बांगलादेशच्या माजी अंतरिम सरकारचे प्रमुख आणि नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस यांना अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळावर बांगलादेशी नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. सोमवारी, १२ ऑक्टोबर रोजी विमानतळावरून बाहेर पडत असताना काही जणांनी त्यांना घेरून घोषणाबाजी केली. ‘तुम्ही दहशतवादी आहात’, ‘बांगलादेशात लोकांना मारले, तुम्ही इथे का आला आहात?’ अशा शब्दांत त्यांच्यावर आरोप करण्यात आले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
माहितीनुसार, युनूस हे दोहा येथून कतार एअरवेजच्या विमानाने न्यूयॉर्कमध्ये दाखल झाले होते. विमानतळाच्या टर्मिनलमधून व्हीलचेअरवरून बाहेर जात असताना काही जणांनी त्यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरू केली. बांगलादेशातील हजारो पोलिसांच्या मृत्यूला आणि लोकशाही कमकुवत करण्याला युनूस जबाबदार असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. तसेच, बांगलादेशात सुमारे २ लाख लोकांना अटक का करण्यात आली, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
या गोंधळानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी युनूस यांना सुरक्षित ठिकाणी नेले. त्यांच्यासोबत युनूस सेंटरच्या कार्यकारी संचालक आणि तत्कालीन अंतरिम सरकारच्या शाश्वत विकास उद्दिष्टांच्या समन्वयक लामिया मोर्शेद उपस्थित होत्या. काही वृत्तांनुसार, परिस्थिती चिघळल्यानंतर युनूस आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पुन्हा विमानतळाच्या आत नेण्यात आले.
शेख हसीना यांचे सरकार ५ ऑगस्ट २०२४ रोजी जनआंदोलनानंतर कोसळले होते. त्यानंतर ८ ऑगस्ट २०२४ रोजी मोहम्मद युनूस यांनी अंतरिम सरकारचे प्रमुख सल्लागार म्हणून पदभार स्वीकारला. त्यांच्या कार्यकाळात देशातील राजकीय हिंसाचार, कायदा-सुव्यवस्थेची स्थिती, अल्पसंख्याकांवरील हल्ल्यांचे आरोप आणि राजकीय विरोधकांवरील कारवाई यांवरून सरकारवर टीका झाली.
हे ही वाचा:
लष्करच्या वरिष्ठ कमांडरसह चार पाक दहशतवादी भूसुरुंगाच्या स्फोटात ठार
‘हिंदूंच्याच दुकानातून बिर्याणी खरेदी करा’ बंगालमध्ये लागले पोस्टर
जयशंकर यांचा इशारा शेतकऱ्यांची कसोटी |
पॉवेल, रदरफोर्डवर आयसीसीचा बडगा!
युनूस यांच्या सरकारने हिंसाचाराला आळा घालण्यात अपयश आल्याचा आरोप राजकीय विरोधकांनी केला होता. अवामी लीगनेही आपल्या सदस्यांना लक्ष्य करण्यात आल्याचे आरोप केले. या पार्श्वभूमीवर न्यूयॉर्कमधील घोषणाबाजी ही युनूस यांच्या कार्यकाळाबाबत काही बांगलादेशी नागरिकांमध्ये असलेल्या नाराजीचे प्रतिबिंब मानली जात आहे.
