घरदेश दुनियानेपाळमध्ये पुन्हा पुराचे संकट

नेपाळमध्ये पुन्हा पुराचे संकट

घरे आणि तीन पूल वाहून गेले

नेपाळमध्ये पुन्हा एकदा पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. गोरखा जिल्ह्यातील बुढी गंडकी नदीला अचानक आलेल्या पुरामुळे अनेक घरे आणि तीन पूल वाहून गेले असून परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. रविवारी, ११ ऑक्टोबर रोजी पहाटे नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्याने नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरले. डोंगराळ भागात झालेल्या भूस्खलनामुळे नदीचा प्रवाह अडला आणि त्यानंतर पाण्याचा मोठा लोंढा अचानक पुढे आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या पुराचा सर्वाधिक फटका चुमनुब्री ग्रामीण नगरपालिका परिसरातील जगत, सल्लेरी आणि आसपासच्या भागांना बसला आहे.

पुराच्या पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की अनेक घरे पाण्यासोबत वाहून गेली, तर नद्यांवरील दोन झुलते पूल आणि एक लोखंडी पूलही कोसळून वाहून गेले. त्यामुळे दुर्गम भागातील गावांचा संपर्क तुटण्याची भीती निर्माण झाली आहे. बुढी गंडकी जलविद्युत प्रकल्पाच्या बांधकामालाही या पुराचा फटका बसला असून बांधकामासाठी उभारण्यात आलेल्या तळाचे आणि उपकरणांचे नुकसान झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, अनेक घरांचे नुकसान झाले असून काही नागरिक बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेतली असून, लष्कर आणि पोलिसांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. पुराच्या पाण्यात अडकलेल्या ४९ नागरिकांची सुटका करण्यात आल्याची माहिती नेपाळच्या लष्कराने दिली आहे.
हे ही वाचा:
सुटकेनंतर अपहरण केल्याची ध्रूव राठीची बोंब

भारतातील गुंतवणुकीत जपानची आघाडी

अमेरिकेला मागे टाकत यूएई भारताचा सर्वात मोठा गॅस पुरवठादार

‘व्होट चोरी’चा पुरावा मागितल्याने महिला पत्रकारावर मिरची स्प्रे

दरम्यान, नेपाळमधील नागरिकांना पुन्हा एकदा नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत आहे. मागील महिन्यात झालेल्या भीषण पुराच्या संकटातून देश सावरत असतानाच बुढी गंडकी नदीला आलेल्या नव्या पुरामुळे प्रशासनासमोरील आव्हाने वाढली आहेत. नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचे आवाहन करण्यात आले असून, नदीच्या पाण्याच्या पातळीवर प्रशासनाकडून लक्ष ठेवले जात आहे. गोरखा जिल्ह्यासह नदीच्या प्रवाहाच्या पुढील भागातील नागरिकांनाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या पुरामुळे झालेल्या जीवितहानीचा आणि आर्थिक नुकसानीचा अंतिम आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही. हवामान, डोंगराळ भागातील भूस्खलन आणि अचानक वाढणारा नदीचा प्रवाह यांमुळे नेपाळमध्ये वारंवार उद्भवणाऱ्या अशा आपत्तींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version