घरस्पोर्ट्सचार वर्षे वनवास, मेहनतीवर विश्वास

चार वर्षे वनवास, मेहनतीवर विश्वास

भारतीय संघात पुनरागमन होईल की नाही, याची चिंता न करता सातत्याने मेहनत करत राहिलो. वर्तमानावर लक्ष केंद्रित केल्यामुळेच पुन्हा भारतीय जर्सी घालण्याची संधी मिळाली, असे अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने सांगितले. तब्बल चार वर्षांनंतर भारतीय संघात पुनरागमन केलेल्या भुवनेश्वरने आपल्या यशामागील प्रवास उलगडला.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये भुवनेश्वरने गेल्या तीन-चार वर्षांतील अनुभव सांगितले. भारतीय संघात स्थान मिळवण्याची अपेक्षा न ठेवता देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये कामगिरी सुधारण्यावर भर दिला. मात्र, राष्ट्रीय संघापासून दूर असतानाही फिटनेस, गोलंदाजीतील कौशल्य आणि मानसिक तयारी यांमध्ये कोणतीही कमतरता ठेवली नाही, असे त्याने स्पष्ट केले.

‘गेल्या चार वर्षांत मी भारतीय जर्सीसाठी धावाधाव केली नाही. भविष्यात काय होईल, याचा विचार न करता वर्तमानात राहून आपले काम करत राहिलो,’ असे भुवनेश्वर म्हणाला. मागील दोन आयपीएल हंगामांत कोणत्याही अपेक्षेशिवाय खेळलो; मात्र तयारी पूर्ण केली होती. दोन वर्षांत दोन आयपीएल विजेतेपदे मिळतील, असा विचारही केला नव्हता, असेही त्याने सांगितले.

टी-२० क्रिकेटमध्ये गोलंदाजांची कसोटी

आधुनिक टी-२० क्रिकेटमध्ये फलंदाज अधिक आक्रमक झाले असून, २०० धावांची मजलही आता कमी वाटू लागली आहे, असे निरीक्षण भुवनेश्वरने नोंदवले. इम्पॅक्ट प्लेयरच्या नियमामुळे फलंदाज पहिल्याच चेंडूपासून आक्रमण करतात. मात्र, गोलंदाजांनी दबावाखाली न येता रणनीतीच्या जोरावर सामन्यावर नियंत्रण मिळवले पाहिजे, असे त्याचे मत आहे.

दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये खेळताना परिस्थितीशी जुळवून घेणे आव्हानात्मक असते. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये गोलंदाजांना अपेक्षित मदत मिळत नसल्याने अनुभव आणि मानसिक परिपक्वता महत्त्वाची ठरते, असेही त्याने स्पष्ट केले.

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यातील भारतीय संघाच्या विजयामुळे खेळाडूंचा आत्मविश्वास वाढल्याचे भुवनेश्वरने सांगितले. फलंदाजांनी केलेल्या प्रभावी कामगिरीचा आगामी सामन्यांमध्ये फायदा होईल, असा विश्वासही त्याने व्यक्त केला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version