घरस्पोर्ट्सग्रँडमास्टर दिव्या देशमुखला अर्जुन पुरस्कार

ग्रँडमास्टर दिव्या देशमुखला अर्जुन पुरस्कार

विश्वविजेतेपदानंतर आणखी एक मानाचा तुरा

नागपूरची युवा बुद्धिबळपटू आणि ग्रँडमास्टर दिव्या देशमुख हिच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. २०२५ मधील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत केंद्र सरकारने दिव्या देशमुखची प्रतिष्ठेच्या अर्जुन पुरस्कारासाठी निवड केली आहे. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२५ अंतर्गत देशातील विविध क्रीडा प्रकारांतील एकूण १७ खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आला असून, त्यात दिव्याच्या नावाचा समावेश आहे. अवघ्या १९व्या वर्षी विश्वविजेतेपद पटकावून बुद्धिबळाच्या पटावर भारताचा झेंडा उंचावणाऱ्या दिव्याच्या कारकिर्दीतील हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

नागपूरमध्ये जन्मलेल्या दिव्या देशमुखने अगदी लहान वयात बुद्धिबळाला सुरुवात केली आणि सातत्यपूर्ण मेहनत, अचूक डावपेच आणि आत्मविश्वासाच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. २०२१ मध्ये ती भारताची २१वी महिला ग्रँडमास्टर बनली. त्यानंतर विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी करत तिने आपली गुणवत्ता सिद्ध केली. जागतिक ज्युनियर स्पर्धेतील विजेतेपद, आशियाई स्पर्धांमधील यश आणि बुद्धिबळ ऑलिम्पियाडमधील पदकांमुळे तिचे नाव सातत्याने चर्चेत राहिले.
हे ही वाचा:
काझीरंगाभोवतीचा १० किमी संवर्धन पट्टा घटवण्याचा सरकारचा प्रस्ताव

काबूलमध्ये शाळेजवळ हातबॉम्बचा स्फोट; ५० हून अधिक मुलं जखमी

८व्या वेतन आयोगाचा पेन्शनधारकांना मोठा दिलासा

नॅस्डॅककडून २३ तास शेअर ट्रेडिंगची तयारी 

दिव्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा टप्पा २०२५ मध्ये आला. जॉर्जियामध्ये झालेल्या फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत तिने भारताची अनुभवी ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी हिचा पराभव करत विश्वविजेतेपदावर नाव कोरले. या ऐतिहासिक विजयामुळे दिव्या अवघ्या १९व्या वर्षी महिला बुद्धिबळ विश्वविजेती बनली. या कामगिरीमुळे तिला थेट ग्रँडमास्टर किताबही मिळाला आणि ती जागतिक बुद्धिबळाच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली.

विश्वचषकातील या ऐतिहासिक विजयाने दिव्याच्या नावाची केवळ भारतातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय बुद्धिबळविश्वातही मोठी चर्चा झाली. अनुभवी खेळाडूंविरुद्ध दबावाच्या परिस्थितीतही तिने दाखवलेला संयम, डावपेचांची अचूकता आणि निर्णायक क्षणी घेतलेले धाडसी निर्णय यामुळे तिच्या खेळाची विशेष दखल घेण्यात आली. तिच्या या कामगिरीमुळे नागपूरसह महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्राची प्रतिष्ठाही उंचावली.

अर्जुन पुरस्कारासाठी दिव्याची निवड ही तिच्या विश्वविजेतेपदासह २०२५ मधील सातत्यपूर्ण कामगिरीला मिळालेली सरकारी पावती मानली जात आहे. यंदा अर्जुन पुरस्कारासाठी १७ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. यात दिव्या देशमुखसह बुद्धिबळपटू विदित गुजराथी, ॲथलेटिक्सपटू तेजस्विन शंकर, बॅडमिंटनपटू गायत्री गोपीचंद आणि ट्रेसा जॉली यांच्यासह विविध क्रीडा प्रकारांतील खेळाडूंचा समावेश आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version