भारतीय बुद्धिबळपटू अर्जुन एरिगैसी आणि आर. प्रज्ञाननंदा यांनी टोटल चेस वर्ल्ड चॅम्पियनशिप टूर पायलट स्पर्धेत शानदार विजय नोंदवले. एरिगैसीने नेदरलँड्सच्या जॉर्डन व्हॅन फॉरेस्टला आर्मागेडन टायब्रेकरमध्ये पराभूत केले, तर प्रज्ञाननंदाने उझबेकिस्तानच्या नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्हवर मात केली.
एरिगैसीने पहिल्या दिवशी ११.५-८.५ अशी आघाडी घेतली होती. मात्र, बुधवारी फॉरेस्टने जोरदार पुनरागमन करत दुसऱ्या दिवशी १२-८ असा विजय मिळवला. त्यामुळे नवव्या ते बाराव्या स्थानासाठी आर्मागेडन टायब्रेकरचा निर्णायक सामना खेळवण्यात आला. या लढतीत काळ्या मोहरांसह खेळणाऱ्या फॉरेस्टने बहुतांश वेळ वर्चस्व राखले होते. मात्र, ३४व्या चालीवर त्याची चूक झाली आणि एरिगैसीने संधी साधत विजयावर शिक्कामोर्तब केले. आता नवव्या स्थानासाठी त्याची लढत हायक एम. मार्टिरोसियनशी होणार आहे.
दुसरीकडे, प्रज्ञाननंदाने अब्दुसत्तोरोव्हला पराभूत करत २१व्या स्थानासाठीच्या लढतीत प्रवेश केला. फास्ट क्लासिकल सामन्यापूर्वी प्रज्ञाननंदा ३.५-८.५ अशा पिछाडीवर होता. मात्र, काळ्या मोहरांसह खेळताना त्याने शानदार पुनरागमन केले आणि दिवसअखेर ११.५-८.५ अशी बाजी मारली. आता त्याचा सामना अभिमन्यू मिश्राशी होणार आहे.
या विजयामुळे प्रज्ञाननंदाची बहीण आर. वैशाली हिच्याविरुद्ध संभाव्य लढतही टळली. याबाबत बोलताना प्रज्ञाननंदाने सुटकेचा नि:श्वास सोडल्याचे सांगितले. बहिणीविरुद्ध खेळण्याची वेळ टळल्याचा आनंद असल्याचे सांगतानाच अब्दुसत्तोरोव्हसारख्या बलाढ्य प्रतिस्पर्ध्याला हरवणेही विशेष असल्याचे त्याने नमूद केले.
