घरबिजनेसविमान प्रवास महागण्याची शक्यता

विमान प्रवास महागण्याची शक्यता

विमान इंधनाच्या दरात १६ रुपयांची वाढ

विमान प्रवाशांसाठी ऑक्टोबरची सुरुवात काहीशी महागडी ठरण्याची शक्यता आहे. सरकारी तेल कंपन्यांनी १ ऑक्टोबरपासून एव्हिएशन टर्बाइन फ्युएल अर्थात एटीएफच्या दरात मोठी वाढ केली आहे. एटीएफच्या किमतीत तब्बल १६ रुपये प्रति लिटरची वाढ झाल्याने विमान इंधनाचा दर १२१ रुपयांवरून सुमारे १३७ रुपये प्रति लिटरवर पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती आणि रुपया-डॉलर विनिमय दरातील चढ-उतारांचा परिणाम एटीएफच्या किमतीवर होत असतो. ऑगस्ट आणि सप्टेंबरनंतर सलग तिसऱ्या महिन्यात एटीएफच्या दरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे विमान कंपन्यांच्या ऑपरेशनल खर्चावर अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे.

गेल्या तीन महिन्यांतील वाढ पाहिल्यास विमान इंधनाच्या किमतीत झालेली तेजी अधिक स्पष्ट होते. ऑगस्टमध्ये एटीएफच्या दरात सुमारे ५ रुपये प्रति लिटरची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर सप्टेंबरमध्ये पुन्हा ६.२८ रुपये प्रति लिटरची वाढ झाली आणि आता ऑक्टोबरमध्ये तब्बल १६ रुपयांची वाढ झाली आहे. म्हणजेच अवघ्या तीन महिन्यांत एटीएफच्या दरात २७ रुपयांहून अधिक वाढ झाली आहे. विमान कंपन्यांच्या एकूण ऑपरेशनल खर्चामध्ये एटीएफचा वाटा मोठा असतो. त्यामुळे इंधनाच्या किमतीत सातत्याने होणारी वाढ कंपन्यांच्या खर्चाच्या गणितावर परिणाम करू शकते. वाढलेल्या खर्चाचा काही भाग तिकिटांच्या किमतीत समाविष्ट करण्याचा निर्णय विमान कंपन्या घेऊ शकतात.
हे ही वाचा:
स्क्वॉशमध्ये भारतीय लेकींची कांस्यभरारी!

तिरंदाज गणेश मणिचा अचूक नेम

पाकड्यांना लोळवले, भारताची फायनलमध्ये धडक!

जी-२०च्या व्यासपीठावर भारताची व्यापार कूटनीती

दरम्यान, ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीतही वाढ करण्यात आली आहे. मात्र, घरगुती वापराच्या १४.२ किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. एटीएफच्या वाढलेल्या दरामुळे आगामी सणासुदीच्या काळात विमान प्रवासाचे भाडे वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः सुट्टीच्या हंगामात विमान प्रवासाची मागणी वाढत असल्याने इंधन खर्चातील वाढ विमान कंपन्यांच्या भाडे धोरणावर परिणाम करू शकते. मात्र, तिकिटांच्या अंतिम किमतीत किती वाढ होईल, हे प्रत्येक विमान कंपनीच्या खर्चरचनेनुसार आणि बाजारातील मागणीनुसार ठरणार आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात विमान प्रवासाचे नियोजन करणाऱ्या प्रवाशांना तिकिटांच्या किमतीवर लक्ष ठेवावे लागणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version