नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने (NMIA) एका दिवसात २०० हून अधिक विमानांचे उड्डाण आणि आगमन हाताळण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. गुरुवारी (१९ नोव्हेंबर) विमानतळावर ही कामगिरी नोंदवण्यात आली. विमानतळ सुरू झाल्यापासूनचा हा सर्वोच्च दैनंदिन विमान वाहतुकीचा आकडा असल्याची माहिती अदाणी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडचे संचालक जीत अदाणी यांनी दिली.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील पोस्टमध्ये जीत अदाणी यांनी या कामगिरीचे श्रेय विमानतळ कर्मचाऱ्यांची मेहनत, नियोजनबद्ध तयारी आणि सांघिक प्रयत्नांना दिले. विमानतळाची वाढती परिचालन क्षमता दर्शवणारा हा महत्त्वाचा टप्पा असून, भविष्यात अधिक मोठ्या प्रमाणावर विमान वाहतूक हाताळण्यासाठी यामुळे मदत होईल, असे त्यांनी म्हटले.
दरम्यान, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (CSMIA) टर्मिनल-१ च्या पुनर्विकासादरम्यान काही आंतरराष्ट्रीय विमानसेवा नवी मुंबई विमानतळावर हलवण्याची तयारी सुरू आहे. अनेक परदेशी विमान कंपन्यांनी याबाबत सूचना केली आहे. इंडिगो, एअर इंडिया समूह आणि अकासा एअर यांनीही आपल्या काही सेवा नवी मुंबईतून चालवण्यास सहमती दर्शवली आहे.
हे ही वाचा:
चौकशीसाठी आलेल्या अभिषेक बॅनर्जींसमोर ‘चोर-चोर’ घोषणाबाजी
नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह येणार भारत दौऱ्यावर
पार्थ पवारांना आरोपी करण्याची मागणी फेटाळली
तिरुपरंकुंद्रम टेकडीवर दीप प्रज्वलनास परवानगी
सध्या मुंबई विमानतळाची वार्षिक प्रवासी क्षमता ५.५ कोटी आहे. पुनर्विकासादरम्यान सुमारे ५० लाख प्रवाशांची वाहतूक नवी मुंबईकडे वळवण्याचे नियोजन आहे. यासाठी २०२७ च्या उन्हाळी हंगामात अतिरिक्त विमान स्लॉट हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव आहे. पुनर्विकासानंतर मुंबई विमानतळाची क्षमता ६.५ कोटी प्रवाशांपर्यंत वाढणार आहे. नवी मुंबई विमानतळाच्या पहिल्या टप्प्याची क्षमता वार्षिक २ कोटी प्रवाशांची असून, संपूर्ण प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ती ९ कोटींपर्यंत पोहोचणार आहे. तसेच दरवर्षी ५ लाख मेट्रिक टन मालवाहतूक हाताळण्याची क्षमता विकसित केली जाणार आहे.
