काँग्रेस नेते राहुल गांधी आणि इंडिया आघाडीने १ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर आयोजित केलेल्या सभेवरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी सभेच्या तारखेवर प्रश्न उपस्थित करत राहुल गांधी यांच्यावर शीख समुदायाच्या भावना दुखावल्याचा आरोप केला आहे. १९८४ मधील शीखविरोधी हिंसाचाराच्या आठवणींशी १ नोव्हेंबर ही तारीख जोडलेली असल्याने याच दिवशी सभा आयोजित करण्याचा आग्रह का धरला जात आहे, असा सवाल त्यांनी केला. “राहुल गांधींना १ नोव्हेंबरलाच सभा घेण्याचा आग्रह का आहे? शीख समुदायाच्या जखमांवर मीठ चोळायचे आहे का?” अशा शब्दांत रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली.
पत्रकार परिषदेत बोलताना प्रसाद यांनी दावा केला की, इंडिया आघाडीतील काही घटक पक्षांनीही सभेची तारीख बदलण्याची सूचना केली होती. या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी २२ ऑक्टोबर रोजी ऑनलाइन बैठक आयोजित करण्याचा प्रयत्न झाला; मात्र काही पक्ष सहभागी न झाल्याने चर्चा पुढे जाऊ शकली नाही, असे त्यांनी सांगितले. १९८४ च्या शीखविरोधी हिंसाचारात अनेकांना जीव गमवावा लागला होता. त्यामुळे या दिवसाचे ऐतिहासिक आणि भावनिक महत्त्व लक्षात घेऊन सभेच्या तारखेबाबत संवेदनशीलता दाखवायला हवी, अशी भूमिका भाजपने मांडली आहे.
हे ही वाचा:
बॉण्डवर सही करण्यास नेहा बोराचा नकार
पर्यायी गुंतवणूक निधीकडे श्रीमंतांचा वाढता कल
दिल्लीतल्या आंदोलनासाठी ५००-१०००ला विकली जात होती प्रेस कार्ड
चार वर्षे वनवास, मेहनतीवर विश्वास
रविशंकर प्रसाद यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने शीख समुदायासाठी घेतलेल्या निर्णयांचाही उल्लेख केला. करतारपूर साहिब कॉरिडॉर आणि साहिबजाद्यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ करण्यात आलेल्या उपक्रमांचा संदर्भ देत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. तसेच १९८४ च्या हिंसाचारासंदर्भातील काँग्रेसच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीने या सभेच्या माध्यमातून मतदार यादी आणि निवडणूक प्रक्रियेशी संबंधित मुद्दे उपस्थित करण्याची भूमिका घेतली आहे. मात्र, सभेच्या तारखेवरून भाजपने केलेल्या टीकेमुळे राजकीय वातावरण तापले असून, या आरोपांवर काँग्रेसची भूमिका काय असते, याकडे लक्ष लागले आहे.
