काशीमध्ये रविवारी (२५ ऑक्टोबर) गंगेच्या आकाशात भारतीय वायुसेनेच्या लढाऊ विमानांची गर्जना आणि थरारक हवाई कसरतींनी नागरिकांना रोमांचित केले. नमो घाटावर आयोजित ‘विंग्स ओव्हर गंगा’ या एअर शोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राफेल, सुखोई आणि अन्य विमानांचे हवाई प्रदर्शन पाहिले.
भारतीय वायुसेनेच्या ९४ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेही उपस्थित होते. विमानांच्या गर्जनेने दुमदुमलेल्या आकाशात सूर्यकिरण एरोबॅटिक पथकाने रंगीत धुराच्या साहाय्याने तिरंग्याची प्रतिमा साकारली. हा नजारा पाहून घाटांवर उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात उत्साह व्यक्त केला.
नमो घाटावरील एअर शोमध्ये राफेल लढाऊ विमानांच्या गर्जनेने विशेष लक्ष वेधून घेतले. पंतप्रधान मोदी यांनी भारतीय लष्कर आणि वायुसेनेच्या शौर्याला अभिवादन केले. त्यांच्यासोबत उपस्थित असलेल्या मान्यवरांनीही टाळ्या वाजवून हवाई प्रदर्शनाला दाद दिली.
या एअर शोमध्ये १०० हून अधिक विमाने आणि हेलिकॉप्टरच्या प्रदर्शनाचे नियोजन करण्यात आले होते. यामध्ये राफेल आणि सुखोईसह ५२ लढाऊ विमानांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. लढाऊ विमानांसोबत हेलिकॉप्टरच्या समन्वित उड्डाणांनीही प्रेक्षकांना रोमांचित केले. एअर शोमधील प्रमुख आकर्षणांपैकी भारतीय वायुसेनेच्या सूर्यकिरण एरोबॅटिक पथकाचे प्रदर्शन विशेष ठरले. नऊ हॉक विमानांच्या पथकाने एकाच वेळी उड्डाण करत आकाशात विविध आकृत्या साकारल्या. विमानांतून बाहेर पडणाऱ्या रंगीत धुरामुळे आकाशात तिरंग्याची छटा उमटली.
हे ही वाचा:
टेरर फंडिंगप्रकरणी काश्मीरमध्ये चार महिलांसह सहा जणांना अटक
दहिसरमध्ये १३ वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण; पोक्सोअंतर्गत तरुणाला अटक
बंगालच्या उपसागरात भारत-सिंगापूरचा संयुक्त ‘सिम्बेक्स’ युद्धाभ्यास
अमली पदार्थ तस्करीच्या ‘डेथ ट्रायंगल’वर प्रहार
सी-१७ ग्लोबमास्टरच्या नेतृत्वाखाली सूर्यकिरण विमानांच्या फ्लायपास्टचाही कार्यक्रमात समावेश होता. याशिवाय स्वदेशी हलके लढाऊ विमान तेजसच्या हवाई कसरती आणि तीन राफेल विमानांचे सामूहिक उड्डाण हेही विशेष आकर्षण होते. या सादरीकरणांतून भारतीय वायुसेनेची कार्यक्षमता, वैमानिकांचे कौशल्य आणि विविध विमानांमधील समन्वयाचे दर्शन घडवण्यात आले.
