मुंबईतील वाढत्या वायुप्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी संपूर्ण मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आठवड्यातून एक दिवस सर्व बांधकामे आणि पाडकामे बंद ठेवण्यात यावीत, अशी सूचना सांस्कृतिक कार्यमंत्री तथा मुंबई उपनगराचे पालकमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्राद्वारे केली आहे.
हिवाळ्यात वायुप्रदूषणाची तीव्रता वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन तातडीने प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, असेही त्यांनी सूचित केले आहे. मुंबईतील वाढत्या वायुप्रदूषणाबाबत नागरिकांकडून अनेक निवेदने प्राप्त झाली असून, मुंबई उच्च न्यायालयानेही हवेच्या खालावत चाललेल्या गुणवत्तेबाबत चिंता व्यक्त केली आहे, असे शेलार यांनी पत्रात नमूद केले आहे. महानगरपालिकेने बांधकामस्थळांवरील प्रदूषण नियंत्रणासाठी केलेल्या उपाययोजना, विभागस्तरावरील तपासणी पथके, केंद्रीय हवा गुणवत्ता डॅशबोर्डच्या माध्यमातून ३,१६६ बांधकामस्थळांवर ठेवण्यात येणारी देखरेख, राडारोडा नियंत्रण प्रणाली, बेकऱ्यांमध्ये स्वच्छ इंधनाचा वापर आणि स्मशानभूमींमधील प्रदूषण नियंत्रण यंत्रणा यांसारख्या प्रयत्नांचे त्यांनी स्वागत केले आहे. २०१७-१८ पासून मुंबईतील पीएम-१० प्रदूषणाच्या पातळीत सुमारे ४८ टक्क्यांनी घट झाल्याचेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे. मात्र, प्रदूषणावर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी आणखी व्यापक उपाययोजनांची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईसाठी स्वतंत्र श्रेणीबद्ध कृती आराखडा (Graded Response Action Plan) तयार करून हवेची गुणवत्ता खालावताच पूर्वनिश्चित उपाययोजना तातडीने लागू करण्याची व्यवस्था असावी, अशी सूचना त्यांनी केली आहे. प्रदूषणग्रस्त भाग आणि प्रमुख वाहतूक मार्गांवर प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वापर करून रस्ते धुणे व पाण्याची फवारणी करणे, रात्रीच्या वेळी यांत्रिक पद्धतीने रस्ते स्वच्छ करणे, खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करणे आणि खोदकामानंतर रस्ते पूर्ववत करण्याची कामे वेळेत पूर्ण करणे, यावरही त्यांनी भर दिला आहे.
हे ही वाचा:
चार सत्रांच्या घसरणीनंतर भारतीय शेअर बाजाराचे दमदार पुनरागमन
राजकारणातील भाषेचा स्तर घसरतोय!
गुजरातमध्ये भारतीय हद्दीत घुसलेल्या चार पाकिस्तानी मच्छीमारांना अटक
राहुल गांधींच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांना धडकल्या
कचरा जाळणे, कचरा डेपोतील आगी आणि बांधकामाचा राडारोडा बेकायदेशीरपणे टाकण्याच्या घटनांची तक्रार करण्यासाठी स्वतंत्र हेल्पलाइन व समाजमाध्यम खाते सुरू करावे. तक्रारींवर तातडीने कार्यवाही करून दोषींवर दंडात्मक कारवाई करावी आणि कार्यवाहीचा साप्ताहिक अहवाल प्रसिद्ध करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. प्रदूषणाची तीव्रता अधिक असलेल्या ठिकाणी आणि प्रमुख वाहतूक चौकांमध्ये अँटी-स्मॉग गन व मिस्ट स्प्रेअरचा वापर करण्याची सूचना त्यांनी केली आहे.
कोळशाऐवजी हरित इंधनाचा वापर
मुंबई महानगर प्रदेशातील उद्योगांच्या इंधन वापराचा प्रश्नही शेलार यांनी उपस्थित केला आहे. सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्न्मेंटच्या अहवालानुसार, या प्रदेशातील उद्योग ऊर्जा आणि इंधनासाठी सुमारे २० लाख टन कोळशाचा वापर करतात. या उद्योगांना स्वच्छ व हरित इंधनाकडे वळण्यासाठी कमी व्याजदराची कर्जे, सरकारी करांमध्ये सवलती आणि हरित ऊर्जा निधीच्या माध्यमातून आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याचा विचार करावा, असे त्यांनी सुचविले आहे.
मुंबई आणि आसपासच्या परिसरातील सार्वजनिक व खासगी वाहतूक वाहनांचे विद्युतीकरण करण्यासाठी प्रोत्साहनपर योजना राबवाव्यात, तसेच वाहन उद्योग आणि खासगी कंपन्यांचा या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले आहे.
