ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि पोर्तुगालचे मुख्य प्रशिक्षक जॉर्ज जीसस यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड समोर आली आहे. रोनाल्डोला पुन्हा राष्ट्रीय संघाकडून खेळायचे असेल, तर त्याच्यासाठी संघाचे दरवाजे खुले आहेत, असे जीसस यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, पुढील संघाची घोषणा होण्यापूर्वी रोनाल्डोने आपल्या भविष्याबाबत निर्णय घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
४१ वर्षीय रोनाल्डोने कर्णधारपदाच्या भूमिकेवरून जीसस यांच्यासोबत मतभेद झाल्यानंतर राष्ट्रीय संघाचे शिबिर सोडले होते. त्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट करत योग्य वेळ आल्यावर राष्ट्रीय संघ सोडण्यामागची कारणे सांगणार असल्याचे त्याने म्हटले होते.
नॉर्वेविरुद्ध २-१ असा विजय मिळवत पोर्तुगालने नेशन्स लीगच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्यानंतर रोनाल्डोच्या आंतरराष्ट्रीय भवितव्याबाबत बोलताना जीसस म्हणाले, “माझ्याकडून सर्व काही खुले आहे. रोनाल्डोला पुढील संघ निवडीपूर्वी आपल्या आयुष्याबाबत निर्णय घ्यावा लागेल. त्याला राष्ट्रीय संघात राहून खेळायचे असेल तर का नाही? माझ्या मनात कोणतीही नाराजी नाही. हा केवळ गैरसमज होता आणि तो सहज सोडवता येऊ शकतो.”
नॉर्वेविरुद्ध रोनाल्डोला बाकावरच ठेवले
नेशन्स लीगच्या सुरुवातीच्या सामन्यात वेल्सविरुद्धच्या १-० विजयात रोनाल्डो संघात होता. मात्र, नॉर्वेविरुद्धच्या पुढील सामन्यात त्याला राखीव खेळाडू म्हणून ठेवण्यात आले. दुसऱ्या सत्रात वॉर्मअप करण्यास सांगितल्यानंतर रोनाल्डो काहीसा नाराज दिसला; मात्र त्याला मैदानावर उतरवण्यात आले नाही.
२००८नंतर प्रथमच एखाद्या स्पर्धात्मक आंतरराष्ट्रीय सामन्यात रोनाल्डोला राखीव खेळाडू म्हणून ठेवूनही मैदानावर उतरवण्यात आले नाही.
‘रोनाल्डोला शानदार निरोप मिळायला हवा’
रोनाल्डोच्या संघातून बाहेर पडण्याच्या चर्चेदरम्यान पोर्तुगालचा स्टार मिडफिल्डर ब्रुनो फर्नांडिसने त्याला शानदार निरोप मिळायला हवा, असे म्हटले होते. यावर जीसस यांनीही “१०० टक्के सहमत” असल्याचे स्पष्ट केले.
जीसस म्हणाले, “रोनाल्डोचा प्रवास विश्वचषकात पराभव आणि अश्रूंसह संपता कामा नये. त्याला राष्ट्रीय संघासाठी आपला प्रवास योग्य पद्धतीने संपवता आला पाहिजे.”
त्याचवेळी प्रशिक्षक म्हणून अंतिम निर्णय आपलाच असल्याचे जीसस यांनी स्पष्ट केले. “मी प्रशिक्षक आहे. मला ज्याला बोलवायचे आहे त्याला मी बोलावू शकतो. काही क्षण असे असतात, ज्यात कोणतीही तडजोड केली जाऊ शकत नाही,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
रोनाल्डोच्या पुनरागमनाची शक्यता आता त्याच्या स्वतःच्या निर्णयावर अवलंबून असून, पोर्तुगालच्या या दिग्गजाचा आंतरराष्ट्रीय प्रवास नेमका कुठे थांबतो, याकडे फुटबॉलविश्वाचे लक्ष लागले आहे.
