भारताविरुद्ध सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडला मोठा धक्का बसला आहे. डावखुरा सलामीवीर डेव्हॉन कॉनवे दुखापतीमुळे संपूर्ण वनडे मालिकेतून बाहेर झाला आहे. मालिकेपूर्वी सरावादरम्यान वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीसोबत झालेल्या धडकेत कॉनवेला दुखापत झाली होती. या दुखापतीतून तो अद्याप सावरलेला नसल्याने त्याला मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे.
कॅच पकडण्याचा सराव करत असताना कॉनवे आणि मॅट हेन्री यांची एकमेकांशी जोरदार धडक झाली होती. या घटनेत दोघांनाही डोक्याला दुखापत झाली होती. त्यामुळे हे दोन्ही खेळाडू मालिकेतील पहिल्या सामन्याला मुकले होते. मात्र, हेन्री दुखापतीतून सावरला असून शनिवारी होणाऱ्या दुसऱ्या वनडेसाठी तो उपलब्ध असणार आहे. दुसरीकडे, कॉनवेची दुखापत गंभीर असल्याने त्याला संपूर्ण मालिकेतून बाहेर व्हावे लागले आहे.
कॉनवेच्या जागी न्यूझीलंड संघात निक केलीचा समावेश करण्यात आला आहे. केली यापूर्वी न्यूझीलंड ए संघाचा भाग होता. भारताविरुद्धच्या चौथ्या आणि पाचव्या वनडेसाठी त्याची निवड झाली होती. मात्र, आता त्याला दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यासाठीही संघात स्थान देण्यात आले आहे. केलीच्या जागी न्यूझीलंड ए संघात डेल फिलिप्सचा समावेश करण्यात आला आहे.
न्यूझीलंड ए संघात दुखापतींमुळे आणखी काही बदल करण्यात आले आहेत. वेगवान गोलंदाज सायमन कीनला हॅमस्ट्रिंगची, बेन लिस्टरला उजव्या बाजूला स्नायूंच्या दुखापतीची, तर फ्रेझर शिएटला साइड स्ट्रेनची समस्या जाणवत आहे. त्यामुळे हे तिन्ही खेळाडू संघाबाहेर झाले आहेत.
न्यूझीलंड क्रिकेटने दिलेल्या माहितीनुसार, कीन आणि शिएट यांना मालिकेदरम्यान दुखापती झाल्या असून पुढील तीन ते चार आठवड्यांत ते आपल्या देशांतर्गत संघांकडून खेळण्यासाठी उपलब्ध होऊ शकतात. तर लिस्टर पुनर्वसन प्रक्रियेतून जात आहे.
दरम्यान, भारताने मालिकेतील पहिल्या सामन्यात विजय मिळवत पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आता दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडचा संघ पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असेल.
