तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) खासदार आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी शुक्रवारी कोलकात्यातील गिरीश पार्क पोलिस ठाण्यात चौकशीसाठी दाखल झाले. यावेळी पोलिस ठाण्याबाहेर जमलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात ‘चोर-चोर’च्या घोषणा दिल्या. प्रत्युत्तरादाखल तृणमूल कार्यकर्त्यांनीही घोषणाबाजी केली. त्यामुळे परिसरात दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झाला.
पोलिस कर्मचाऱ्यांना धमकावणे आणि सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपांशी संबंधित तक्रारीवरून बॅनर्जी यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. २९ ऑक्टोबर रोजी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना, मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी आणि राज्य सरकारच्या सांगण्यावरून पोलिस विरोधी पक्षांच्या नेत्यांविरोधात खोटे गुन्हे दाखल करत असल्याचा आरोप केला होता. सरकार बदलल्यानंतर संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल, असेही ते म्हणाले होते. त्यानंतर ३१ ऑक्टोबरला एका महिलेने त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. १३ नोव्हेंबरला पोलिसांनी बॅनर्जी यांच्या कालीघाट येथील निवासस्थानी जाऊन त्यांना २० नोव्हेंबरला चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस दिली होती.
हे ही वाचा:
नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह येणार भारत दौऱ्यावर
पार्थ पवारांना आरोपी करण्याची मागणी फेटाळली
तिरुपरंकुंद्रम टेकडीवर दीप प्रज्वलनास परवानगी
कुख्यात गुंड नसीम दुर्रानी चकमकीत ठार
दरम्यान, पोलिस ठाण्यात जाण्यापूर्वी बॅनर्जी यांनी सोशल मीडियावर भाजप नेत्यांनी पश्चिम बंगाल पोलिसांबाबत केलेल्या विधानांचे व्हिडिओ शेअर करत भाजपवर टीका केली. आपण पोलिसांच्या समन्सला नेहमीच प्रतिसाद दिला असून यापुढेही सहकार्य करू, अशी भूमिका त्यांनी यापूर्वी मांडली होती.
