दिल्लीतील कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) नेते आशुतोष रांका आणि सौरव दासला बुधवारी, २१ ऑक्टोबर रोजी न्यायालयाने जामीन मंजूर केला. गेल्या आठ दिवसांपासून तिहार तुरुंगात असलेल्या दोघांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे. दिल्लीतील विशेष कार्यकारी दंडाधिकारी न्यायालयात दोघांना हजर करण्यात आले असता दिल्ली पोलिसांनी त्यांच्या कोठडीत आणखी तीन दिवसांची वाढ करण्याची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने ही मागणी मान्य न करता दोघांना जामीन मंजूर केला. त्यामुळे त्यांचा तुरुंगातून सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.
आशुतोष रांका आणि सौरव दासला १३ ऑक्टोबर रोजी दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले होते. जंतर-मंतर परिसरात लावण्यात आलेले बॅरिकेड्स ओलांडून प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश केल्याचा आरोप करण्यात आला होता. या कारवाईनंतर दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यामुळे त्यांची रवानगी तिहार तुरुंगात करण्यात आली होती. त्यानंतर कोठडीच्या मुदतीत वाढ झाल्याने त्यांना तुरुंगात राहावे लागले.
हे ही वाचा:
कॉक्रोच’ची झाली पुरती पोलखोल!
आग विझविणाऱ्या रोबोटला डीजीक्यूएची मंजुरी
मार्वे रोडवर शाळेसमोरची अवैध पार्किंग, अतिक्रमणे जीव गेल्यावरच हटणार का?
नावाचा माज नको, मैदानात दम दाखवा!
जामीन मिळवण्यासाठी आशुतोष रांका आणि सौरव दासने दिल्ली उच्च न्यायालयातही याचिका दाखल केली होती. सुनावणीदरम्यान न्यायालयाने दोघांच्या वयाबाबत प्रश्न उपस्थित केले. आशुतोष रांका याचे वय ३१ वर्षे, तर सौरव दास याचे वय २७ वर्षे असल्याचे त्यांच्या वकिलांनी सांगितले. न्यायालयाने त्यांच्या याचिकेवर सुनावणी करताना दंडाधिकारी न्यायालयातून दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली. त्यानंतर दोघांच्या वकिलांनी उच्च न्यायालयातील याचिका मागे घेतली. पुढे विशेष कार्यकारी दंडाधिकारी न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर दोघांना जामिनावर सोडण्याचे आदेश देण्यात आले. त्यांचे सुटकेचे आदेशही जारी करण्यात आले आहेत.
