आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतीय कंपाउंड तिरंदाज गणेश मणि रत्नम थिरुमुरू याने पुरुषांच्या वैयक्तिक प्रकारात कांस्यपदक पटकावत भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. गुरुवारी झालेल्या पदकाच्या लढतीत गणेशने व्हिएतनामच्या कांग डुक डांग याचा १४९-१४४ असा पराभव केला. त्याच्या या यशामुळे तिरंदाजीतील भारताच्या पदकांची संख्या चार झाली. विशेष म्हणजे, गणेशचे या स्पर्धेतील हे दुसरे पदक आहे. याआधी त्याने पुरुषांच्या सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते.
गणेशचा अचूक नेम; प्रतिस्पर्ध्याला पछाडले!
ओकाजाकी चुओ सोगो पार्क मल्टिपर्पज स्क्वेअर येथे झालेल्या या लढतीत गणेशने सुरुवातीपासूनच अचूक निशाणा साधला. त्याने तब्बल १४ वेळा १० गुणांची कमाई करत आपल्या नेमबाजीतील सातत्य सिद्ध केले. सलग तीन वेळा १० गुणांचा अचूक वेध घेत त्याने १४९ गुणांची दमदार कमाई केली. त्याच्या या शानदार कामगिरीसमोर व्हिएतनामच्या तिरंदाजाला १४४ गुणांपर्यंतच मजल मारता आली. परिणामी, गणेशने कांस्यपदकावर आपले नाव कोरले.
सांघिक प्रकारात भारताची सुवर्णभरारी!
कंपाउंड तिरंदाजीमध्ये भारतीय खेळाडूंनी सांघिक प्रकारात शानदार कामगिरी केली. भारताने सांघिक स्पर्धांमध्ये तीन सुवर्णपदके जिंकली, तर वैयक्तिक प्रकारात गणेशने कांस्यपदक मिळवले. पुरुषांच्या सांघिक प्रकारात कुशल दलाल, साहिल जाधव आणि गणेश मणि रत्नम यांच्या त्रिकुटाने चीनवर मात करत सुवर्णपदक पटकावले. साहिलचे या स्पर्धेतील हे दुसरे सुवर्णपदक ठरले.
महिलांच्या सांघिक प्रकारात चिकिथा तनिपार्थी, पृथिका प्रदीप आणि ज्योती सुरेखा वेन्नम यांच्या भारतीय संघाने चीनचा २३८-२३४ असा पराभव करत सुवर्णपदक कायम राखले. मिश्र सांघिक प्रकारात चिकिथा तनिपार्थी आणि साहिल जाधव यांनीही सुवर्णपदकाला गवसणी घातली. या विजयामुळे भारताने लॉस एंजेलिस २०२८ ऑलिम्पिकमधील कंपाउंड मिश्र सांघिक प्रकारासाठी कोटाही मिळवला. या प्रकाराचा ऑलिम्पिकमध्ये प्रथमच समावेश होणार आहे.
चिकिथाची झुंज; एका गुणाने हुकले पदक!
महिलांच्या वैयक्तिक कंपाउंड प्रकारात भारताच्या चिकिथा तनिपार्थीला मात्र उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. इंडोनेशियाच्या नुरिसा डियान अशरीफाहने चिकिथाचा १४४-१४३ असा अवघ्या एका गुणाने पराभव केला. चिकिथाने सुरुवातीच्या दोन फेऱ्यांनंतर जोरदार पुनरागमन करत आघाडी मिळवली होती. मात्र, अखेरच्या फेरीतील गुणांच्या फरकामुळे तिचे आव्हान संपुष्टात आले.
चिकिथाने या स्पर्धेत महिलांच्या सांघिक आणि मिश्र सांघिक प्रकारात सुवर्णपदके जिंकत आपली छाप पाडली. तसेच लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी कोटाही मिळवला.
भारताने हांगझोऊ २०२३ आशियाई क्रीडा स्पर्धेत कंपाउंड तिरंदाजीतील पाचही सुवर्णपदके जिंकली होती. यंदा दोन्ही वैयक्तिक प्रकारांतील सुवर्णपदकांचे विजेतेपद राखण्यात भारताला यश आले नसले, तरी सांघिक प्रकारातील तीन सुवर्णपदके आणि गणेशच्या कांस्यपदकामुळे भारतीय तिरंदाजांनी स्पर्धेत दमदार कामगिरी नोंदवली आहे.
