मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रविवार, २५ ऑक्टोबर रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मुख्य मार्गावरील माटुंगा ते मुलुंड आणि हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान हा ब्लॉक असेल. त्यामुळे मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार असून, प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करून घराबाहेर पडावे, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.
मुख्य मार्गावरील माटुंगा ते मुलुंडदरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.४५ वाजेपर्यंत ब्लॉक असेल. या काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.३६ ते दुपारी ३.१० दरम्यान सुटणाऱ्या डाउन जलद लोकल माटुंगा ते मुलुंडदरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या सर्व नियोजित स्थानकांवर थांबणार असून, गंतव्यस्थानी सुमारे १५ मिनिटे उशिराने पोहोचतील. ठाण्याहून सुटणाऱ्या अप जलद लोकलही मुलुंड ते माटुंगा दरम्यान धीम्या मार्गावरून धावतील. खोपोलीहून सुटणारी सीएसएमटी लोकल दुपारी १.४८ ऐवजी २.०६ वाजता सुटेल.
हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशीदरम्यान सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून वाशी, बेलापूर आणि पनवेलकडे जाणाऱ्या सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ या वेळेतील लोकल रद्द राहतील. तसेच या स्थानकांवरून सीएसएमटीकडे येणाऱ्या सकाळी १०.१७ ते दुपारी ३.४७ या वेळेतील लोकल सेवाही रद्द करण्यात येतील.
हे ही वाचा:
“ते पैसे माझ्यापर्यंत आलेच नाहीत!”
तिलक-अर्शदीपचा विक्रमांचा धमाका!
कसारा मार्गावर १५ डब्यांच्या आणखी १८ लोकल धावणार
प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी-कुर्ला आणि पनवेल-वाशी दरम्यान विशेष लोकल चालवण्यात येतील. ट्रान्स-हार्बर आणि उरण पोर्ट मार्गावरील सेवा रविवारच्या वेळापत्रकानुसार सुरू राहतील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ठाणे-वाशी किंवा ठाणे-नेरुळ मार्गे प्रवास करता येईल. देखभाल आणि सुरक्षिततेसाठी हा ब्लॉक आवश्यक असल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे.
