घरस्पोर्ट्सस्क्वॉशमध्ये भारतीय लेकींची कांस्यभरारी!

स्क्वॉशमध्ये भारतीय लेकींची कांस्यभरारी!

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतीय महिला स्क्वॉश संघाने कांस्यपदक पटकावत देशाच्या पदकतालिकेत भर घातली. उपांत्य फेरीत हाँगकाँगच्या संघाने भारताचा २-१ असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. भारताला पराभवाचा सामना करावा लागला असला, तरी भारतीय महिला खेळाडूंनी संपूर्ण स्पर्धेत जिद्दीने खेळ करत पदक निश्चित केले. या स्पर्धेतील स्क्वॉशमधील भारताचे हे चौथे पदक ठरले.

अनाहतची झुंज; सुरुवातीची आघाडी व्यर्थ!

उपांत्य सामन्यात भारताकडून अनाहत सिंहने चान सिन युकविरुद्ध दमदार सुरुवात केली. अनाहतने पहिले दोन गेम अनुक्रमे ११-९ आणि ११-८ असे जिंकत भारताला आशादायी सुरुवात करून दिली. मात्र, त्यानंतर हाँगकाँगच्या चान सिन युकने जोरदार पुनरागमन केले.

तिने तिसरा गेम ११-६, चौथा गेम १३-११ आणि निर्णायक पाचवा गेम १२-१० असा जिंकला. त्यामुळे हाँगकाँगने सामन्यात १-० अशी आघाडी घेतली.

तन्वी खन्नाची झुंजार बाजी!

पहिल्या सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघाला बरोबरी साधून देण्याची जबाबदारी तन्वी खन्नावर होती. तिने ली का यी या आपल्यापेक्षा वरच्या क्रमांकावरील खेळाडूविरुद्ध शानदार खेळ केला.

पहिल्या गेममध्ये तन्वीला ४-११ असा पराभव पत्करावा लागला. मात्र, त्यानंतर तिने खेळाची लय बदलत दुसरा गेम १३-११, तिसरा गेम ११-९ आणि चौथा गेम १३-११ असा जिंकला. तन्वीच्या या विजयामुळे भारताने सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली आणि निर्णायक लढतीतील उत्सुकता वाढली.

जोशना चिनप्पाला यशाने हुलकावणी

सामन्याचा निकाल ठरवणाऱ्या निर्णायक लढतीत भारताच्या अनुभवी जोशना चिनप्पासमोर हाँगकाँगच्या हो त्झे लोकचे आव्हान होते. मात्र, जोशनाला प्रतिस्पर्धी खेळाडूच्या आक्रमक खेळाचा सामना करता आला नाही.

हो त्झे लोकने पहिला गेम ११-४, दुसरा गेम ११-७ आणि तिसरा गेम ११-९ असा जिंकला. या विजयासह हाँगकाँगने अंतिम फेरी गाठली, तर भारतीय महिला संघाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

स्क्वॉशमध्ये भारताची चार पदके!

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतीय स्क्वॉशपटूंनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. महिला सांघिक प्रकारातील कांस्यपदकासह स्क्वॉशमधील भारताची पदकसंख्या चार झाली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version