अमेरिकेतील मिलवॉकी येथे सुरू असलेल्या जी-२० व्यापार मंत्र्यांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल यांनी ब्राझील आणि मेक्सिकोच्या वरिष्ठ मंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा केली. या बैठकींमध्ये भारताचे व्यापार, गुंतवणूक आणि आर्थिक सहकार्य अधिक व्यापक करण्यावर भर देण्यात आला. ब्राझीलचे व्यापारमंत्री मार्सिओ फर्नांडो एलियास रोजा आणि परराष्ट्रमंत्री माउरो व्हिएरा यांच्यासोबत झालेल्या चर्चेत भारत-मर्कोसुर प्राधान्य व्यापार कराराचा विस्तार, विविध क्षेत्रांतील सहकार्य वाढविणे तसेच गुंतवणुकीला चालना देण्याच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. त्याचबरोबर जी-२० आणि जागतिक व्यापार संघटनेच्या व्यासपीठावर दोन्ही देशांमधील समन्वय अधिक मजबूत करण्यावरही भर देण्यात आला.
मेक्सिकोचे अर्थव्यवस्थामंत्री मार्सेलो एब्रार्ड यांच्यासोबतही गोयल यांनी व्यापार आणि गुंतवणूक संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने चर्चा केली. भारत आणि मेक्सिको यांच्यात व्यापारवाढीसाठी मोठ्या संधी असून, नव्या क्षेत्रांमध्ये सहकार्याचे मार्ग खुले करण्याची गरज असल्याचे गोयल यांनी नमूद केले. भारत-मेक्सिको आर्थिक संबंध अधिक विस्तारण्याच्या दृष्टीने ही चर्चा महत्त्वाची मानली जात आहे. दोन्ही देशांमध्ये यापूर्वीही व्यापार आणि व्यवसायाच्या नव्या संधींबाबत चर्चा झाली आहे.
हे ही वाचा:
दुबईत स्मित यांच्या कुटुंबीयांची भारतीय राजदूतांनी घेतली भेट
सप्टेंबरमध्ये भारताच्या उत्पादन क्षेत्राला वेग
२ ऑक्टोबरचा ‘नो यूपीआय डे’ आंदोलन मागे
भारतीय वैमानिकाच्या शौर्यामुळे ९/११ सारखी दुर्घटना टळली!
जी-२० बैठकीच्या निमित्ताने गोयल यांनी पोलंडचे अर्थ व वित्तमंत्री आंद्रेझ डोमान्स्की यांचीही भेट घेतली. भारत-युरोपियन युनियन मुक्त व्यापार करारामुळे भारत आणि पोलंडमधील व्यापार व गुंतवणुकीला नव्या संधी उपलब्ध होऊ शकतात, यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. याशिवाय गोयल यांनी अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीर यांच्यासोबतही भारत-अमेरिका अंतरिम व्यापार कराराच्या दिशेने चर्चा केली.
भारताच्या व्यापारविषयक धोरणाच्या दृष्टीने या बैठकींना विशेष महत्त्व आहे. विविध प्रमुख अर्थव्यवस्थांशी द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक संबंध वाढवण्याबरोबरच जागतिक व्यापार व्यवस्थेत भारताच्या हितसंबंधांना बळकटी देण्याचा प्रयत्न या चर्चांमधून दिसून येतो. अमेरिकेतील जी-२० व्यापार मंत्र्यांच्या बैठकीत भारत सर्व सदस्य देशांसोबत खुले, पारदर्शक आणि नियमाधारित बहुपक्षीय व्यापार व्यवस्थेसाठी सहकार्य करण्यावर भर देत आहे.
