महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केलेली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्यावरील डॉक्युमेंटरी रविवारी स्वतःच डिलीट केली. विशेष म्हणजे, ‘सरकार ही पोस्ट गायब करेल, त्यामुळे ती सेव्ह करून ठेवा,’ असे आवाहन करत राज ठाकरे यांनी ही पोस्ट शेअर केली होती. मात्र, आता त्यांनीच ती पोस्ट हटवल्याने त्यांच्या भूमिकेवरून पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. राज ठाकरे यांच्या धरसोडीच्या भूमिकेवर यापूर्वीही टीका होत असताना, या निर्णयामुळे त्यांनी पुन्हा पलटी मारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
हॉटमेलचे संस्थापक सबीर भाटिया यांनी तयार केलेल्या या डॉक्युमेंटरीला लोकांना माहिती मिळावी या उद्देशाने सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर ‘एक्स’वर (X) ४८ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले होते, असा दावा राज ठाकरे यांनी केला. ही पोस्ट सेव्ह करून ठेवा. सरकार गायब करेल असे म्हणत राज ठाकरेंनी ती पोस्ट शेअर केली होती. पण आता ती पोस्ट राज ठाकरेंनीच डिलीट केली आहे.
हे ही वाचा:
टेरर फंडिंगप्रकरणी काश्मीरमध्ये चार महिलांसह सहा जणांना अटक
दहिसरमध्ये १३ वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण; पोक्सोअंतर्गत तरुणाला अटक
‘स्टारलिंक’ ठरतेय युद्धातील निर्णायक कडी!
विशेष मुलांच्या आई स्वाती मोहिते यांना ‘केशवसृष्टी पुरस्कार’
राज ठाकरे यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले, “मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस हे देशातील सर्वांत कार्यक्षम पोलीस दल आहे. माझ्या मनात त्यांच्याबद्दल नेहमीच आदर राहिला आहे. मुंबई पोलीस दलाच्या प्रमुखांनी केलेल्या विनंतीचा मान राखण्यासाठीच मी हा निर्णय घेतला आहे.”
राज ठाकरे यांनी सांगितले की, या डॉक्युमेंटरीमध्ये गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील मैत्री किती जुनी आहे, याबाबत संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.
सबीर भाटिया यांनी ही डॉक्युमेंटरी अलीकडेच तयार केली असली, तरी जानेवारी २०२६ मध्येच राज ठाकरे यांनी आपल्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी यासंदर्भात एक सविस्तर सादरीकरण केले होते. अदानी समूह संपूर्ण देश गिळंकृत करण्याच्या दिशेने कसा वाटचाल करत आहे, हे या सादरीकरणातून स्पष्ट करण्यात आले होते, असे त्यांनी नमूद केले.
या सादरीकरणाला मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यावेळी तयार करण्यात आलेले व्हिडिओ आजही त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर उपलब्ध आहेत. त्यातील काही व्हिडिओंचा समावेश या डॉक्युमेंटरीमध्येही करण्यात आला होता, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
डॉक्युमेंटरी हटवल्याने मनसे नेत्यांना आश्चर्य
दरम्यान, राज ठाकरे यांनी ही डॉक्युमेंटरी सोशल मीडियावरून हटवल्यामुळे मनसेच्या नेत्यांनाही आश्चर्य वाटले. कारण, शनिवारी पक्षाच्या एका शाखेत या डॉक्युमेंटरीचे प्रदर्शन करण्यात आले होते.
