महिला कुस्तीपटूंच्या कथित लैंगिक छळप्रकरणी भारतीय कुस्ती महासंघाचे (डब्ल्यूएफआय) माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांनी दिल्लीतील राऊज अॅव्हेन्यू न्यायालयाच्या सत्र न्यायालयात आपला लेखी जवाब दाखल केला आहे. कनिष्ठ न्यायालयाने बृजभूषण सिंह यांच्यासह माजी सहसचिव विनोद तोमर यांची निर्दोष मुक्तता केल्याच्या निर्णयाला चार महिला कुस्तीपटूंनी आव्हान दिले आहे.
या अपील प्रकरणात महिला कुस्तीपटूंच्या वतीने युक्तिवाद ऐकण्यासाठी न्यायालयाने २७ आणि २८ नोव्हेंबर या तारखा निश्चित केल्या आहेत. तर बृजभूषण सिंह यांच्या बाजूने युक्तिवाद ऐकण्यासाठी ५ आणि ९ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
महिला कुस्तीपटूंनी दाखल केलेल्या अपिलात कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायद्याच्या कसोटीवर टिकणारा नसल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच उपलब्ध पुराव्यांचे योग्य मूल्यमापन करण्यात आले नसल्याचेही अपीलकर्त्यांचे म्हणणे आहे.
३ ऑगस्ट रोजी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी अश्विनी पंवार यांनी बृजभूषण सिंह आणि विनोद तोमर यांची निर्दोष मुक्तता केली होती. अभियोजन पक्ष आरोप नि:संशयपणे सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले होते.
या प्रकरणाला जानेवारी २०२३ मध्ये सुरुवात झाली होती. ऑलिम्पिकपटू विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यासह अनेक कुस्तीपटूंनी दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन केले होते. बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळ आणि धमकावल्याचे आरोप करण्यात आले होते. त्यांच्या राजीनाम्यासह कुस्ती महासंघ बरखास्त करण्याची मागणीही करण्यात आली होती.
मे २०२४ मध्ये राऊज अॅव्हेन्यू न्यायालयाने बृजभूषण सिंह यांच्याविरोधात लैंगिक छळ आणि पाच महिला कुस्तीपटूंच्या विनयभंगाशी संबंधित आरोप निश्चित केले होते. मात्र, सिंह यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावत खटल्याला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला होता.
