घरदेश दुनियादक्षिण कोरियातल्या जेजू बेटावर ४ मृत, २९८ बेपत्ता

दक्षिण कोरियातल्या जेजू बेटावर ४ मृत, २९८ बेपत्ता

एका पोलिस अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे खळबळ

दक्षिण कोरियातील जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ आणि हनिमूनसाठी विशेष पसंती असलेल्या जेजू बेटावर सध्या भीतीचे सावट निर्माण झाले आहे. गेल्या तीन दिवसांत बेपत्ता झालेल्या चार जणांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली असून, या घटनांमुळे स्थानिक पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. विशेष म्हणजे, एका पोलिस अधिकाऱ्याने हाताळलेल्या तब्बल २९८ बेपत्ता व्यक्तींच्या प्रकरणांची आता पुन्हा चौकशी केली जात आहे. त्यापैकी किमान १० प्रकरणे चुकीच्या पद्धतीने बंद करण्यात आल्याचा संशय आहे.

या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात ३७ वर्षीय जांग मी-रान या महिलेच्या बेपत्ता होण्यापासून झाली. जांग १२ मे रोजी जेजू शहरातील हल्लिम भागातील आपल्या निवासस्थानातून बाहेर पडल्यानंतर बेपत्ता झाली होती. कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास ‘बू’ आडनावाच्या पोलिस अधिकाऱ्याकडे होता. त्याने जांगच्या कुटुंबीयांना तिच्याशी संपर्क झाला असून ती सुरक्षित असल्याचे सांगितल्याचा आरोप आहे. मात्र, नंतरच्या तपासात अशा कोणत्याही संभाषणाची नोंद पोलिसांकडे नसल्याचे समोर आले.
हे ही वाचा:
पहिल्याच दिवशी ‘टॉक्सिक’चा थिएटरमध्ये धुमाकूळ; ऍक्शनसह इमोशनची भुरळ

ब्लिंकिट, स्विगी इन्स्टामार्टसह मोठ्या विक्रेत्यांकडून साखर खरेदीवर मर्यादा

संदेशखालीतील ईडी हल्ला प्रकरणातील मिथू सरदारला अंड्यांचा प्रसाद

सोन्याचा दर १ लाख ७० हजारांच्या उंबरठ्यावर

दरम्यान, २४ ऑगस्ट रोजी जांगचा मृतदेह तिच्या निवासस्थानापासून अवघ्या ४०० मीटर अंतरावर असलेल्या एका पाम फार्ममध्ये सापडला. तिच्या बेपत्ता होण्याच्या प्रकरणात पोलिसांनी योग्य तपास केला असता तर मृतदेह यापूर्वीच सापडू शकला असता, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. जांगच्या प्रकरणातील गंभीर त्रुटी समोर आल्यानंतर पोलिसांनी इतर बेपत्ता व्यक्तींच्या प्रकरणांचाही तपास सुरू केला. त्यातून आणखी धक्कादायक माहिती समोर आली.

गेल्या काही दिवसांत जेजू बेटावर बेपत्ता झालेल्या आणखी तीन व्यक्तींचे मृतदेह सापडले. त्यापैकी एका साठीतल्या व्यक्तीचे प्रकरणही याच पोलिस अधिकाऱ्याने हाताळले होते आणि ते कथितरीत्या अकाली बंद करण्यात आले होते. दुसऱ्या एका सत्तर वर्षीय व्यक्तीचा मृतदेह मासेमारी करणाऱ्या व्यक्तीला आढळला, तर चौथा मृतदेह एओल-यूप भागातील एका दरीजवळ सापडला. मात्र, या चारही मृत्यूंचा एकमेकांशी थेट संबंध असल्याचे किंवा हे एखाद्या मोठ्या हत्याकांडाचा भाग असल्याचे पोलिसांनी अद्याप म्हटलेले नाही.

या घटनांनंतर संबंधित पोलिस अधिकाऱ्याने हाताळलेल्या २९८ बेपत्ता प्रकरणांची छाननी सुरू झाली आहे. यातील सुमारे १० प्रकरणांमध्ये चुकीच्या पद्धतीने तपास बंद करण्यात आल्याचा संशय आहे. संबंधित अधिकाऱ्यावर कर्तव्यात कसूर, बनावट नोंदी करणे आणि दिशाभूल करून सरकारी कामात अडथळा आणल्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत. २५ ऑगस्ट रोजी जेजू न्यायालयाने त्याच्याविरोधात अटक वॉरंटही जारी केले.

या प्रकरणाची व्याप्ती केवळ एका पोलिस अधिकाऱ्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. जेजू सेओबू पोलिस ठाण्याच्या प्रमुखांसह चार वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रशासकीय रजेवर पाठवण्यात आले असून, राष्ट्रीय पोलिस यंत्रणा या प्रकरणांची योग्य देखरेख झाली होती का, याची चौकशी करत आहे. त्यामुळे एका बेपत्ता महिलेच्या प्रकरणापासून सुरू झालेला तपास आता संपूर्ण पोलिस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या मोठ्या प्रकरणात बदलला आहे.

जेजू बेट हे समुद्रकिनारे, ज्वालामुखी पर्वतरांगा, धबधबे आणि निसर्गरम्य वातावरणासाठी जगभर प्रसिद्ध आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक येथे येतात आणि हनिमूनसाठीही या बेटाला विशेष पसंती दिली जाते. मात्र, सलग चार बेपत्ता व्यक्तींचे मृतदेह सापडणे आणि शेकडो बेपत्ता प्रकरणे पुन्हा तपासाच्या कक्षेत येणे यामुळे बेटाच्या सुरक्षिततेबाबत चिंता वाढली आहे. सध्या जेजूवरील या घटनांमागे एकच कारण किंवा गुन्हेगारी कट असल्याचे पुरावे समोर आलेले नाहीत; मात्र बेपत्ता व्यक्तींच्या तक्रारींकडे पोलिसांनी केलेले कथित दुर्लक्ष हा या संपूर्ण प्रकरणातील सर्वात गंभीर मुद्दा ठरला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version