घरविशेषविशेष मुलांच्या आई स्वाती मोहिते यांना ‘केशवसृष्टी पुरस्कार’

विशेष मुलांच्या आई स्वाती मोहिते यांना ‘केशवसृष्टी पुरस्कार’

विशेष अतिथी म्हणून आमदार अतुल भातखळकरांची उपस्थिती

विशेष मुलांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या स्वावलंबनासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रायगड जिल्ह्यातील पेण येथील ‘आई डे केयर’ संस्थेच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांना १७ वा केशवसृष्टी पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. बोरिवली येथील अटल स्मृती उद्यान सभागृहात आयोजित सोहळ्यात सुप्रसिद्ध तंत्रज्ञ, लेखक, उद्योगरत्न आणि समाजसेवक अच्युत गोडबोले यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, मानपत्र आणि दोन लाख रुपयांचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरूप आहे. विशेष अतिथी म्हणून आमदार अतुल भातखळकर हे उपस्थित होते.

समाजातील दुर्बल घटकांच्या उत्थानासाठी आपले आयुष्य समर्पित करणाऱ्या समाजसेवकांचा केशवसृष्टी संस्थेच्या वतीने दरवर्षी या पुरस्काराने गौरव केला जातो. यंदा या पुरस्काराचे सतरावे वर्ष होते. पुरस्कार स्वीकारल्यानंतर स्वाती मोहिते यांनी कृतज्ञता व्यक्त केली. “प्रत्येक दिव्यांग मुलाला सहानुभूती नको, तर सन्मान द्या. त्यांच्यातील त्रुटी शोधण्याऐवजी त्यांची क्षमता ओळखा आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणा,” असे आवाहन त्यांनी केले. विशेष मुलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आणि त्यांना समाजात सन्मानाने जगता यावे, यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचेही त्यांच्या मनोगतातून अधोरेखित झाले.

अच्युत गोडबोले यांनी स्वाती मोहिते यांच्या कार्याचे कौतुक केले. “विशेष मुलांसाठी काम करणे खरोखरच अवघड आहे. माझा स्वतःचा मुलगा ऑटिझमने ग्रस्त असल्याने या सगळ्या गोष्टी मी जवळून अनुभवल्या आहेत. त्यामुळे स्वाती मोहिते यांचे कार्य विशेष कौतुकास्पद आहे,” असे ते म्हणाले. वयाच्या ७३व्या वर्षी आपण कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) हे तंत्रज्ञान शिकलो आणि त्यावर चार पुस्तके लिहिली, असे सांगत आगामी दहा वर्षांत या तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक असाध्य रोगांवर अत्याधुनिक उपचार उपलब्ध होऊ शकतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

हे ही वाचा:

मुंबईकरांनो, उद्या मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक!

जामिया विद्यापीठात विद्यार्थी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये संघर्ष

टायगरवरील हल्ल्यानंतर आरोपींना मिळत होते मीडियातून अपडेट्स

शीख समुदायाच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठीच राहुल गांधींची रॅली

यावेळी विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेले आमदार अतुल भातखळकर यांनीही स्वाती मोहिते यांच्या कार्याचा गौरव केला. “संकटसमयी खचून न जाता अनेक विशेष मुलांची आई होऊन त्यांच्यासाठी कार्य करणे ही कौतुकास्पद बाब आहे. अशा मुलांच्या आणि त्यांच्या कुटुंबांच्या समस्या गंभीर असतात. समाजाने या समस्यांकडे संवेदनशीलतेने पाहून त्यांना सहकार्य केले पाहिजे,” असे ते म्हणाले. तसेच ‘आई डे केयर’ संस्थेला एक लाख रुपयांचा धनादेश देण्याची घोषणाही त्यांनी केली. या पुरस्कार सोहळ्याला केशवसृष्टीचे अध्यक्ष डॉ. सतीश मोद, माजी महापौर शुभा राऊळ, डॉ. अल्का मांडके, डॉ. कविता रेगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version