यूट्यूबर आणि दिल्लीतील कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनासाठी जर्मनीहून भारतात आलेला ध्रुव राठी याची रविवारी पहाटे दिल्ली पोलिसांनी सुटका केली. त्यानंतर त्याची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. पोलिसांनी आपल्याला केवळ ताब्यात घेतले नव्हते, तर आपले अपहरण केले होते, अशी बोंब त्याने ठोकली आहे.
ध्रुव राठीने व्हिडिओ संदेशाद्वारे आपली बाजू मांडली. तो म्हणाला, “मी झोपलेलो असताना त्यांनी माझ्या स्वतःच्या घरातून माझे अपहरण करण्यासाठी थेट गुंड पाठवले.”
दिल्ली पोलिसांनी शनिवार, १० ऑक्टोबर रोजी गुरुग्राम येथील ध्रुव राठीच्या घरातून त्याला ताब्यात घेतले होते. दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीच्या (सीजेपी) वतीने प्रस्तावित ‘जंतरमंतर २.०’ आंदोलनात तो सहभागी होण्याची शक्यता होती. या आंदोलनातून विशेष सघन पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेदरम्यान मतदार याद्यांमध्ये कथित अनियमितता झाल्याच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाणार होती.
हे ही वाचा:
भारतातील गुंतवणुकीत जपानची आघाडी
‘व्होट चोरी’चा पुरावा मागितल्याने महिला पत्रकारावर मिरची स्प्रे
सौदीच्या रियाध विमानतळावर हुतींनी केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात १२ ठार
ध्रुव राठीच्या नागरिकत्वाबाबत सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांवरही त्याने स्पष्टीकरण दिले. काही प्रसारमाध्यमांनी आपल्या नागरिकत्वाबाबत अफवा पसरवल्याचा आरोप करत त्याने व्हिडिओमध्ये भारतीय पारपत्र दाखवले. तो म्हणाला, “हे माझे पारपत्र आहे. मी भारतीय नागरिक आहे, होतो आणि भारतीय नागरिकच राहीन.”
आपल्याला परदेशी पारपत्रधारक असल्याचे चुकीच्या पद्धतीने चित्रित करण्यात आले आणि आंदोलनात सहभागी होण्याच्या प्रयत्नांना विरोध करण्यासाठी या गोष्टींचा वापर करण्यात आला, असा आरोपही त्याने केला. भारतीय नागरिक म्हणून आंदोलनात सहभागी होण्याचा आपल्याला इतर सामान्य नागरिकांप्रमाणेच अधिकार असल्याचे त्याने सांगितले.
ध्रुव राठीने आपल्या ताब्यात घेण्याच्या घटनेचा घटनाक्रम सांगताना दावा केला की, शनिवारी सकाळी सुमारे सात वाजता तो झोपलेला असताना साध्या वेशातील जवळपास २० जण त्याच्या घरात आले. आपण कोण आहात, असे विचारण्याची संधी मिळण्यापूर्वीच त्यांनी आपल्याला घराबाहेर नेले, असे त्याने म्हटले. त्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये नेण्यात आले. सुमारे २२ ते २३ तास आपल्याला फोन वापरण्याची किंवा आपल्या वकिलाशी संपर्क साधण्याची परवानगी देण्यात आली नाही, असा दावाही त्याने केला.
घरातील शयनकक्षातून बाहेर नेत असताना आपल्याला दुखापत झाल्याचेही ध्रुव राठीने सांगितले. शनिवार आणि रविवारच्या मध्यरात्रीनंतर, रविवारी पहाटे सुमारे तीन वाजता त्याची ताब्यातून सुटका करण्यात आली.
दरम्यान, प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था कडक केली होती. आंदोलकांनी जंतरमंतर परिसरात पोहोचू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या होत्या.
