“श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रात वर्षभरात जितकी प्रक्षेपणे होत नाहीत, त्यापेक्षा जास्त अपयशी प्रयत्न काँग्रेस आपल्या नेत्याला लॉन्च करण्यासाठी करते,” अशा शेलक्या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली. एनडीटीव्ही वर्ल्ड समिट २०२६ मध्ये बोलताना पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा धुळीस मिळवण्याचा आणि देशाच्या अंतर्गत बाबींमध्ये परदेशी हस्तक्षेपाची मागणी करण्याचा आरोप केला. राहुल गांधी यांना राजकीयदृष्ट्या प्रस्थापित करण्याच्या वारंवार होणाऱ्या प्रयत्नांत काँग्रेस राष्ट्रीय हित धोक्यात घालत असल्याचेही पंतप्रधान म्हणाले.
“जगभरातील देश नव्या जागतिक व्यवस्थेच्या शोधात असताना भारतात काही लोक अव्यवस्था निर्माण करण्याची स्वप्ने पाहत आहेत. जगात अस्थिरतेचे वातावरण असताना भारताची मजबूत प्रतिमा जगासमोर मांडली जायला हवी. मात्र, काही लोकांना देशाची प्रतिष्ठा मलिन करण्यातच रस आहे. ते परदेशात जाऊन भारताची बदनामी करतात आणि परदेशी लोकांकडे भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करण्याची विनंती करतात,” असा आरोप करत पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींवर निशाणा साधला.
राहुल गांधी यांचे नाव न घेता मोदी यांनी काँग्रेसच्या नेतृत्वावर उपरोधिक टीका केली. काँग्रेस आपल्या ‘अपयशी उत्पादनाचे’ लॉन्चिंग करण्यासाठी देशाला आणखी किती काळ धोक्यात घालणार, असा सवाल त्यांनी केला. काँग्रेसने स्वतःचे राजकीय नुकसान केले तरी त्याबद्दल आक्षेप नाही; मात्र एका कुटुंबाला अपयशाच्या कलंकापासून वाचवण्यासाठी पक्ष भारताच्या उपलब्धी, देशाचे मोठेपण आणि विकास पणाला लावत आहे, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली. ‘द्राक्षे आंबट झाल्याने काँग्रेस आता वेलच नष्ट करण्याच्या प्रयत्नात आहे,’ अशा शब्दांत त्यांनी पक्षाच्या भूमिकेवर निशाणा साधला.
हे ही वाचा:
महापौर, अमिताभ, दिलजित दोसांजसह शाळांना बॉम्बची धमकी
म्यानमारमधील शस्त्र प्रशिक्षण प्रकरणी मॅथ्यू व्हॅनडाइक भारतात परतला
तिघांच्या हत्येप्रकरणी दहशतवाद्याला दुहेरी जन्मठेप
हवामान संकटाला विकसित देश जबाबदार
पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसला ‘परजीवी’ संबोधत इतर राजकीय पक्ष आणि संघटनांच्या वाढीत अडथळे निर्माण केल्याचा आरोप केला. सत्ता गमावल्यानंतर काँग्रेसची प्रतिक्रिया असंतोषातून येते आणि ज्या व्यवस्थेत जनतेचा पाठिंबा मिळवण्यात पक्ष अपयशी ठरला, त्याच व्यवस्थेला कमकुवत करण्याची त्याची इच्छा दिसून येते, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
