घरस्पोर्ट्ससिमरन शर्माची सुवर्णधाव!

सिमरन शर्माची सुवर्णधाव!

१०० मीटरमध्येही सुवर्णपदकासह गेम्स रेकॉर्ड

एशियन पॅरा गेम्स २०२६ मध्ये भारतीय खेळाडूंनी पदकांची लयलूट सुरूच ठेवली आहे. भारताची वेगवान पॅरा धावपटू सिमरन शर्मा हिने महिलांच्या १०० मीटर टी१२ शर्यतीत सुवर्णपदक जिंकत स्पर्धेतील दुसऱ्या सुवर्णावर नाव कोरले. विशेष म्हणजे, तिने १२.०२ सेकंदांची वेळ नोंदवत नवीन गेम्स रेकॉर्ड प्रस्थापित केला. याआधी तिने २०० मीटर टी१२ शर्यतीतही सुवर्णपदक पटकावले होते. सिमरनच्या या दुहेरी सुवर्णकामगिरीमुळे भारतीय क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

सिमरनची विक्रमी झेप; जुन्या कामगिरीवर मात

सिमरनने १०० मीटर टी१२ अंतिम शर्यत अवघ्या १२.०२ सेकंदांत पूर्ण केली. यापूर्वी तिने हीट्समध्ये १२.१३ सेकंदांची वेळ नोंदवून गेम्स रेकॉर्ड केला होता. अंतिम फेरीत स्वतःचाच विक्रम मोडत तिने सुवर्णपदकावर मोहोर उमटवली.

हांगझोऊ येथे झालेल्या २०२२ च्या एशियन पॅरा गेम्समध्ये याच प्रकारात सिमरनला १२.६८ सेकंदांच्या वेळेसह रौप्यपदक मिळाले होते. यंदा तिने आपली वेळ सुधारत थेट सुवर्णपदकाला गवसणी घातली. पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मधील कांस्यपदक विजेती आणि १०० मीटरची जागतिक विजेती असलेल्या सिमरनने आपल्या आंतरराष्ट्रीय यशात आणखी एक मानाचा तुरा खोवला.

याआधी मंगळवारी सिमरनने महिलांच्या २०० मीटर टी१२ शर्यतीत २४.८० सेकंदांची वेळ नोंदवत सुवर्णपदक जिंकले होते. त्यामुळे या स्पर्धेत तिच्या नावावर आता दोन सुवर्णपदके जमा झाली आहेत.

तेजलबेन दामोरचे कांस्यपदक

महिलांच्या २०० मीटर टी१२ शर्यतीत गुजरातच्या दृष्टिबाधित पॅरा धावपटू तेजलबेन दामोर हिनेही चमकदार कामगिरी केली. तिने २५.२३ सेकंदांची वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवत कांस्यपदक पटकावले.

धावण्याच्या शर्यतीत भारताचे वर्चस्व

पुरुषांच्या १०० मीटर टी४७ प्रकारात भारताने सुवर्ण आणि रौप्यपदक पटकावत दुहेरी यश मिळवले. दिलीप गावित महादू याने १०.६९ सेकंदांत शर्यत पूर्ण करत सुवर्णपदक जिंकले. मोहम्मद बासिल मोर्सिंगनाकाथी याने १०.७२ सेकंदांची वेळ नोंदवत रौप्यपदक मिळवले. बासिलने या कामगिरीदरम्यान नवीन गेम्स रेकॉर्डही नोंदवला.

पुरुषांच्या १०० मीटर टी६४ प्रकारात प्रणव देसाई याने ११.९६ सेकंदांची वेळ नोंदवत कांस्यपदक जिंकले.

भालाफेकीतही भारतीय खेळाडूंची चमक

भालाफेकीच्या विविध प्रकारांत भारतीय खेळाडूंनी पदकांची कमाई केली. पुरुषांच्या एफ५५ प्रकारात सुखचैन याने २९.९४ मीटरची वैयक्तिक सर्वोत्तम फेक नोंदवत कांस्यपदक पटकावले. या प्रकारात चीनच्या फेईफेई झोऊ याने ३७.६३ मीटरची विश्वविक्रमी फेक करत सुवर्णपदक जिंकले, तर इराणच्या जफर जाकेर याने ३६ मीटरच्या फेकीसह रौप्यपदक मिळवले.

पुरुषांच्या एफ१२/१३ प्रकारात मनजीत व्यास याने ६१.०३ मीटरची वैयक्तिक सर्वोत्तम फेक नोंदवत रौप्यपदक जिंकले.

पुरुषांच्या एफ५३ प्रकारातही भारताला दोन पदके मिळाली. प्रदीप कुमार याने २७.४५ मीटरची सर्वोत्तम फेक करत रौप्यपदक पटकावले, तर आयुष वर्मा याने १७.८८ मीटरच्या फेकीसह कांस्यपदक जिंकले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version