घरविशेषदिल्लीतल्या आंदोलनासाठी ५००-१०००ला विकली जात होती प्रेस कार्ड

दिल्लीतल्या आंदोलनासाठी ५००-१०००ला विकली जात होती प्रेस कार्ड

तलवारीपेक्षा लेखणी अधिक सामर्थ्यवान असते, असे म्हटले जाते. पण आता स्वतंत्र पत्रकारांच्या रूपात अवघ्या ५००-१००० रुपयांत प्रेस कार्ड बनवून पत्रकार होता येत असेल तर पत्रकारितेची ती लेखणी तलवारीपेक्षा धारदार असेल की ती काही लिहिण्यापूर्वीच मोडून पडेल असा सवाल उपस्थित होत आहे.

‘इंडिया टुडे’ने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात नुकत्याच झालेल्या आंदोलनांचे वार्तांकन करणाऱ्या काही बनावट पत्रकारांचा शोध घेतला आहे. या पत्रकारांच्या प्रेस ओळखीचा माग काढताना अशी संकेतस्थळे समोर आली, ज्या माध्यमातून पत्रकारितेशी संबंधित ओळखपत्रे आणि साहित्य विकले जात असल्याचे आढळले.

सीजेपी आंदोलनाचे वार्तांकन करणाऱ्या एका रिपोर्टरच्या हातात ‘इंडियन प्रेस युनियन’चा लोगो असलेला मायक्रोफोन दिसत आहे. ‘इंडियन प्रेस युनियन’ हे संकेतस्थळ पत्रकारितेशी संबंधित ओळखपत्रे ऑनलाइन विकते. सीजेपीच्या आंदोलनांमुळे हजारो तरुण रस्त्यावर उतरले. काही जण न्यायाच्या मागणीसाठी आले होते, तर काही राजकीय बदलाची मागणी करत होते. मात्र घोषणाबाजी आणि संघर्षांदरम्यान आणखी एक स्पर्धा सुरू होती—लाईक्स, व्ह्यूज आणि फॉलोअर्स मिळवण्याची स्पर्धा. काहींसाठी हे आंदोलन व्हायरल होण्याची संधी बनले होते.

पहिल्या टप्प्यातील आंदोलन तत्कालीन शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात झाले होते. हे आंदोलन नीट परीक्षेतील पेपरफुटीच्या मुद्द्यावरून झाले होते. या आंदोलनादरम्यान मोठ्या वृत्तसंस्थांचा पाठिंबा नसतानाही अनेक तरुण पत्रकारांनी निर्भीडपणे घटनास्थळावरून वार्तांकन केले आणि त्यांना ओळख मिळाली. दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात झाले. निवडणूक आयोगाच्या एसआयआर मोहिमेशी संबंधित कथित अधिकारांच्या अतिक्रमणाच्या आरोपांवरून हे आंदोलन करण्यात आले. यावेळी कॅमेरे आणि मायक्रोफोन सर्वत्र दिसू लागले.

मात्र अधिकाधिक लोकांनी मायक्रोफोन हातात घेतल्यानंतर एक प्रश्न निर्माण झाला—प्रत्यक्षात पत्रकारिता कोण करत होते आणि कोण केवळ पत्रकार असल्याचे नाटक करत होते? ‘इंडिया टुडे’ला जंतरमंतरवर वार्तांकन करणारा एक ‘रिपोर्टर’ दिसला. त्याच्या हातात ‘इंडियन प्रेस युनियन’चा लोगो असलेला मायक्रोफोन होता. या संस्थेच्या डिजिटल अस्तित्वाचा बारकाईने मागोवा घेतल्यानंतर असे आढळले की, तिचे संकेतस्थळ दिशाभूल करणारे स्वरूपाचे असून प्रत्यक्षात ते मायक्रोफोन, प्रेस ओळखपत्रे आणि पत्रकारितेशी संबंधित इतर ओळखपत्रे विकते.

हे ही वाचा:

चार वर्षे वनवास, मेहनतीवर विश्वास

वरळीतील उंच इमारतीमुळे सुरक्षेचा प्रश्न; केंद्र सरकार न्यायालयात

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ‘लोहपुरुष’चे केले कौतुक

श्रीहरिकोटापेक्षा राहुल गांधींच्या लॉन्चिंगचे प्रयत्न जास्त

पुढील तपासात ‘इंडिया टुडे’ला अशा किमान आणखी पाच संकेतस्थळांचा शोध लागला, जी प्रेस ओळखपत्रांची जाहिरात करत होती. त्यापैकी काही ओळखपत्रांची किंमत अवघी ५९९ रुपये होती. ना कोणतीही वृत्तसंस्था, ना वार्तांकनाचा अनुभव—फक्त ‘PRESS ID’ असे लिहिलेले एक कार्ड.

अशा कार्डमध्ये किती ताकद?

पोलिसांची तपासणी टाळण्यासाठी, प्रतिबंधित भागात प्रवेश मिळवण्यासाठी, माहितीची मागणी करण्यासाठी किंवा त्याहून महत्त्वाचे म्हणजे वैयक्तिक दाव्यांना विश्वासार्ह पत्रकारितेचे स्वरूप देण्यासाठी अशी कार्ड वापरली जाऊ शकतात. यापैकी किमान तीन संकेतस्थळे फेब्रुवारी ते मार्च २०२६ या कालावधीत तयार करण्यात आली होती. NEED24 हे संकेतस्थळ २०२२ पासून अस्तित्वात असल्याचे आढळते, तर FNF २०२४ मध्ये आणि  Indian Press Union (IPU) २०२५ मध्ये तयार करण्यात आले.

विशेष म्हणजे, IPU स्वतः २०१६ पासून कार्यरत असल्याचा दावा करते. मात्र हा दावा सिद्ध करणारा कोणताही पुरावा ‘इंडिया टुडे’ला सापडला नाही. यापैकी काही संस्था जंतरमंतरवर दिसून आल्या, तर पत्रकारितेशी संबंधित ओळखपत्रे विकणाऱ्या संकेतस्थळांचा व्यापक शोध घेताना इतर संस्थांचा शोध लागला.

पत्रकारितेच्या अधिकाराचे केवळ बाह्य स्वरूप विकत घेणे किती सोपे झाले आहे, हे ‘इंडियन प्रेस युनियन’च्या संकेतस्थळावरून दिसून येते. या संकेतस्थळावर मुलाखती, पत्रकार परिषदा आणि विविध कार्यक्रमांचे दिसणारे एआय-निर्मित फोटो देखील प्रदर्शित करण्यात आले आहेत. त्यातून ही संस्था आधीपासूनच कार्यरत असलेली प्रतिष्ठित संस्था असल्याचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते.

काही लोकांनी या प्रेस ओळखीचा स्थानिक प्रश्नांसाठी वापर केल्याचे अनुभवही शेअर केले आहेत. त्यांनी ही ओळख १,७९९ रुपयांना खरेदी केली होती. वाहन पासपासून मायक्रोफोनपर्यंत—विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या प्रेस किटमध्ये अनेक गोष्टींचा समावेश आहे.

‘इंडिया टुडे’ला इंडियन प्रेस युनियनशी संबंधित लोकांचे डझनभर व्हिडिओ आढळले, ज्यात ते सीजेपी प्रोटेस्ट २.० दरम्यान घटनास्थळावरून वार्तांकन करताना दिसतात. त्यांच्याकडे प्रेस कार्ड, मायक्रोफोन आणि प्रतिबंधित भागात प्रवेश करण्याचे तसेच लोकांना प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य असल्याचे दिसत होते. हे सर्व करताना ते स्वतःला पत्रकार म्हणून सादर करत होते. हा प्रकार धोकादायक ठरतो.

इंडियन प्रेस युनियन ही अशी एकमेव संस्था नाही. ‘इंडिया टुडे’ने अशा सहा संकेतस्थळांची तपासणी केली. त्यापैकी चार संकेतस्थळांवर प्रेस ओळखपत्रे आणि संबंधित सेवांसाठीच्या किंमती स्पष्टपणे नमूद करण्यात आल्या होत्या. हिंद मीडिया नेटवर्कने ५९९ रुपयांत प्रेस ओळखपत्र, प्रमाणपत्र आणि ऑनलाइन रिपोर्टर प्रोफाइलची जाहिरात केली होती. NEED24 Newsने ९९९ रुपयांत ओळखपत्र आणि रिपोर्टर प्रोफाइल पेज देण्याची ऑफर केली होती. तर Asian Union Pressने त्याच ९९९ रुपयांत प्रेस ओळखपत्र, सदस्यत्व प्रमाणपत्र आणि लेख प्रकाशित करण्याची सुविधाही देऊ केली होती.

Indian Press Unionने १,७९९ रुपयांत छापील प्रेस कार्ड आणि कारवर लावण्यासाठी स्टिकर देण्याची जाहिरात केली होती. मात्र या सेवा केवळ ओळखपत्रांपुरत्या मर्यादित नाहीत. हिंद मीडिया नेटवर्कने ३,५०० रुपयांत मायक्रोफोन किट देण्याची जाहिरात केली होती. तर द फ्रंटमीडिया फेडरेशनने वाहन पास आणि आंतरराष्ट्रीय प्रेस कार्डची सुविधा देऊ केली होती. NEED24 News तर आपल्या प्रेस कार्डवर स्टेट ब्युरो चीफ पदनाम देण्याची सुविधाही देत असल्याचे आढळले. एका वर्षाच्या ‘वैधते’साठी याची किंमत २५,००० रुपये होती.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version