लडाखमधील गावांसमोर पाणी उपलब्ध असतानाही ते योग्य वेळी वापरासाठी मिळवण्याचे मोठे आव्हान आहे. या भागात नद्या, हिमनद्या आहेत. डोंगरांवर बर्फाचे प्रचंड साठे आहेत. पण बर्फ वितळून मिळणारे पाणी आणि शेतीला पाण्याची गरज असण्याचा काळ नेहमीच जुळतो असे नाही. त्यामुळे पाण्याचा साठा करणे, त्याचे योग्य नियोजन करणे आणि गरजेच्या वेळी ते शेतांपर्यंत पोहोचवणे, ही लडाखसमोरची मोठी गरज आहे. यासाठीच लडाखमध्ये दोन महत्त्वाचे उपक्रम राबवले जात आहेत. ‘प्रोजेक्ट हिम सरोवर’अंतर्गत ४० गावांमध्ये ४० जलाशय आणि सिंधू नदीवर उभारण्यात आलेला रॉक चेक डॅम. एका उपक्रमात पाणी साठवण्यासाठी जलाशय उभारले जात आहेत, तर दुसऱ्यात नदीच्या प्रवाहातच अशी रचना तयार करण्यात आली आहे, जी पाण्याचा वेग कमी करून पाणी साठा निर्माण करते.
लडाखमध्ये पाण्याचे स्रोत असूनही पाण्याचे व्यवस्थापन हे मोठे आव्हान का ठरते?
लडाख हा शीत वाळवंटी हवामानाचा प्रदेश असल्यामुळे इथे पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे शेती आणि अनेक गावांची पाण्याची गरज प्रामुख्याने बर्फ वितळून मिळणाऱ्या प्रवाहांवर, हिमनद्यांमधून उपलब्ध होणाऱ्या पाण्यावर आणि स्थानिक जलस्रोतांवर अवलंबून असते. मात्र, पाणी उपलब्ध असणे आणि ते गरजेच्या वेळी मिळणे, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
लडाखमध्ये शेतीचा हंगाम मर्यादित आहे. विशेषतः वसंत ऋतूमध्ये पेरणीची तयारी सुरू असताना पुरेसा जलप्रवाह उपलब्ध नसेल, तर शेतकऱ्यांसमोर सिंचनाचे नियोजन करण्याचे आव्हान निर्माण होऊ शकते. दुसरीकडे, बर्फ वितळण्याच्या काळात उपलब्ध होणारे पाणी योग्य प्रकारे साठवता आले नाही, तर गरजेच्या वेळी त्याचा पुरेपूर उपयोग करता येत नाही.
याशिवाय, पाणी प्रत्येक गावापर्यंत आणि शेतापर्यंत पोहोचवण्यासाठी योग्य पायाभूत सुविधा, सिंचनाच्या वाहिन्या आणि पाणीवाटपाची व्यवस्था आवश्यक असते. हवामानातील बदलांमुळे तापमान, हिमवृष्टी आणि बर्फ वितळण्याच्या चक्रात बदल झाल्यास पाण्याचे नियोजन आणखी गुंतागुंतीचे होऊ शकते. त्यामुळे पाण्याचा योग्य वेळी साठा करणे, त्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करणे आणि गरजेच्या वेळी ते शेतांपर्यंत पोहोचवणे, ही लडाखमधील जलव्यवस्थापनाची महत्त्वाची गरज आहे. याच उद्देशाने स्थानिक भौगोलिक परिस्थितीला अनुरूप जलसंधारणाच्या पायाभूत सुविधा उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यातील दोन महत्त्वाचे उपक्रम म्हणजे ‘प्रोजेक्ट हिम सरोवर’ आणि सिंधू नदीवरील रॉक चेक डॅम!
‘प्रोजेक्ट हिम सरोवर’ची सुरुवात लडाखचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी १० एप्रिल २०२६ रोजी केली. लेह आणि कारगिल या जिल्ह्यांमध्ये सुरुवातीला ५० जलसाठे उभारण्यासाठी उत्खनन सुरू करण्यात आलं. हिवाळ्यात डोंगरांवर साचलेला बर्फ वितळल्यानंतर उपलब्ध होणारे पाणी योग्य ठिकाणी साठवून गरजेच्या काळात त्याचा वापर करता यावा, ही या प्रकल्पामागची मुख्य संकल्पना आहे. या जलसाठ्यांची लांबी ४० मीटर, रुंदी ३० मीटर आणि खोली दोन मीटर ठेवण्यात आली. या जलसाठ्यांमधून अपेक्षित लाभ मिळण्यासाठी योग्य जागेची निवड, पाण्याची आवक, साठवण क्षमता आणि पुढे पाणी वापरण्याची व्यवस्था या बाबी महत्त्वाच्या ठरतात.
१५ ऑक्टोबर २०२६ रोजी ४० गावांमधील ४० जलाशयांचे लोकार्पण करण्यात आले. स्थानिक पातळीवर पाणीसाठा निर्माण करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल आहे. मात्र, या प्रकल्पाचे वैशिष्ट्य केवळ नवीन जलाशय उभारण्यापुरते मर्यादित नाही. जुन्या जलसाठ्यांचे पुनरुज्जीवन करून त्यांची साठवण क्षमता वाढवण्यावरही भर देण्यात आला आहे. याचे एक उदाहरण म्हणजे लेहजवळील माथो गावातील तलाव. या तलावातील गाळ काढणे, भिंती मजबूत करणे आणि पाण्याच्या बाहेर पडण्याच्या रचनेत सुधारणा करणे अशी कामे करण्यात आली. त्यामुळे तलावाची साठवण क्षमता दीड कोटी लिटरवरून अडीच कोटी लिटरपर्यंत वाढल्याचे सांगण्यात आले आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार, या जलसाठ्यातून सुमारे दीडशे एकर शेतीला सिंचनाचा लाभ मिळू शकतो आणि ९० शेतकरी कुटुंबांना फायदा होण्याची अपेक्षा आहे.
यावरून एक गोष्ट स्पष्ट होते— जलसंधारण म्हणजे केवळ नवीन जलाशय बांधणे नाही. जुन्या जलसाठ्यांचे पुनरुज्जीवन करणे आणि उपलब्ध पाण्याचा अधिक प्रभावी वापर करणे, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. लडाखसारख्या पर्वतीय प्रदेशात यासाठी जलाशय उभारण्याबरोबरच वाहत्या नदीच्या प्रवाहाचे व्यवस्थापन करण्यावरही भर दिला जात आहे. याच संकल्पनेतून सिंधू नदीवर रॉक चेक डॅम उभारण्यात आला आहे.
लेहपासून सुमारे ४४ किलोमीटर अंतरावर असलेल्या उपशी येथे हा डॅम बांधण्यात आला. समुद्रसपाटीपासून सुमारे ११ हजार ४०० फूट उंचीवर असलेल्या या संरचनेचं उद्घाटन २७ मे २०२६ रोजी करण्यात आलं. हा उपक्रम ‘सिंधू जल समृद्धी अभियाना’चा भाग आहे. या डॅमचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची बांधकाम पद्धत. पारंपरिक सिमेंट-काँक्रीटऐवजी नदीपात्रात मोठमोठे दगड एकमेकांत घट्ट बसवून ही रचना तयार करण्यात आली आहे. या बांधाची लांबी सुमारे २०० फूट, पायाच्या भागाची रुंदी ३० फूट, वरच्या भागाची रुंदी १५ फूट, तर उंची सुमारे पाच फूट आहे. बांधकामासाठी जवळपास १८० मेट्रिक टन दगड वापरण्यात आले. माहितीनुसार, या दगडांचं वजन प्रत्येकी सुमारे ५०० किलोपासून ते १० टनांपर्यंत आहे. या दगडी रचनेमुळे नदीतील पाण्याचा वेग कमी होण्यास आणि बांधाच्या वरच्या बाजूला पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते. परिणामी, नदीचा प्रवाह पूर्णपणे रोखून न धरता पाणी साठवण्यासाठी जागा तयार होते. अतिरिक्त पाणी मात्र बांधावरून किंवा दगडांमधील मोकळ्या जागेतून पुढे वाहू शकते. या डॅमच्या मागील बाजूला सुमारे १,५०० फूट लांबीच्या परिसरात पाणी साठण्याची जागा तयार झाली असून, तिची अंदाजित क्षमता सुमारे चार कोटी लिटर आहे. विशेष म्हणजे, अवघ्या सात दिवसांत या डॅमचं बांधकाम पूर्ण करण्यात आले.
अवघ्या पाच फूट उंचीचा डॅम उभारण्यामागचा नेमका उद्देश काय?
लडाखमध्ये काही ठिकाणी नदीचे पाणी आसपासच्या शेतांपेक्षा खालच्या पातळीवरून वाहते. अशा वेळी नदीतून पाणी उचलून ते उंचावरच्या शेतांपर्यंत पोहोचवणे कठीण ठरू शकते. त्यामुळे नदीतील पाण्याची पातळी स्थानिक पातळीवर वाढवून पाणी उचलणे अधिक सोयीचे करणे, हा या रचनेमागचा एक महत्त्वाचा उद्देश आहे.
मात्र, नदीतील पाण्याचा प्रवाह वर्षभर सारखा राहत नाही. हंगामानुसार त्यात मोठे बदल होतात. लडाख प्रशासनाच्या माहितीनुसार, या ठिकाणी पाण्याचा प्रवाह साधारण २५ क्युसेकवरून जुलै-ऑगस्टमध्ये जवळपास २०० क्युसेकपर्यंत वाढू शकतो. त्यामुळे पाण्याची पातळी वाढवण्याबरोबरच, प्रवाह वाढल्यावर त्याचा दाब सहन करू शकेल अशी रचना उभारणेही आवश्यक होते.
‘प्रोजेक्ट हिम सरोवर’अंतर्गत पाणी साठवण्यासाठी स्वतंत्र जलाशय उभारले जात आहेत. दुसरीकडे, रॉक चेक डॅमच्या माध्यमातून नदीपात्रातच दगडी संरचना उभारून पाणी साठण्यासाठी जागा निर्माण केली जात आहे. म्हणजेच, एका उपक्रमात पाणी साठवण्याची स्वतंत्र व्यवस्था तयार केली जाते, तर दुसऱ्या उपक्रमात नदीतील पाण्याची पातळी वाढवून त्याचा उपयोग अधिक सोयीने करता यावा, असा प्रयत्न केला जातो. मात्र, या दोन्ही पद्धतींचे यश स्थानिक परिस्थितीवर अवलंबून असेल. जलाशयासाठी पाण्याचा पुरेसा स्रोत आणि योग्य जागा आवश्यक आहे. तर रॉक चेक डॅम उभारताना नदीचा प्रवाह, नदीपात्राची रचना आणि पाण्याच्या पातळीत हंगामानुसार होणारे बदल विचारात घ्यावे लागतात.
याशिवाय, या संरचनांची नियमित देखभाल, गाळाचे व्यवस्थापन आणि पाण्याचं योग्य वाटप यांनाही तितकेच महत्त्व आहे. कारण पायाभूत सुविधा उभारणे ही केवळ सुरुवात असते. त्यांचा दीर्घकाळ प्रभावी वापर होण्यासाठी योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण व्यवस्थापन आवश्यक असते. लडाखमधील या जलसंधारण उपक्रमांचं महत्त्व केवळ पाणीसाठा निर्माण करण्यापुरते मर्यादित नाही. मर्यादित शेती हंगामात शेतकऱ्यांना गरजेच्या वेळी पाणी उपलब्ध करून देणे, हे त्यांच्यासमोरचे उद्दिष्ट आहे.
लडाखसारख्या दुर्गम आणि प्रतिकूल भौगोलिक परिस्थिती असलेल्या प्रदेशात स्थानिक गरजांनुसार उभारलेल्या जलसंरचना महत्त्वाच्या ठरत आहेत. ‘प्रोजेक्ट हिम सरोवर’अंतर्गत उभारलेले जलाशय वितळलेल्या बर्फाचे पाणी साठवून ठेवण्यास मदत करतात, तर सिंधू नदीवरील रॉक चेक डॅम नदीच्या प्रवाहाचा वेग कमी करून स्थानिक पातळीवर पाणी अडवण्यास आणि ते उंचावरील शेतांपर्यंत उचलण्यास मदत करतो. या दोन्ही उपक्रमांमुळे पाण्याचे व्यवस्थापन स्थानिक गरजांनुसार करण्याचा मार्ग उपलब्ध झाला आहे. विशेषतः शेतीसाठी पाणी मिळवताना येणाऱ्या अडचणी कमी करण्याच्या दृष्टीने या संरचना फायदेशीर ठरत आहेत. लडाखमधील या उपक्रमांचं वैशिष्ट्य म्हणजे, उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीचा आधार घेत स्थानिक पातळीवरच पाण्याच्या समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
