अरुणाचल प्रदेशात प्रस्तावित ११,२०० मेगावॅट क्षमतेच्या सियांग जलविद्युत प्रकल्पाला विरोध करताना हिंसाचार उसळला. संतप्त जमावाने एनएचपीसीच्या कार्यालयाला आणि पोलीस ठाण्याला आग लावली. तसेच सात ते आठ पोलीस वाहने जाळण्यात आली. आंदोलकांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष कलिंग मोयोंग आणि काही आमदारांच्या घरांची तोडफोड केली. दगडफेकीत एका पोलीस उपअधीक्षकासह (डीएसपी) अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले. चीनमधून भारतात येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहावर नियंत्रण ठेवणे आणि संभाव्य पुराचा धोका कमी करणे, हे या प्रस्तावित धरणाचे प्रमुख उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.
सियांग जिल्ह्यातील सुमारे १५० ते २०० आंदोलकांनी पोलीस वाहनांची तोडफोड केली आणि बॅरिकेड्स तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. मिळालेल्या माहितीनुसार, आंदोलकांकडे दाओ (पारंपरिक धारदार शस्त्र), काठ्या आणि गोफणी होत्या. त्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा दलांना अश्रुधुराचा वापर करावा लागला. मेबो परिसरातील रानाघाट पुलाजवळही पोलीस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष झाला. प्रस्तावित सियांग प्रकल्पाच्या विरोधातून निर्माण झालेल्या या तणावामुळे परिसरातील परिस्थिती गंभीर बनली असून, कायदा व सुव्यवस्था राखण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
हे ही वाचा:
गंगेवर राफेल-सुखोईचा थरार; सूर्यकिरण पथकाकडून आकाशात तिरंग्याची उधळण!
‘तिसरी मुंबई’बनेल महाराष्ट्राचे ग्रोथ इंजिन
