घरदेश दुनियाउड्डाणाच्या वेळी वेग घटला, टेल स्ट्राइक, टायर फुटले... काय घडले म्युनिक विमानतळावर?

उड्डाणाच्या वेळी वेग घटला, टेल स्ट्राइक, टायर फुटले… काय घडले म्युनिक विमानतळावर?

व्हिएतनामच्या विमानाचा थरार, प्रवाशांसह कर्मचारी सुरक्षित

व्हिएतनाम एअरलाइन्सच्या बोईंग 787-9 विमानाला उड्डाण घेताना गंभीर तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. विमानाचा वेग दोनदा अचानक कमी झाला. त्यानंतर विमानाच्या शेपटीचा भाग रनवेवर घासला आणि टायरच्या दाबाबाबतही चेतावणी देण्यात आली. अखेर सुमारे दोन तासांच्या थरारानंतर विमानाने म्युनिक विमानतळावर सुरक्षित लँडिंग केले. या घटनेत विमानातील सर्व २७१ प्रवासी आणि १६ क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत.

व्हिएतनाम एअरलाइन्सचे व्हीएन३४ हे विमान १५ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे १.४५ वाजता म्युनिकहून हनोईच्या दिशेने रवाना झाले होते. उड्डाणाच्या वेळी विमानाने अपेक्षित वेग गाठला नाही. प्राथमिक अहवालानुसार टेकऑफ रोलदरम्यान विमानाचा वेग दोन वेळा कमी झाला. रनवेचा बहुतांश भाग पार केल्यानंतर विमानाने अखेर उड्डाण केले. त्यावेळी रनवेचा केवळ सुमारे ९१ मीटर भाग शिल्लक असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

उड्डाणानंतर काही वेळातच कॉकपिटमध्ये टेल स्ट्राइक आणि टायर प्रेशरशी संबंधित इशारे मिळाले. विमानाच्या शेपटीचा रनवेला स्पर्श झाल्याची शक्यता लक्षात घेऊन वैमानिकांनी एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क साधला आणि विमान पुन्हा म्युनिकला परतवण्याचा निर्णय घेतला. मात्र, विमान लगेच उतरवणे शक्य नव्हते. विमानाचे वजन कमी करण्यासाठी इंधन हवेत सोडण्यात आले आणि विमानाने सुमारे ९ हजार फूट उंचीवर जवळपास दोन तास फेऱ्या मारल्या. त्यानंतर विमानाने म्युनिक विमानतळाकडे परतीचा प्रवास सुरू केला.

लँडिंगच्या वेळी परिस्थिती आणखी गंभीर झाली. विमानाचे चारही टायर फुटल्याचे समोर आले. लँडिंग गिअरजवळून धूर निघत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून आले. विमानाच्या शेपटीलाही नुकसान झाल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. विमानाला स्वतःहून टॅक्सी करता न आल्याने त्याला हँगरमध्ये नेण्यात आले. या घटनेमुळे म्युनिक विमानतळावरील रनवे काही काळ बंद ठेवण्यात आला आणि रनवेवरील तुटलेल्या टायरचे अवशेष हटवून नुकसान झालेल्या भागांची दुरुस्ती करण्यात आली.

हे ही वाचा:

कोलकात्यात हॉटेलला भीषण आग; नऊ बांगलादेशी नागरिकांचा मृत्यू

चाकणचे खड्डे बुजणार; ३१ ऑगस्टपर्यंत रस्ते दुरुस्तीचे आदेश

गॉल कसोटीत विजयासाठी भारताला ६ विकेट्स गरज

काझीरंगाभोवतीचा १० किमी संवर्धन पट्टा घटवण्याचा सरकारचा प्रस्ताव

या घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. विमानाने टेकऑफदरम्यान अपेक्षित वेग का गाठला नाही, याचा तपास सुरू आहे. व्हिएतनामच्या विमान वाहतूक प्राधिकरणासोबत जर्मनीच्या फेडरल ब्युरो ऑफ एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन (बीएफयू) कडूनही तपास केला जात आहे. विमानाचे फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर तपासासाठी सुरक्षित करण्यात आले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version