ऑपरेशन सिंदूरदरम्यान चीनी एव्हिएशन अभियंते पाकिस्तानमध्ये उपस्थित!

चीनचा मोठा खुलासा

ऑपरेशन सिंदूरदरम्यान चीनी एव्हिएशन अभियंते पाकिस्तानमध्ये उपस्थित!

भारत आणि पाकिस्तान यांच्यात मे २०२५ मध्ये झालेल्या चार दिवसांच्या लष्करी संघर्ष “ऑपरेशन सिंदूर” संदर्भात चीनने प्रथमच मोठा खुलासा केला आहे. संघर्षाच्या काळात त्यांचे एव्हिएशन अभियंते पाकिस्तानमध्ये उपस्थित होते आणि त्यांनी पाकिस्तान हवाई दलाच्या चिनी बनावटीच्या J-10CE लढाऊ विमानांना तांत्रिक मदत पुरवली होती, असे चीनने मान्य केले आहे. ही माहिती चीनच्या सरकारी प्रसारक CCTV ला दिलेल्या मुलाखतीतून तसेच चीनच्या एव्हिएशन इंडस्ट्री कॉर्पोरेशन (AVIC) शी संबंधित अधिकाऱ्यांच्या वक्तव्यांतून समोर आली आहे.

माध्यमांच्या अहवालानुसार, AVIC च्या चेंगडू विमान डिझाइन आणि संशोधन संस्थेचे अभियंते झांग हेंग आणि शू दा हे मे २०२५ मध्ये पाकिस्तानमधील एका एअरबेसवर तैनात होते. पाकिस्तान हवाई दलाचे J-10CE लढाऊ विमाने पूर्ण युद्धसज्ज अवस्थेत कार्यरत राहतील, याची खात्री करणे हे त्यांचे प्रमुख काम होते.

संघर्षाच्या काळातील परिस्थितीबाबत बोलताना झांग हेंग म्हणाले, “सपोर्ट बेसवर आम्हाला सतत लढाऊ विमानांच्या उड्डाणाचा आवाज आणि एअर-रेड सायरन ऐकू येत होते. मे महिन्यात सकाळ होताच तापमान जवळपास ५० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचत होते. मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या ही आमच्यासाठी अत्यंत कठीण परीक्षा होती.” तर शू दा यांनी J-10CE लढाऊ विमानाच्या क्षमतेबाबत सांगितले, “आम्ही हे विमान तयार केले, त्याची देखभाल केली आणि शेवटी वापरकर्त्याकडे सुपूर्द केले. आता ते एका मोठ्या परीक्षेला सामोरे जात होते.” ते पुढे म्हणाले, “J-10CE ने दिलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे आम्हाला फारसे आश्चर्य वाटले नाही. हे अचानक घडलेले नव्हते, तर जवळपास अपेक्षितच होते. या विमानाला फक्त योग्य संधीची गरज होती आणि वेळ आल्यावर त्याने आमच्या अपेक्षेनुसारच कामगिरी केली.”

J-10CE हे चीनच्या J-10C फायटर जेटचे निर्यात संस्करण असून, त्याला ४.५ पिढीतील लढाऊ विमान मानले जाते. यात AESA रडार आणि लांब पल्ल्याच्या एअर-टू-एअर क्षेपणास्त्रांची क्षमता आहे. चीनबाहेरील या विमानाचा पाकिस्तान हा एकमेव परदेशी वापरकर्ता आहे. अलीकडच्या काळात पाकिस्तानच्या सुमारे ८० टक्के शस्त्रास्त्र आयाती चीनमधून झाल्या असून, त्यात J-10CE आणि PL-15 क्षेपणास्त्रांचा समावेश आहे.

हा खुलासा महत्त्वाचा मानला जात आहे, कारण आतापर्यंत चीनच्या भूमिकेबाबत केवळ अंदाज व्यक्त केले जात होते. यापूर्वी चीन पाकिस्तानला उपग्रह गुप्तचर माहिती आणि तांत्रिक सहकार्य पुरवत असल्याची चर्चा होती; मात्र आता प्रथमच चिनी अधिकाऱ्यांनी थेटपणे मान्य केले आहे की त्यांचे अभियंते पाकिस्तानमध्ये उपस्थित होते.

हे ही वाचा:

वसई-विरार महापालिकेच्या ‘लाभकरा’वरून भाजप आक्रमक

अमेरिकेकडून ‘UFO FILES’ प्रसिद्ध! काय आहे अहवालात?

लेफ्टनंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी नवे संरक्षण दल प्रमुख

जायंट किलर सुवेंदू आता पश्चिम बंगालचे ‘अधिकारी’

ऑपरेशन सिंदूरची सुरुवात २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर झाली होती. या हल्ल्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांनी २६ नागरिकांची निर्घृण हत्या केली होती. त्याच्या प्रत्युत्तरात भारताने ७ मे २०२५ रोजी पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केले होते. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये चार दिवस हवाई आणि क्षेपणास्त्र संघर्ष सुरू राहिला. दरम्यान, भारताने अवघ्या ९० मिनिटांत पाकिस्तानच्या ११ एअरबेसवर जोरदार हल्ले केले, ज्यामुळे पाकिस्तानने भारताकडे युद्धविरामाची विनंती केल्याचे सांगितले जाते. या संघर्षादरम्यान पाकिस्तानने आपल्या चिनी बनावटीच्या J-10CE लढाऊ विमानांचा वापर केला होता. पाकिस्तानचा दावा होता की या संघर्षात त्यांनी किमान एक भारतीय राफेल लढाऊ विमान पाडले; मात्र भारताने हा दावा फेटाळून लावला होता.

Exit mobile version