घरविशेष‘तिसरी मुंबई’बनेल महाराष्ट्राचे ग्रोथ इंजिन

‘तिसरी मुंबई’बनेल महाराष्ट्राचे ग्रोथ इंजिन

नैना प्रकल्पावर मुख्यमंत्री फडणवीसांचे मोठे वक्तव्य

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात विकसित होणारा नैना (NAINA) प्रकल्प म्हणजेच ‘तिसरी मुंबई’ महाराष्ट्राच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाला नवी दिशा देणारा ठरणार आहे. या प्रकल्पातून भविष्यात सुमारे १५ लाख रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. यामध्ये पाच लाख उच्च वेतनाच्या आणि दहा लाख प्राथमिक ते मध्यम स्वरूपाच्या रोजगारांचा समावेश असेल. या रोजगाराच्या संधींमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य मिळावे, यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. रायगड जिल्ह्यातील शिरढोण येथे नैना क्षेत्रातील विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे या परिसरात उद्योग, व्यापार, सेवा आणि अन्य आर्थिक घडामोडींना मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, वाढत्या शहरीकरणामुळे वाहतूक कोंडी, पाणीटंचाई आणि नागरी सुविधांवरील ताण यांसारख्या समस्या निर्माण होऊ नयेत, यासाठी नियोजनबद्ध विकासावर सरकार भर देत आहे. रस्ते, पाणीपुरवठा, निवासी क्षेत्रे आणि आवश्यक पायाभूत सुविधांचा समन्वय साधून नैना परिसराचा विकास केला जाणार आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड आणि पालघर या भागांना जोडणारा विकासाचा पट्टा भविष्यात महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा ठरेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
हे ही वाचा:
गंगेवर राफेल-सुखोईचा थरार; सूर्यकिरण पथकाकडून आकाशात तिरंग्याची उधळण!

जळगावमध्ये संघाच्या पथसंचलनावर दगडफेक

सरकार पोस्ट गायब करेल म्हणणाऱ्या राज ठाकरेंनीच पोस्ट केली डिलीट

दहिसरमध्ये १३ वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण; पोक्सोअंतर्गत तरुणाला अटक

नैना प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी आणि विकसित भूखंडांच्या वाटपाचा प्रश्न सोडवण्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाची भूमिका मांडली. जमीनमालकांना त्यांच्या जमिनीच्या बदल्यात ४० टक्के विकसित जमीन देण्याची तरतूद असली, तरी संबंधित भूखंड नेमके कुठे मिळणार, याबाबत स्पष्टता नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. अंतिम विकास आराखड्यातील त्रुटी, भूखंडांचे क्रमांक आणि मालकी हक्कांच्या नोंदींमधील विसंगती दूर करण्यासाठी सिडकोला आवश्यक दुरुस्त्या करण्याचे अधिकार देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीची कागदपत्रे मिळाल्यानंतरच भूमिपूजन करण्याची भूमिका सरकारने घेतली असून, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

दरम्यान, नैना क्षेत्रातील विकासाला गती देण्यासाठी विमानतळाशी जोडणाऱ्या पायाभूत सुविधांवरही भर देण्यात येत आहे. विमानतळाच्या पूर्वेकडील जोडणीसाठी सुमारे ९५३ कोटी रुपये खर्चून उभारलेल्या पुलांचे तसेच ५० कोटी रुपये खर्चाच्या उरण बायपास पुलाचे लोकार्पण करण्यात आले. वाढत्या लोकसंख्येची गरज लक्षात घेऊन पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करणेही आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केले. केवळ रस्ते आणि इमारती उभारणे म्हणजे विकास नव्हे, तर नागरिकांना पुरेसे पाणी आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणेही तितकेच महत्त्वाचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. नैना प्रकल्प, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि आधुनिक पायाभूत सुविधांच्या एकत्रित विकासातून या परिसरात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे ‘तिसरी मुंबई’ हा प्रकल्प महाराष्ट्राच्या भविष्यातील आर्थिक विकासातील महत्त्वाचा टप्पा ठरण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version