सोन्याच्या दरातील तेजीचा सिलसिला कायम असून, सलग चौथ्या दिवशी मौल्यवान धातूच्या किमतीत वाढ नोंदवण्यात आली. मंगळवारी २४ कॅरेट म्हणजेच ९९.९ टक्के शुद्ध सोन्याच्या दरात तब्बल २ हजार ७०० रुपयांची वाढ झाली आणि १० ग्रॅमचा भाव १ लाख ६७ हजार १०० रुपयांवर पोहोचला. मात्र, बुधवारी बाजारातील काहीशी नरमाईमुळे सोन्याच्या दरात किरकोळ घट झाली आहे.
बुलियन डॉट कॉमच्या माहितीनुसार, २६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ६.३० वाजता २४ कॅरेट सोन्याचा दर १० ग्रॅमसाठी १ लाख ६३ हजार ४३० रुपये, तर २२ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ४९ हजार ८११ रुपये होता. गेल्या आठवड्याच्या तुलनेत २४ कॅरेट सोन्याच्या दरात ३.१८ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. चेन्नईमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ६३ हजार ६१० रुपये असून, दिल्लीमध्ये तो १ लाख ६२ हजार ८५० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.
हे ही वाचा:
भारत-फ्रान्स मिळून बनवणार ‘अरावली’ हेलिकॉप्टर इंजिन
जीएसटी २.०चा घरखर्चावर परिणाम; किराणा ८% स्वस्त, भाडे २१% महाग
अमेरिकेचा एच-१बी व्हिसाबाबत मोठा प्रस्ताव
दरम्यान, चांदीच्या दरातही मोठी उलाढाल पाहायला मिळत आहे. मंगळवारी चांदीच्या दरात ३ हजार ५०० रुपयांची घट झाली आणि ती २ लाख ५० हजार रुपये प्रति किलोवर बंद झाली. बुधवारी ९९९ फाइन चांदीचा दर २ लाख ४५ हजार ५४० रुपये, तर ९२५ स्टर्लिंग चांदीचा दर २ लाख २७ हजार १२५ रुपये प्रति किलो नोंदवण्यात आला. मुंबईत चांदीचा दर सुमारे २ लाख ४५ हजार ९० रुपये प्रति किलो आहे.
सोन्याच्या दरातील ही तेजी ग्राहकांसाठी महत्त्वाची ठरत आहे. विशेषतः लग्नसराई आणि सणासुदीच्या काळात दागिने खरेदी करणाऱ्यांना वाढलेल्या दराचा थेट फटका बसू शकतो. दुसरीकडे, आर्थिक अनिश्चिततेच्या काळात सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी वाढते दर लक्षवेधी ठरले आहेत.
२४ कॅरेट सोने अत्यंत शुद्ध मात्र मऊ असल्याने त्यापासून थेट दागिने बनवले जात नाहीत. दागिन्यांसाठी प्रामुख्याने २२, १८ किंवा १४ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यामुळे प्रत्यक्ष दागिने खरेदी करताना सोन्याच्या दरासोबतच शुद्धता, घडणावळ आणि इतर शुल्कांचाही विचार करणे आवश्यक आहे.
