‘रामायण’ चित्रपटावर आक्षेप असेल तर स्वतःचा चित्रपट बनवा!
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, या तरुणाने वडोदरा येथील भारतीय हवाई दलाच्या तळाची पाहणी केल्याचा संशय आहे. त्याच्या मोबाइलमध्ये या संवेदनशील ठिकाणाची छायाचित्रेही आढळली आहेत. दिल्लीमध्ये अटक केलेल्या संशयिताचा गुजरातमध्ये पकडलेल्या तरुणाशी काही संबंध आहे का, याचीही चौकशी केली जात आहे.
